निष्ठेचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:37 PM2018-07-10T12:37:03+5:302018-07-10T12:37:32+5:30

Loyalty market | निष्ठेचा बाजार

निष्ठेचा बाजार

Next

- मिलिंद कुलकर्णी
राजकारण बेभरवशाचे आहे, हे आपण मान्य केले आहेच. पण निष्ठेचा चक्क बाजार मांडला जाईल, हे मात्र अपेक्षित नव्हते. भाजपासारख्या साधनशुचितेचा कायम आग्रह धरणाऱ्या पक्षाने तर कमरेचे काढून डोक्याला गुंडाळायचे तेवढे बाकी ठेवले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे मंत्री या गोष्टींचे उघडपणे समर्थन करतात, यापेक्षा लोकशाहीचे दुर्देव ते कोणते. विजयासाठी व्यावहारिक तडजोड करावी लागते या संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांचे जळगावातील वक्तव्य गाजले होते. त्याची परिणती जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत लगेच आली. २०१३ मध्ये महापालिका तर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाविरुध्द उमेदवारी लढविणारे आणि महापालिकेत पाच वर्षे खान्देश विकास आघाडीला सहकार्य करणाºया विद्यमान महापौर ललित कोल्हे यांना भाजपाने पावन करुन घेतले. मूळ भाजपाचेच परंतु २००८ मध्ये शहर विकास आघाडी आणि २०१४ मध्ये खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाविरोधी राजकारण करणाºया कैलास सोनवणे यांनाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपामध्ये प्रवेश देऊन उपकृत केले. कोल्हे आणि सोनवणे हे राजकारणातील चाणाक्ष कार्यकर्ते आहेत. हवेची दिशा ओळखून ते भूमिका ठरवत असतात. दोघांनी स्वत: आणि कुटुंबियांसाठी महापौर, उपमहापौर, नगरसेवकपद अशी लाभाची सर्व पदे दहा वर्षांत मिळविली. गरज सरो, वैद्य मरो या तत्त्वाचा अंगीकार करीत आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विरोधात राहत महापालिकेतील सत्ताधाºयांशी संघर्ष केला आता तेच सत्ताधारी मंडळी पक्षात येऊन मोक्याच्या जागा पटकावीत असताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी नेत्यांना दिसत नाही, ही सत्तेची धुंदी आहे. राष्टÑवादी काँग्रेस पाच वर्षांपूर्वी अशाच हवेत होती. सत्तेत असताना घाऊक प्रमाणात पक्षांतरे झाली. बेडकी फुगली तरी हत्ती होत नाही, हे राजकीय पक्ष विसरतात आणि सत्ता जाताच पोरक्याचे जिणे वाट्याला येते. ११ नगरसेवक असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसचे ७ नगरसेवक सोडून गेले. इच्छुकांच्या मुलाखतीचे आयोजन करणाºया महानगराध्यक्षाने सायंकाळी पक्षांतर केले. महापौर ललित कोल्हे हे दहा दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जाहीर करतात. इच्छुकांच्या मुलाखती घेणा-या पॅनलचे सदस्य म्हणून काम करतात आणि दुस-याच दिवशी निष्ठा बदलतात, हा निष्ठेचा बाजार नाही तर काय? पुन्हा या ‘आयाराम-गयारामां’च्या तोंडी नेत्यांवर विश्वास ठेवून अमूक पक्षात प्रवेश करीत आहे, अशी भाषा असते. राजकारणात किती बेगडीपण आणि दांभिकता ठासून भरलेली आहे, याची प्रचिती अशा घटनांनी येते. दुर्देव असे की, अशी मंडळी लोकशाही मार्गाने सत्ता हाती घेतात आणि शहाण्यासुरत्या लोकांचे नेतृत्व करतात.

Web Title: Loyalty market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.