कार्यकारिणी जम्बो, आता गरज पक्षकार्य वाढीची!

By किरण अग्रवाल | Published: November 26, 2023 11:26 AM2023-11-26T11:26:29+5:302023-11-26T11:27:02+5:30

Congress : आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अकोला जिल्हा काँग्रेसची विस्तारित कार्यकारणी जाहीर केली.

Executive jumbo, now the need to increase party work! | कार्यकारिणी जम्बो, आता गरज पक्षकार्य वाढीची!

कार्यकारिणी जम्बो, आता गरज पक्षकार्य वाढीची!

- किरण अग्रवाल

आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अकोला जिल्हा काँग्रेसची विस्तारित कार्यकारणी जाहीर केली गेली असून, आता नेत्यांसोबतच कार्यकर्ता जोडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाचे कार्य सामान्यांपर्यंत पोहोचविले जाण्याची अपेक्षा वाढून गेली आहे

निवडणुकांच्या हंगामात सर्वच राजकीय पक्षांमध्ये भरती ओहोटी होत असते, संघटनात्मक पातळीवर नव्या नेमणुका केल्या जातात; पक्ष विस्ताराचा हेतू यामागे असतो. अकोला जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित जम्बो कार्यकारणीकडे याच दृष्टीने पाहता येणारे असले तरी, या पक्षाची स्थानिक पातळीवरील अवस्था पाहता मैदान मारायचे तर नेत्यांसोबत कार्यकर्ताही जोडावा लागणार आहे हे संबंधितांना विसरता येऊ नये.

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पाठोपाठ महाराष्ट्राचाही नंबर असून विधानसभेपूर्वी लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आपल्याकडेही सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुती समोर महाआघाडीचे तगडे आव्हान राहील असे चित्र असून, दिवाळीही सरल्याने आता खऱ्या अर्थाने राजकीय दंड बैठका सुरू होतील. निवडणूकपूर्व राजकीय मशागत ज्याला म्हटले जाते त्या तयारीला सर्वच पक्षांनी प्रारंभ करून दिला असून, अकोला जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित जम्बो कार्यकारिणीची घोषणा हादेखील त्याचाच एक भाग म्हणता यावा.

राज्याच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदे भूषविणाऱ्या नेत्यांची उज्वल परंपरा अकोला काँग्रेसला लाभली असली तरी या पक्षाची सद्य संगठनात्मक स्थिती तितकीशी समाधानकारक नाही हे लपून राहिलेले नाही. राजकीय वारसा अगर गंध असणाऱ्या भल्या भल्या नेत्यांना बाजूस सारून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासकीय सेवेतून आलेल्या अशोक अमानकर यांच्याकडे सोपविली खरी, पण येथील विस्कटलेली घडी बसलेली दिसत नाही. अमानकर यांच्या जिल्हाध्यक्ष पदाला सुरुंग लावणाऱ्या घडामोडी अलीकडे वाढल्याचेही दिसून येत आहेत. बैठक वा कसला कार्यक्रम असला तर व्यासपीठावर खुर्चीला खुर्ची लावून बसणारे नेते नंतर आपापले सवतीसुभे सांभाळून वाटचाल करतात हा अनुभव आता नित्याचा बनू पाहतो आहे. काँग्रेसच्या नावावर, पदावर व तिकिटावर समृद्धता लाभलेले नेते किंवा त्यांची पुढील पिढी ''अहं समर्पयामि''च्या भूमिकेतून बाहेर पडताना दिसत नाही त्यामुळे व्यासपीठांवर गर्दी दिसत असली तरी समोर सतरंज्या उचलायला कुणी राहिलेले दिसत नाही ही वास्तविकता आहे.

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला अनेक मुद्दे हाती घेऊन लोकांसमोर जाता येणारे आहे, परंतु स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची वानवा हा सर्वात मोठा अडचणीचा मुद्दा ठरला आहे. एखाद्या विषयावर पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना तेच ते मोजके चेहरे बघावयास मिळतात ते त्याचमुळे, कारण ना नेते सांभाळले गेलेत; ना कार्यकर्ते जोडले गेलेत. युवा नेते राहुल गांधी यांच्या या परिसरातून गेलेल्या भारत जोडो यात्रेने जनमानसात राजकीय पर्यायी मानसिकता आणि आश्वासकता निर्माण केली असली तरी ती टिकवून ठेवण्यासाठी व त्यात भर घालण्यासाठी पुरेसे प्रयत्नच होताना दिसत नाहीत. ''मी व माझ्या पलीकडे'' गेल्याखेरीज हे होणार नाही.

अमानकर यांनी आता विस्तारित जिल्हा कार्यकारणी घोषित केली यात प्रत्येकी सुमारे पाच ते सात डझन सरचिटणीस, चिटणीस, सहचिटणीस आदि पदाधिकारी आहेत. यात सर्वच गटातटांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत असला तरी पक्ष कार्यक्रमात हे एवढे पदाधिकारी सर्व उपस्थित राहिले तरी पुरे असे म्हणण्यासारखी एकूण स्थिती आहे. पक्षाचा विस्तार करायचा व गतकाळात जे गमावले ते आगामी निवडणुकीत मिळवायचे तर घरा घरापर्यंत पक्ष पोहोचवावा लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांचीही दमदार फळी तयार करावी लागेल. जम्बो कार्यकारणी हे त्या दिशेनेच टाकलेले एक पाऊल आहे हे खरे, पण या पदाधिकाऱ्यांना निश्चित कार्यक्रम घेऊन सक्रियपणे जनतेपुढे जावे लागेल. ते होणार आहे का हा खरा प्रश्न आहे?

महत्त्वाचे म्हणजे, महाआघाडी अंतर्गत लोकसभेची असो की विधानसभेची, कोणती जागा कोणता पक्ष लढवणार हे सूत्र अद्याप ठरायचे आहे. त्यामुळे त्यासाठी सर्वांनीच तयारी करून ठेवणे स्वाभाविक असले तरी व्यक्तिगत तयारी जेव्हा स्पर्धेच्या दृष्टिकोनातून हमरीतुमरीवर येते तेव्हा त्यातून पक्षाचीच नाचक्की झाल्याखेरीज राहत नाही. असाच प्रकार अकोला काँग्रेसमध्ये अलीकडेच घडून गेला आहे. तेव्हा या पक्षांतर्गत बाबी चव्हाट्यावर आणण्याचे सोडून पक्षाला लोकमानसात रुजविण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे. मोठ्या प्रमाणात नेमल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. ते प्रामाणिकपणे झाले तर महाआघाडीचे यश दृष्टीपथात आल्याखेरीज राहणार नाही.

सारांशात, आंदोलन व उपक्रमात अकोला काँग्रेस काहीशी मागे असली तरी जिल्हा काँग्रेसची विस्तारित जम्बो कार्यकारणी घोषित झाल्याने त्याचा उपयोग पक्ष विस्तारासाठी घडून येणे अपेक्षित आहे. आगामी काळात तसे होते का, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

Web Title: Executive jumbo, now the need to increase party work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.