महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची!

By रवी टाले | Published: April 6, 2019 06:47 PM2019-04-06T18:47:54+5:302019-04-06T18:49:27+5:30

स्थित्यंतराच्या प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस व भाजपच्या कंपूत नसलेल्या प्रादेशिक पक्षांपासून फटकून राहण्याची भूमिका कॉंग्रेस नेतृत्वाने घेतली. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला झाला.

Maha coalition and Congress party! | महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची!

महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची!

Next

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नुकताच कॉंग्रेसवर अत्यंत गंभीर स्वरुपाचा आरोप केला. कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखिल कर्नाटकातील मांड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) या पक्षाची कॉंग्रेससोबत युती आहे; मात्र मांड्या मतदारसंघात आपल्या चिरंजिवांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस चक्रव्यूह रचत असून, त्यासाठी भारतीय जनता पक्षासोबतही कॉंग्रेसचे साटेलोटे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर, भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा घोषित करून, कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावर आरुढ केले होते. कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाच्या निमित्ताने देशातील झाडून सारे भाजपविरोधी पक्ष एकत्र आले होते आणि तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्ताच्यूत करण्यासाठी देशव्यापी विरोधी ऐक्य (महागठबंधन) साकारण्याचे सुतोवाच झाले होते. आज तेच कुमारस्वामी जर कॉंग्रेसवर भाजपसोबत साटेलोटे करून त्यांच्या चिरंजिवांना पराभूत करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप करीत असतील, तर परिस्थिती नक्कीच गंभीर आहे, असे म्हटले पाहिजे.
महागठबंधन साकारण्याचे सुतोवाच ते लोकसभा निवडणूक हा प्रवास बारकाईने तपासल्यास, कॉंग्रेसच्या मनात नेमके आहे तरी काय, असा प्रश्न कोणत्याही सुजाण राजकीय निरीक्षकाच्या मनात डोकावल्याशिवाय राहणार नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनास लाभलेले अभूतपूर्व यश, उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करण्याच्या रणनितीस आलेली गोड फळे आणि कर्नाटकात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने दाखविलेली लवचिकता, यामुळे विरोधी ऐक्याबाबत देशभर हुरूप निर्माण झाला होता.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकांमध्ये मात्र कॉंग्रेसने कर्नाटकात निवडणुकोत्तर दाखविलेली लवचिकता दाखविली नाही आणि जवळपास स्वबळावर तिन्ही राज्यांमध्ये सत्ताही हस्तगत केली. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसपेक्षा प्रबळ आहेत, त्या बहुतांश राज्यांमध्ये भाजपविरोधी महागठबंधन साकारू शकले नाही. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश ही त्याची उदाहरणे! ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेस प्रबळ आहे त्या राज्यांमध्ये महागठबंधन साकारण्याचा तर मग प्रश्नच मिटला!
नव्वदच्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा टेकू घेऊन भाजपने राष्ट्रीय राजकारणातील एक धृव म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले. त्यानंतर काही काळाने देशाच्या राजकारणाने ‘कॉंग्रेस व कॉंग्रेस विरोधी’ ते ‘भाजप व भाजप विरोधी’ असे वळण घेतले. या स्थित्यंतरामध्ये सर्वाधिक गोची झाली ती कॉंग्रेसची! स्थित्यंतराच्या प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस व भाजपच्या कंपूत नसलेल्या प्रादेशिक पक्षांपासून फटकून राहण्याची भूमिका कॉंग्रेस नेतृत्वाने घेतली. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला झाला. भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांमधील मतविभाजनाच्या आधारे भाजप मजबूत होत गेला आणि ज्या राज्यांमध्ये जनसंघाला फारसा जनाधार नव्हता त्या राज्यांमध्येही विस्तारत गेला. कालांतराने कॉंग्रेस आणि इतर भाजपविरोधी पक्षांच्या ते लक्षात आले आणि मग भाजपला रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये कॉंग्रेसही सामील झाली. इथे राजकारणाने घेतलेले वळण पूर्ण झाले. काहीही करून भाजपला रोखायचे हाच कॉंग्रेसचा ‘अजेंडा’ झाल्याचा लाभ प्रादेशिक पक्षांच्या बेरक्या नेत्यांनी अचूक घेतला. भाजपचा बागुलबुवा दाखवून त्यांनी कॉंग्रेसला संकोचण्यास भाग पाडले आणि स्वत:चा विस्तार करून घेतला. आज उत्तर प्रदेश, बिहारसारख्या मोठ्या राज्यांमध्ये कॉंग्रेसला आपले स्थान शोधावे लागत असण्यामागचे कारण हे आहे.
महागठबंधन साकारण्यात आलेल्या अपयशासाठी आज कॉंग्रेसला बोल लावल्या जात आहे; मात्र केवळ भाजपला रोखण्यासाठी म्हणून कॉंग्रेसने स्वत:चा किती संकोच करून घ्यायचा, यालाही मर्यादा होतीच! आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपला रोखण्यासाठी एका मर्यादेपलीकडे माघार घेण्यास नकार दिला असेल आणि त्यामुळे महागठबंधन साकारू शकले नसेल तर त्यासाठी केवळ त्यांनाच दोषी ठरवून चालणार नाही. भाजपला रोखण्यासाठी विरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी माघार घेण्याची किंमत प्रत्येक वेळी कॉंग्रेसलाच चुकवावी लागली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याचा तात्कालिक उद्देश भले साध्य झाला असेल; पण त्यामुळे इतर पक्षांचा लाभ आणि कॉंग्रेसचे नुकसान होत गेले. शिवाय एवढे करूनही २०१४ मध्ये भाजपने स्वबळावर केंद्रात सत्तेत येण्यापर्यंत मजल गाठलीच! त्यामुळे कॉंग्रेसला जुने वैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर केवळ भाजपसोबत लढून चालणार नाही, तर इतर पक्षांशीही लढावेच लागेल; अन्यथा भाजपविरोधी पक्षांपैकी एक पक्ष एवढीच कॉंग्रेसची मर्यादित ओळख शिल्लक राहील!

- रवी टाले                                                                                                    

 ravi.tale@lokmat.com




 

Web Title: Maha coalition and Congress party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.