ठळक मुद्दे स्वस्थता व अस्वस्थता ही वृत्तीशी व पर्यायाने मनाशी निगडित असल्याने ती इतकी व्यापक बाब बनली आहे की, कोणत्याही व्यक्तीला कशाने स्वस्थता लाभेल, अगर ती कशाने अस्वस्थ होईल ते सांगता येऊ नये. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, अमुक-तमुक असा कसलाही भेदाभेद न ठेवता सर्वांमध्ये आढळून येणारी ती बाब आहे. अर्थातच एखाद्याला ज्यामुळे स्वस्थता लाभते, तीच बाब दुसऱ्यासाठी अस्वस्थतादायक ठरू शकते हेही खरे.

  स्वस्थता व अस्वस्थता ही वृत्तीशी व पर्यायाने मनाशी निगडित असल्याने ती इतकी व्यापक बाब बनली आहे की, कोणत्याही व्यक्तीला कशाने स्वस्थता लाभेल, अगर ती कशाने अस्वस्थ होईल ते सांगता येऊ नये. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, अमुक-तमुक असा कसलाही भेदाभेद न ठेवता सर्वांमध्ये आढळून येणारी ती बाब आहे. अर्थातच एखाद्याला ज्यामुळे स्वस्थता लाभते, तीच बाब दुसऱ्यासाठी अस्वस्थतादायक ठरू शकते हेही खरे. कारण एकाच बाबीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो; पण यातही नि:संशय गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रामाणिकतेतूनही जेव्हा स्वस्थता, समाधानाऐवजी अस्वस्थता वाट्यास आलेली दिसून येते तेव्हा मनाच्या आरशातील संवेदनांचे प्रतिबिंब अधिक आखीव-रेखीव, पारदर्शी तसेच स्वच्छ वा नितळ उमटल्याची ती पावती ठरते.
 

  मनाच्या अस्वस्थतेचे हे प्रास्ताविक यासाठी की, प्रामाणिक व पापभीरू व्यक्तीला तिच्या या सद्गुणांपायी कशा अस्वस्थतेला व मनाच्या उलाघालीला सामोरे जाण्याची वेळ येते, याचा एक अनुभव नुकताच येऊन गेला. त्याचे झाले असे की, आमच्या रेणुवहिनींना त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर पडलेली एक नोटांची पुरचुंडी आढळून आली. उचलून पाहता, पंतप्रधान मोदी यांनी एका आदेशान्वये चलनातून बाद केलेल्या त्या नोटा नव्हत्या तर नव्या चलनातले दोन हजार रुपये होते ते. त्यांच्या अस्वस्थतेचा प्रवास सुरू झाला तो तेथूनच. कारण, कुणाचे असावेत ते पैसे, कसे पडले असावेत अशा प्रश्नांनी डोके खाजवून खाजवून त्यांच्या केसांचा अंबाडा कधी सुटून गेला हे त्यांनाही कळले नाही. कुणाचे का असेना, आपल्याला काय त्याचे; आपली तर दिवाळी साजरी झाली असा सामान्य विचार करून स्वस्थता न अनुभवता, त्यांच्या डोळ्यासमोर त्या रस्त्यावर हाती लागलेल्या बेवारस नोटांवरील गांधीजींच्या चित्राच्या जागी अनामिक, अज्ञात चेहऱ्याची आकृती भिरभिरू लागली. ज्याचे कुणाचे असतील हे पैसे, त्याचा जीव किती टांगणीला लागला असेल? कुणा विद्यार्थ्याच्या शाळेच्या फीचे असतील हे पैसे तर त्याचे बिचाऱ्याचे काय झाले असेल? कुणा मोलमजुरी करणाऱ्याचे पडले असतील तर त्याला गरिबाला जेवण गेले असेल का, अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांचे काहुर रेणुवहिनींच्या डोक्यात उठले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरातील साफ-सफाईचे काम त्यांनी दोन-चार दिवसांपासून हाती घेतले होते, तेही आज बाजूला ठेवून त्या याच चिंतेत अस्वस्थ होत्या की, कुणाचे असतील हे पैसे आणि कसे शोधून द्यायचे त्याला त्याचे पैसे? शिवाय, नाहीच सापडला तो तर आपण काय करायचे या पैशांचे?
 

