गेल्या वर्षभरात ७ वाघ आणि सुमारे १२ विबट्यांचा मृत्यू शेतातील कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याची धक्कादायक नोंद वन खात्याच्या लेखी आहे. जंगलालगत मानवाचे वास्तव्य धोक्याचे आहेच; पण वन्यप्राणीदेखील गावाच्या दिशेने कूच करू लागल्याने हा संघर्ष आता पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जेवणाच्या ताटावरून शिर्शी गावातील चिमुकल्या खुशीला एका वन्यप्राण्याने उचलून नेले. खुशीच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांशिवाय काहीही हाती न आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील नागरिक प्रंचड दहशतीत वावरत आहेत. तर परवा चिमूर वन परिक्षेत्रालगत एका शेतात अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आलेला पट्टेदार वाघाचा मृतदेह टायगर कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या विदर्भात मानव- वन्यप्राणी संघर्षाची भयावहता अधोरेखित करणारा आहे. गेल्या वर्षभरात ७ वाघ आणि सुमारे १२ विबट्यांचा मृत्यू शेतातील कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहामुळे झाल्याची धक्कादायक नोंद वन खात्याच्या लेखी आहे. जंगलालगत मानवाचे वास्तव्य धोक्याचे आहेच; पण वन्यप्राणीदेखील गावाच्या दिशेने कूच करू लागल्याने हा संघर्ष आता पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या विदर्भात वाघाचे हल्ले वाढले आहेत. माणसं मरत आहेत तर शेतातील कुंपण त्याच वाघाच्या जीवावर उठले आहे. हल्ली शिकारीच्या घटनांवर आळा घालण्यास वन खात्याला बºयापैकी यश आले असले तरी शेतातील वीज प्रवाहामुळे वन्यजीवांचा मृत्यू मात्र चिंतेची बाब आहे. आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात भरडल्या जाणाºया शेतकºयाला हाती आलेले पीक वाचवायचे कसे, हा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी वीज प्रवाही कुंपणाचा आधार घेण्यापलीकडे पर्याय उरत नाही. अर्थात वीज प्रवाही कुंपणाचे समर्थन कदापि करता येणार नाही. वीजप्रवाह सोडणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. मात्र पीक वाचविण्याचा दुसरा मार्ग कोणता, या प्रश्नाचे उत्तर वनखात्याकडे नाही. त्यातून हे प्रसंग उद्भवू लागले आहेत. वर्धा जिल्ह्यात तर अनेकांच्या नरड्यांचा घोट घेणारी वाघीण जेव्हा वीज प्रवाही कुंपणात अडकून मरण पावली तेव्हा ‘त्या’ शेतकºयाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या विरोधात अख्खे गाव वनखात्यावर चालून गेले होते. ज्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यासाठी चंद्रपुरातून हत्तीला पाचारण केले, हैदराबादहून शॉर्प शूटर बोलविला, या मोहिमेवर लाखो रुपये खर्च केले, ती वाघीण जर वीजप्रवाही कुंपणात अडकून मरत असेल तर त्यात त्या शेतकºयाचा दोष तरी काय, अशी संतप्त भावना व्यक्त करीत गावकºयांनी वनाधिकाºयांना फैलावर घेतले. एकंदरीत मानव- वन्यप्राणी संघर्षाची धग आता वनविभागातही पोहोचू लागली आहे. त्यामुळे शेतकºयाच्या पिकाचे नुकसान होणार नाही आणि वन्यजीवही सुरक्षित राहतील, यावर रामबाण उपाय अधिकाºयांना शोधावा लागेल. सौरऊर्जेचे कुंपण हा एक पर्याय असू शकतो. विदर्भात सुमारे ७० टक्के शेती जंगलालगत आहे. याच शेतीवर कास्तकार संसाराचा गाडा हाकतो. त्यामुळे शेतीच्या संरक्षणासाठी सौरऊर्जेचे कुंपण लावण्याकरिता शासनाने अनुदान द्यावे, ही मागणीदेखील पुढे येत आहे. अन्यथा सहा जिल्ह्यात वाघांची वाढलेली संख्या अशा अपघातांची बळी ठरेल आणि शिकारी नव्हे तर आपणच त्याच्या मृत्यूला खºया अर्थाने कारणीभूत ठरू.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.