टेरेसवरील ‘जिवाची मुंबई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 02:53 AM2017-11-03T02:53:57+5:302017-11-03T02:54:20+5:30

मुंबई कधी झोपत नाही, अशी या शहराची ख्याती. या शहराचे अन्य राज्यातच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनाही विशेष आकर्षण! अशा या मुंबईत रात्र जागविण्याची संकल्पना पुढे आली. ‘नाइटलाइफ’च्या माध्यमातून गच्चीवर रेस्टॉरंट, रात्रीच्या बाजारपेठा असे प्रस्ताव चर्चेत आले.

'Jivchi Mumbai' on the terrace | टेरेसवरील ‘जिवाची मुंबई’

टेरेसवरील ‘जिवाची मुंबई’

Next

मुंबई कधी झोपत नाही, अशी या शहराची ख्याती. या शहराचे अन्य राज्यातच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनाही विशेष आकर्षण! अशा या मुंबईत रात्र जागविण्याची संकल्पना पुढे आली. ‘नाइटलाइफ’च्या माध्यमातून गच्चीवर रेस्टॉरंट, रात्रीच्या बाजारपेठा असे प्रस्ताव चर्चेत आले. पण शिवसेना-भाजपाचं फिस्कटलं आणि त्याचा फटका शिवसेनेच्या या धोरणाला बसला. गेली तीन वर्षे हा प्रस्ताव थंड बस्त्यात होता. बुधवारी अचानक आयुक्त अजय मेहता यांनीच सुधारित धोरण मंजूर करून टाकले. तथापि, महासभेला ‘बायपास’ करून आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाने राजकीय वादळ उठले आहे. विशेष म्हणजे हे धोरण तत्काळ लागूदेखील करण्यात आले. खरेतर, मुंबईत गच्चीवर रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. अनेक ठिकाणी गच्चीवर बेकायदा रेस्टॉरंट राजरोस सुरू झाले. त्यामुळे नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ इंडियाच्या मागणीनुसार मुंबई महापालिकेने २०१२मध्ये यावर धोरण आणण्याची तयारी दर्शवली होती. मुंबईत ‘नाइटलाइफ’ची संकल्पना मांडणाºया आदित्य ठाकरे यांनी २०१४मध्ये हा प्रस्ताव उचलून धरला. युवराजांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनीही बराच जोर लावला. मात्र मित्र पक्षानेच विरोधकांना हाताशी धरून या प्रस्तावाला खो घातला. त्यामुळे आता थेट आयुक्तांशी संधान साधून शिवसेनेने टेरेसवरील रेस्टॉरंटचा प्रस्ताव मान्य करून घेतला. मुंबईत आधीपासूनच कायद्यातील पळवाटा शोधून गच्चीवरहे रेस्टॉरंट सुरू आहेत. त्यांना ना नियमांची भीती ना कर भरण्याची धास्ती. त्यामुळे खरेतर पालिकेचे नुकसान होत होते. त्यामुळे गच्चीवरील रेस्टॉरंटचे आता स्वागतच करायला हवे. या रेस्टॉरंटना ज्या अटी व शर्तींवर परवानगी देण्यात येणार आहे, त्यात मुख्यत: अन्न शिजविण्यासाठी गॅसचा वापर करू नये, तात्पुरती ताडपत्री लावू नये हे महत्त्वाचे आहे. मात्र या नियमांचे सहज उल्लंघन होण्याची शक्यता आहे. या अटींचे पालन होते का? याची खातरजमा करण्यासाठी जाणारे अधिकारीच आपले खिसे भरून येतील, अशी भीती व्यक्त होणे स्वाभाविक आहे. उघड्यावर अन्न शिजवण्यास मनाई असतानाही रस्त्यावर अन्न शिजविले जाते. अशावेळी गच्चीवरील रेस्टॉरंटवर वॉच कसा ठेवणार? निवासी इमारतीपासून १० मीटर अंतरावर गच्चीवरील रेस्टॉरंटला परवानगी मिळणार आहे. या रेस्टॉरंटवरील आवाजावर नियंत्रण कोण ठेवणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मुंबई शहरात काळानुरूप बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र हे होताना शहरातील नागरिकांची सुरक्षेसह स्वास्थ्याची हेळसांड होणार नाही, याचीही काळजी घ्यायलाच हवी.

Web Title: 'Jivchi Mumbai' on the terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई