संशयाचे भूत भयंकर !

By किरण अग्रवाल | Published: April 5, 2018 07:45 AM2018-04-05T07:45:16+5:302018-04-05T07:45:16+5:30

अविश्वास जिथे आला तिथे नाते जुळू शकत नाही व जुळलेले नाते टिकूही शकत नाही.

The ghost of doubt is terrible! | संशयाचे भूत भयंकर !

संशयाचे भूत भयंकर !

googlenewsNext

नाते कोणतेही असो, कुटुंबातले की अगदी ग्राहक व व्यावसायिकातले; ते विश्वासाच्याच बळावर टिकते. अविश्वास जिथे आला तिथे नाते जुळू शकत नाही व जुळलेले नाते टिकूही शकत नाही. शिवाय, या अविश्वासाच्याच हातात हात घालून संशय फोफावत असतो, जो जरा अधिकचा घातक ठरतो. नात्यातील संशयातून ‘नरेचि केला हीन किती नर’चा प्रत्यय तर वेळोवेळी येतच असतो. अलीकडच्या काळातील सोशल मीडियाचे वाढलेले प्रस्थ व अनेकांचे त्यातील गुंतण्यातूनही असाच संशय बळावण्याच्या घटना वाढत असून, तो नव्याने चिंता तसेच चिंतनाचा विषय बनू पाहत आहे.

प्रगतीचे मापदंड हे तसे नेहमी व्यवस्था व साधन-सामग्रीशी निगडित राहिल्याचे दिसून येते. ही भौतिक प्रगती भलेही डोळे दिपवणारी असली तरी, विचार व वर्तनाने माणूस प्रगत झाला का; या प्रश्नाचे उत्तर अजूनही नकारात्मक आल्याखेरीज राहत नाही. एरव्ही स्त्रीशक्तीच्या पूजेची, तिच्या स्वातंत्र्य व सन्मानाची चर्चा केली जाते; परंतु खरेच का दिले जाते तिला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचे, जगण्याचे स्वातंत्र्य हादेखील तसा सनातन प्रश्न आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियावर ‘माझी कन्या माझा अभिमान’सारख्या मोहिमांत सहभागी होणारे अनेकजण कन्येच्या घराबाहेरील फिरण्या-भेटण्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात जी बंधने घालताना दिसून येतात किंवा ‘सातच्या आत घरात’ अशी अपेक्षा बाळगतात ते कशामुळे? तर जमान्याबद्दलचा अविश्वासच त्यामागे असतो. पण तसे असतानाच पाल्यांवर पालकांचा व कुटुंबीयांवर आपला विश्वास तरी कुठे उरला आहे हल्ली?

अविश्वास व त्याच्या जोडीने उद्भवणाऱ्या संशयाबद्दलचे हे प्रदीर्घ प्रास्ताविक यासाठी की, या बाबींना आता सोशल मीडिया व प्रगत साधनांचा हातभार लागताना दिसून येत आहे. याचसंदर्भात ‘लोकमत’ माध्यम समूहाचे एडिटर इन चीफ श्री. राजेंद्रबाबूजी दर्डा यांनी फेसबुकवरून दिलेला सावधानतेचा इशारा गांभीर्याने घेता येणारा आहे. ‘तुम्ही तुमच्या जोडीदाराचा फोन त्याच्या/तिच्या नकळत तपासून पाहिला तर तो गुन्हा ठरणार असून, त्याबद्दल तुम्हाला एक वर्षाचा तुरुंगवास व ८७ लाखांचा दंड होऊ शकतो...’, असा हा इशारा आहे. ‘सध्या भारतात असा नियम नाही; पण सौदी अरेबियाने व्यक्तीचे खासगी स्वातंत्र्य आणि समाजाच्या नैतिकतेचे रक्षण करण्यासाठी हा कडक कायदा केला आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. इशारा म्हणून तर याकडे पाहता यावेच; पण सवय वा संशयातून जडलेली विकृती म्हणूनही त्याकडे बघता येणारे आहे. कारण अशी तपासणी ही विश्वासाचा घात करणारी तर असतेच असते, शिवाय ती व्यक्तिस्वातंत्र्य आणि नैतिकतेवर आघात करणारीही असते. त्यामुळे वैचारिक संकुचितता सोडून याविषयाकडे बघितले जाणे प्राथम्याचे ठरावे. हे यासाठीही महत्त्वाचे की, अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ होत असून, त्यामुळे उद्भवणारे कुटुंबकलह पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचत आहेत व त्यातून सामाजिक व्यवस्थेलाच धक्के बसताना दिसत आहेत.