  झाले, नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग खालावतो आहे किंवा रहिवासी भागात फटाके विक्रीस न्यायालयाने बंदी घातल्यासारखे अनेक महत्त्वाचे विषय असताना त्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र न जमणाऱ्या शेजार-पाजारणींची गल्लीत सापडलेल्या पैशाचे काय करायचे, या विषयावर तातडीची बैठक झाली. सुदैवाने, या पैशांची पार्टी करून टाकू आणि विषय संपवू, असे एकीचेही मत नसल्याने पैसे हरविलेल्याचा शोध घेण्याचे ठरले, आणि तेथून सुरू झाला पुन्हा वेगळ्याच अस्वस्थतेचा प्रवास. कारण, या शोधातून एकापेक्षा अनेक दावेदार पुढे आले तर त्यातील खरा कोण, हे कसे पडताळायचे, असा प्रश्न यातून पुढे आला. नोटा किती होत्या, त्यांचे वर्गीकरण कसे आदी प्रश्न करून ते नंतर ठरविता येईल म्हणून अगोदर विषयबाधिताचा शोध सुरू करून ही अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न केला गेला; पण हा शोधही काही सोपा-सहज नव्हताच. त्यासाठी घरातील एका रुग्णाची खोली बदलून त्याला रस्त्यालगतच्या खिडकीजवळ शिफ्ट केले गेले. बिछान्यावर पडल्या-पडल्या किंवा खुर्चीवर बसून रस्त्यावर लक्ष ठेवायचे, की कुणी पैसे हरविलेला शोधाशोध करीत असल्याचे आढळून येते का, असे एकमेव उद्दिष्ट त्याला दिले गेले. त्यापोटी त्याला बसल्याजागी म्हणजे खिडकीजवळच चहापाण्यापासून जेवणापर्यंतच्या साऱ्या सोयी-सुविधांची तजवीज केली गेली. घरातील अन्य सदस्यांनी उजळणी केली की सकाळपासून कोण कोण या रस्त्याने आले-गेले, त्यातील ओळखीचे किती व अनोळखी किती? मग त्यातील ओळखीच्या लोकांना थेट काही न सांगता कडेकडेने चाचपून बघितले गेले की, त्यांचे तर काही हरवले नाही ना? अशात संपूर्ण दिवस निघून गेला; पण हाती काही लागले नाही. सूर्य मावळतीला जाऊ लागला तसतशा आशा धूसर झाल्या आणि रेणुवहिनींच्या अस्वस्थतेत भर पडत गेली. आपला संबंध व अधिकार नसलेल्या या पैशांचे आता करायचे काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. संध्याकाळ झाली, रात्रही सरली; पण विषय मार्गी लागला नाही.
 

  दुसऱ्या दिवशी सहकारिणींसमवेत पुन्हा चर्चेची फेरी झाली. कुणी म्हटले एखाद्या मंदिरात दानपेटीत अर्पण करून द्यावे हे पैसे. पण जे आपले नाही ते दान तरी कसे करावे देवाला? म्हणून प्रस्ताव खारीज केला गेला. अन्यही काही पर्यायांवर चर्चा झाली. अखेर जेवढे पैसे सापडलेत, तेवढेच त्यात स्वत:चे टाकून मिठाई आदी घेण्याचे व अनाथ, निराधार बालकांना ती वाटून त्यांची दिवाळी आनंददायी करण्यावर एकमत झाले, आणि या विषयावरून सुरू झालेला अस्वस्थतेचा प्रवास संपुष्टात आला. एका वेगळ्या कारणातून उद्भवलेली अस्वस्थता सामाजिक जाणिवेचा हुंकार घडविण्यास कारणीभूत ठरली, ही यातील समाधानाची बाब. परंतु कसल्या का होईना, दु:खाने, विवंचनेने अगर उणिवेने आकारास येणारी अस्वस्थता नैतिकतेच्या विचारभानातूनही प्रत्ययास येऊ शकते. त्यातून मनाच्या पप्रामाणिकतेचे, हळुवारतेचे व संवेदनांचे जे स्पंदन घडून येतात ते सारेच काही संपले नसल्याची द्वाही देतात, असेच म्हणायला हवे. दिवाळीच्या दीपोत्सवात या संवेदनांच्या अशा पणत्याच सर्वांच्या मनाचे अंगण उजळून काढो, एवढेच यानिमित्ताने!