न झालेली पवारांची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:36 AM2018-01-09T03:36:00+5:302018-01-09T03:36:16+5:30

विश्व मराठी अकादमीच्या वतीनं पुण्यात ३ जानेवारीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार होता. मनसेप्रमुख राज ठाकरे ही मुलाखत घेणार असल्यामुळे गर्दीचे विक्रम मोडीत निघाले असते.

Interview with Pawar | न झालेली पवारांची मुलाखत

न झालेली पवारांची मुलाखत

Next

- नंदकिशोर पाटील

विश्व मराठी अकादमीच्या वतीनं पुण्यात ३ जानेवारीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार होता. मनसेप्रमुख राज ठाकरे ही मुलाखत घेणार असल्यामुळे गर्दीचे विक्रम मोडीत निघाले असते. पण कोरेगाव-भीमाची दंगल आणि महाराष्टÑ बंदमुळे संयोजकांना मुलाखतीचा तो कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. अनेकांचा हिरमोड झाला. कदाचित हा कार्यक्रम होऊ नये म्हणूनच त्या दंगलीचा कट शिजला असावा, असा संयोजकापैकी काहींचा दावा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिल्याचे समजते!
असो. साहेबांची मुलाखत घ्यायची म्हणून राज यांनी रात्ररात्र जागून जोरदार तयारी केली होती. प्रत्येक मनसैनिकांकडून प्रश्न मागवले होते. बाळा नांदगावकरांना समोर बसवून रंगीत तालीमही करून घेतली होती. समजा ती मुलाखत झालीच असती तर, राज-पवार यांची जुगलबंदी अशी रंगली असती.
राज: (चेहºयावरचा घाम पुसत) समोर काय वाढून ठेवलंय याची मला कल्पना आहे. (टाळ्या) एकवेळ चित्र काढायला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. हात बसलेला असतो ना! असो. कुठून सुरुवात करू?
पवार: कुठूनही करा, पण पोटावरून नको!
(सभागृहात एकच हंशा)
राज: मी पाठीमागून काही करत नाही. जे काय ते समोरासमोर. काहीजण असतात पाठीवर पडलेले. त्याला आपण काय करणार?
पवार: मी व्यंगचित्राबद्दल बोललो. तुम्ही नेहमी माझ्या पोटावरच फटकारे मारत...
राज: बाळकडू, दुसरं काय! इंदिरा गांधींच्या नाकाला आणि शरदरावांच्या पोटाला पर्याय नाही, असं बाळासाहेब म्हणायचे!
(सभागृहात एकच हंशा)
पवार: तेव्हापासून मी कोट घालू लागलो!
राज: आज सकाळी मुंबईहून विमानाने येताना तुम्ही रायगड जिल्ह्यातील काही गावं दाखवत होतात. तिथलं पीकपाणी काय, माणसं कोण, धरणं कोणती वगैरे. हे सगळं कुठून येतं?
पवार: सकाळी लवकर उठल्यावर!
(पवारांनी टाकलेल्या या गुगलीवर राज यांचा चेहरा बघण्यासारखा झाला)
राज: हल्ली मी लवकर उठतो. हवं तर शर्मिलाला विचारा. पण उठून लगेच बाहेर पडायचं म्हणजे जरा... शिवाय, जायचं कुठं?
पवार: मातोश्रीवर चक्कर टाकायची! तेवढेच पाय मोकळे होतात आणि तिकडचं वर्तमानही कळतं. नाही का?
(सभागृहात एकच हंशा)
राज: तेवढ्यासाठी ‘सामना’ आहे की! तसं, बाळासाहेब असताना जायचो मी अधूनमधून. पण ब्रेकफास्टला काय तर वडापाव!
पवार: मी फिरण्याबद्दल बोललो.
राज: तेच ते. अहो, सध्या कुणी काय खायचं हे देखील दुसरेच ठरवतात. नॉनव्हेज चालत नाही म्हणून ते गुजराती आपल्या मराठी माणसांना दारातही उभं करत नाहीत. फुटपाथवर भय्ये पसरलेत...काय मोगलाई आहे का?
पवार: शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्टÑात सर्व जातीधर्माची माणसं गुण्यागोविंदाने नांदली पाहिजेत, ही आजवर व्यक्तिश: माझी भूमिका राहिलेली आहे...
राज: ते जाऊ द्या हो! मला सांगा, आपलं पंतप्रधानपदाचं घोडं नेमकं अडतं तरी कुठं?
पवार: मराठी माणसांच्या एकीत!
राज: माझंही तेच म्हणणं आहे. पण...
पवार: ठरलं तर. आजचं डिनर मातोश्रीवर!
 

Web Title: Interview with Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.