फिफा विश्वचषक : भारतीय फुटबॉलला ‘संजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 03:13 AM2017-10-05T03:13:56+5:302017-10-05T03:14:21+5:30

१७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉलचा थरार उद्या शुक्रवारपासून भारतात सुरू होत आहे. देशाच्या क्रीडा विश्वात या खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा हा प्रयत्न आहे.

FIFA World Cup: Indian football 'Sanjivani' | फिफा विश्वचषक : भारतीय फुटबॉलला ‘संजीवनी’

फिफा विश्वचषक : भारतीय फुटबॉलला ‘संजीवनी’

Next

अयाज मेमन, संपादकीय सल्लागार
१७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉलचा थरार उद्या शुक्रवारपासून भारतात सुरू होत आहे. देशाच्या क्रीडा विश्वात या खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने आयोजनासाठी सर्वतोपरी मदतीचा हात दिला. मोठ्या प्रमाणावर टीव्ही प्रसारण होणार असल्याने फुटबॉलचे जुनेजाणते चाहते तर आनंदी आहेतच पण युवावर्ग मोठ्या संख्येने या खेळाकडे वळणार आहे.
भारतीय संघ देखील स्पर्धेत सहभागी होणार. पण ही केवळ हजेरी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामुळे भारतीय प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचविण्याचे काम निश्चितपणे होणार आहे. भारत जेतेपदापर्यंत मुसंडी मारु शकतो, अशी आशा बाळगणे अतिशयोक्ती ठरेल. पण या स्तरावर निव्वळ सहभाग असणे हे देखील नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना दीर्घकाळासाठी लाभदायी ठरू शकेल. ही ज्युनियर्स खेळाडूंची स्पर्धा असली तरी खेळाचा स्तर अतिशय दर्जेदार असेल यात शंका नाही. जगभरात फुटबॉल खेळाडूंची शोधमोहिम ८ ते १२ या वयोगटात सुरू होते. या खेळाडूंवर मेहनत घेऊन त्यांच्यातील टॅलेंट हेरले जाते. ही मुले १६-१७ वर्षांत पदार्पण करताच त्यांच्यापैकी काहीजण क्लब आणि देशासाठी खेळण्यास सज्ज होतात. या स्पर्धेच्या निमित्ताने युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशियातील बलाढ्य युवा खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा अमूल्य असा अनुभव भारतीय खेळाडूंना घेता येणार आहे. या निमित्ताने क्रीडाविश्वातील युवाशक्तीला एका सूत्रात बांधण्याचे देखील काम होणार आहे.
भारतात फुटबॉलची स्थिती फारशी चांगली नाही. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या १५ वर्षांत या खेळाची लोकप्रियता भरास आली होती. खरेतर १९५० साली भारतीय फुटबॉल संघाने फिफा विश्वचषकाची पात्रता देखील गाठली होती. नंतर १९५६ साली भारतीय संघ आॅलिम्पिकसाठीही पात्र ठरला होता. त्यावेळी भारत चौथ्या स्थानावर राहिला. त्याच वर्षी १९५६ च्या आशियाडचे सुवर्ण भारतानेच जिंकले. १९६२ च्या आशिया चषकात पुन्हा एकदा सुवर्णमय कामगिरी झाली होती. भारतीय फुटबॉलची ताकद वाढण्यामागे खरे कारण होते क्लब संस्कृती. दुर्दैवाने ते चित्र पालटले. प्रतिभावान खेळाडूंकडे लक्ष देण्यात व्यवस्था कमी पडली. प्रशासनात राजकारण शिरल्याने खेळाडू एकाकी पडला. भारतीय फुटबॉल एका मर्यादेत अडकला. दरम्यान भारतीय फुटबॉल माघारत असल्याची काहींना जाणीव झाली, पण तोवर बरेच पाणी वाहून गेले होते. बहुतेक देशांनी फुटबॉलमध्ये वेगाने प्रगती केली. भारतीय फुटबॉलला मात्र पाहिजे तशी प्रगती करता आली नाही. १९५० ते ६० हा सुवर्णकाळ मानल्यास त्यानंतर चार दशके भारत फुटबॉलमध्ये संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. गेल्या दशकात भारतीय फुटबॉलला दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण परंपरागत विचारसरणी असणाºया राष्ट्रीय महासंघाला गतिशीलता प्रदान करणे सोपे नाही. जागतिकीकरणामुळे फुटबॉलची शक्ती खºया अर्थाने कळली. या समीकरणाचा भारतीय फुटबॉलला कसा लाभ मिळवून देता येईल, हे अ. भा. फुटबॉल महासंघाच्या प्रशासकांसाठी आव्हान आहे. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणे म्हणजे मोठ्या महत्त्वकांक्षा व दृष्टिकोन पूर्ण झाला असे म्हणण्यापेक्षा आयोजनाने भारतीय संस्कृतीला आपले पावित्र्य अधोरेखित करता येईल.

Web Title: FIFA World Cup: Indian football 'Sanjivani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा