विशेष लेख: अन्वयार्थ >> समुद्राखालच्या तारा ठरवतात आपले डिजिटल अस्तित्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:00 AM2024-03-19T11:00:41+5:302024-03-19T11:02:04+5:30

१४ दशलक्ष किलोमीटर लांबीच्या ५५२ तारा समुद्राखालून गेलेल्या आहेत. जगाचे इंटरनेट सुरळीत राहावे यासाठी ६० जहाजे नेहमीच सज्ज असतात.

Featured Article on Undersea cable which Determine our Digital Existence | विशेष लेख: अन्वयार्थ >> समुद्राखालच्या तारा ठरवतात आपले डिजिटल अस्तित्व!

विशेष लेख: अन्वयार्थ >> समुद्राखालच्या तारा ठरवतात आपले डिजिटल अस्तित्व!

साधना शंकर, लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील निवृत्त अधिकारी

तांबड्या समुद्राखालील तारा तुटल्यामुळे आशिया आणि आफ्रिकेतील इंटरनेट सेवा खंडित होत आहे. इंटरनेटच्या ४० वर्षांच्या प्रवासात या सेवेने पूर्णपणे काम थांबवले असे कधी झाले नाही. काहीवेळा काही भागात सेवा खंडित होत असे, परंतु ती संपूर्ण कोलमडणार नाही अशाच रीतीने तिची उभारणी केली गेली. 

असंख्य संगणकांचे विखुरलेले जाळे, प्रचंड संख्येने असलेले राउटर्स, काही अब्ज किलोमीटरच्या तारांनी जोडली गेलेली प्रणाली म्हणजे इंटरनेट. या तारांचा बराच मोठा भाग आंतर खंडात सागर आणि महासागर ओलांडून पोहोचत असतो. जगभरात ९९ टक्के इंटरनेट वाहतूक पाण्याखालील तारांच्या प्रणालीतून होते. 

आपण इंटरनेटचे वापरकर्ते प्रत्यक्षात ते कसे चालते याचा फारसा विचार कधी करत नाही; परंतु त्यांच्या कार्याला प्रत्यक्षातील जाळ्याचा आधार लागतो हे वास्तव होय. जेव्हा काही तारा विस्कळीत होतात तेव्हा पर्यायी मार्गातून माहितीचे संवहन केले जाते. आपल्यासारख्या वापरकर्त्यांना त्यात काही अडथळा आलेला आहे हे जाणवतही नाही.

उपलब्ध माहितीनुसार, दर तीन दिवसातून एक तरी तार तोडली जाते. त्यामागची कारणे वेगवेगळी असतात, परंतु माहिती पर्यायी मार्गाने नेली जात असल्यामुळे वापरकर्त्यांना त्याची झळ सोसावी लागत नाही. १४ दशलक्ष किलोमीटर इतक्या लांबीच्या ५५२ तारा समुद्राखालून गेलेल्या आहेत. आणि तार तोडली गेली तर अडचणीत आलेली माहिती पोहोचवण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध होते. दुसरे म्हणजे सुमारे ६० दुरुस्ती जहाजांचा ताफा तुटलेल्या तारा जोडण्यासाठी नेहमीच सज्ज असतो.

तांबड्या समुद्राखाली तारा महत्त्वाच्या अशासाठी की त्या संख्येने ११ असून युरोपमधून आशियामध्ये जाणारी जवळपास सगळी माहिती ही तांबड्या समुद्राच्या खालून गेलेल्या या तारा पोहोचवत असतात. राजकारण आणि संघर्षाची झळ जशी जमिनीवरील तारांना पोहोचते त्याचप्रमाणे या समुद्राखालून जाणाऱ्या तारांनाही बसते.

तारा का तुटल्या याची कारणे शोधली जात आहेत आणि त्या दुरुस्तही केल्या जातील; परंतु अशा प्रकारे इंटरनेट सेवा खंडित होण्यातून काही इशारे मिळत आहेत. वापरकर्त्यांना इंटरनेटलासुद्धा काही भौतिक मर्यादा आहे हे जाणवू लागले आहे. शेवटी डिजिटल जगदेखील भौतिक जगाच्या पायावरच उभे असते.

डेटा वाहून नेणाऱ्या समुद्राखालच्या तारा इंटरनेटचे काम सुरळीतपणे चालणे, ते विस्तारणे यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच भागात अजून इंटरनेट पोहोचलेले नाही. दूर अंतरावर जमिनीवरून तारा टाकणे अतिशय कठीण असते; कारण वेगवेगळ्या प्रकारच्या उंचसखल प्रदेशातून त्या न्याव्या लागतात; मात्र समुद्राखालून तारा टाकणे हे खर्चीकच काम आहे. प्रारंभिक टेलिकॉम कंपन्यांनी या तारा टाकण्याचे काम केले, पण अलीकडे गुगल आणि मेटा यासारख्या क्लाउड कंपन्या हे काम करत आहेत.  

डेटा प्रवाह प्रत्यक्ष जगातील संघर्षामुळे खंडित होऊ नये याची काळजी हे जाळे संचालित करणारे घेतात; परंतु भू-राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असून भविष्यकाळात कदाचित अशी परिस्थिती राहणार नाही. इंटरनेटच्या भौतिक साधनांवर कोणत्या देशाचे किंवा कंपनीचे नियंत्रण आहे याला भविष्यात अतिशय महत्त्व येईल. आपल्या दिनचर्येत इंटरनेटवरचे अवलंबित्व झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे या सेवेची भौतिक यंत्रणा ही पुन्हा एकदा महत्त्वाची ठरेल. ती ठीक राहिली तरच डिजिटल जगताचे कार्य सुरळीत चालू शकेल.

sadhna99@hotmail.com

 

Web Title: Featured Article on Undersea cable which Determine our Digital Existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.