सबकुछ मुंबई

By admin | Published: May 23, 2017 06:55 AM2017-05-23T06:55:10+5:302017-05-23T06:55:10+5:30

रविवारी रात्री अत्यंत थरारक सामन्यात अवघ्या एका धावेने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला नमवून मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएल चषक पटकावला.

Everything Mumbai | सबकुछ मुंबई

सबकुछ मुंबई

Next

रविवारी रात्री अत्यंत थरारक सामन्यात अवघ्या एका धावेने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला नमवून मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएल चषक पटकावला. विशेष म्हणजे यासह मुंबईने तीनवेळा आयपीएल ट्रॉफी पटकावणारा पहिला संघ असे बिरुदही मिळवले. त्याचप्रमाणे, पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या पुणेकरांनीही यावेळी क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. दखल घेण्याची बाब म्हणजे दोन्ही संघांनी सुरुवातीचा आणि शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळूनच यंदाच्या सत्राची सांगता केली. त्यात, हे दोन्ही संघ यंदा तब्बल चार वेळा भिडले. त्यामुळे यंदा स्पर्धेवर एकप्रकारे महाराष्ट्राची छाप पडली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मुंबईने सलामीचा सामना पुण्याविरुद्ध गमावल्यानंतर जबरदस्त सातत्य राखताना सलग सहा सामने जिंकून प्रतिस्पर्धी संघांना एकप्रकारे इशाराच दिला. यानंतर पुन्हा त्यांचा पराभव झाला तो पुण्याविरुद्धच. मात्र, यानंतर पुन्हा मुंबईकरांनी सलग तीन सामने जिंकत बाद फेरी निश्चित केली. अखेरचा साखळी सामना होईपर्यंत केवळ मुंबईनेच प्ले आॅफमधील स्थान निश्चित केले होते. तरी, पुण्याविरुद्धचे अपयश मात्र त्यांना सलत होते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा पुण्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर एलिमिनेटर खेळावे लागलेल्या मुंबईने कोलकाताला चांगलाच दणका देत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र गेल्या तिन्ही पराभवाचे हिशेब चुकते करताना मुंबईने पुण्याला एका धावेने नमवून ट्रॉफी पटकावली. रोहित शर्माचे कल्पक नेतृत्वही लक्षवेधी ठरले. एकीकडे भारताचा कर्णधार विराट कोहली अपयशी ठरत असताना दुसरीकडे रोहितने शानदार नेतृत्व करून संघाला अव्वलस्थानी नेले. फिक्सिंगमुळे दोन वर्षांच्या बंदीला सामोरे गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्याऐवजी गुजरात लायन्स आणि पुणे संघ खेळले. आता पुढील वर्षी चेन्नई - राजस्थान यांचे पुनरागमन होणार असल्याने गुजरात - पुणे यांना कदाचित बाहेर व्हावे लागेल. मात्र या दोन्ही संघांनी चांगली छाप पाडली. गेल्यावर्षी गुजरात गुणतालिकेत अव्वल राहिले, तर यंदा पुणे उपविजेते ठरले. टी-२० क्रिकेट सुरुवातीला गोलंदाजांचा कर्दनकाळ समजले जात होते. परंतु, यंदाचा आयपीएल मुंबईने गोलंदाजांच्याच जिवावर जिंकला. टी-२०च्या निमित्ताने गोलंदाज अनेक प्रयोग करू लागले. यामुळे फलंदाजांची कसोटीही लागली.

Web Title: Everything Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.