आपला मोबाइल तपासणाऱ्या पत्नीला तिच्या पतीने केलेली बेदम मारहाण व नंतर जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीची नाशिकच्या एका पोलीस स्टेशनमध्ये अलीकडेच नोंदविली गेलेली घटना यासंदर्भात पुरेशी बोलकी ठरावी. पतीचा मोबाइल तपासण्याची गरज पत्नीला का भासावी, या साध्या प्रश्नातून यातील संशयाचे पदर उलगडणारे आहेतच; पण सहचराबद्दलच्या अविश्वासाने पती-पत्नीतील नाते किती ठिसूळ वळणावर येऊन थांबले आहे तेदेखील यातून स्पष्ट होऊन जाणारे आहे. अर्थात, ही झाली एक घटना जी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. परंतु असे असंख्य पुरुष व महिला असाव्यात ज्यांना या पद्धतीच्या परस्परांकडून होणाºया तपासणीला सामोरे जाण्याची वेळ येत असावी. नात्यातले, मग ते पती-पत्नी, वडील-मुलगी, भाऊ-बहीण, दीर-भावजई असे कुठलेही असो; त्यातले बंध या अविश्वासापायी किती कमजोर होऊ पाहत आहेत हा यातील चिंतेचा मुद्दा आहे.

याबाबतीत येथे आणखी एका उदाहरणाचा दाखला देता येणारा आहे, जो नोकरदार महिलांच्या मानसिक कुचंबणेकडे लक्ष वेधण्यास पुरेसा आहे. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या व कौटुंबिक तणाव स्थितीतील समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या अनिता पगारे यांनी सोशल माध्यमावरच त्याची चर्चा घडवून आणली आहे. एका नोकरदार महिलेचा पती आपली पत्नी झोपी गेल्यावर तिच्या मोबाइलची चेकिंग करतो आणि मग मध्यरात्री तिला उठवून ‘हे असेच का केले’ वा ‘तसेच का केले’ म्हणून तिची हजेरी घेतो. ती महिला याबद्दल तिच्यापरीने खुलासे करते. सोशल नेटवर्किंगसाठी असे करावे लागते, त्यात काही लफडे नसते... वगैरे समजावण्याचा प्रयत्न करते. परंतु शिव्याशाप व मारझोडीला सामोरे जाण्याखेरीज तिच्या हाती काही लागत नाही, अशी एक हकीकत अनिताने ‘शेअर’ केली आहे. यावर कुठल्या जमान्यात आहोत आपण, असा प्रश्नच पडावा. स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा या केवळ व्यासपीठीय भाषणांपुरत्या व उत्सवी स्वरूपाच्याच राहिल्याचे आणि परिणामी ‘ती’च्या सन्मानाचे, समानतेचे वा अधिकाराचे विषयदेखील पुरुषप्रधानकीच्या अहंमन्य वाटेवर काहीसे मागेच पडत चालल्याचे यातून स्पष्ट होणारे आहे. भुताटकीवर कुणाचा विश्वास असो, अगर नसो; पण संशयाचे भूत मानेवर बसले की ते मात्र कोणत्याही नात्यात आडकाठी आणल्याशिवाय राहात नाही हेच यातून लक्षात घ्यायचे. तेव्हा, विश्वासाचा अनुबंध दृढ करीत नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट करूया... हाच यानिमित्तचा सांगावा !
 

Web Title: The ghost of doubt is terrible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.