पक्ष गेला, जिद्द कायम!! जाणाऱ्या मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 09:56 AM2024-02-26T09:56:40+5:302024-02-26T09:57:07+5:30

वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते.

Editorial: The ncp party is gone, the determination remains!! Sharad Pawar made the main characters to blow the trumpet | पक्ष गेला, जिद्द कायम!! जाणाऱ्या मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली 

पक्ष गेला, जिद्द कायम!! जाणाऱ्या मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली 

'एक तुतारी द्या मन आणुनी', असे खरे म्हणजे शरद पवार म्हणालेले नव्हते. पण, निवडणूक आयोगाने त्यांच्या हातात ही तुतारी आणून दिली आहे. आता ती स्वप्राणाने फुंकण्याचे आव्हान शरद पवारांसमोर आहे. स्वतःच स्थापन केलेला पक्ष हातातून गेला आहे. चिन्ह गेले आहे. डझनभर आमदार वगळता सगळे आमदार गेले आहेत. 'आणखी काही जाणार आहेत', अशा बातम्या येत आहेत, अशा बातम्यांतील मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली हा मुद्दा वेगळा, पण चित्र एकूण सोपे नाही. 

वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते. छत्रपती शिवरायांच्या रायगडाचे रूप बदलले आणि शिवरायांच्या इतिहासाची मांडणीही बदलत गेली. रायगडाला जाग असतेच, पण त्याची 'याद' कोणाला आणि कधी येईल, याचे आडाखे मात्र बदलत असतात. इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी आणि यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे असे अनेक बदल या काळात रायगडाने पाहिले. सगळे बदलले. एक मात्र कायम आहे. शरद पवार तेव्हाही झुंजत होते. आजही झुंज देत आहेत. 

१९७८मध्ये मुख्यमंत्री झालेल्या पवारांचे पुलोद सरकार इंदिरा गांधींनी १९८० मध्ये बरखास्त केल्यानंतरही शरद पवार दिल्लीला थेट आव्हान देत राहिले. पराभूत झाले. सोबतचे बहुतेक सगळे शिलेदार सोडून गेले, तरीही पवार लढत राहिले. आजही पवार लढताहेत. या लढाईचा निकाल काय लागेल, हे पवारांच्या हातात नाही. बैलजोडी, गायवासरू, चरखा, हाताचा पंजा, घड्याळ अशा चिन्हांनंतर वयाच्या ८४व्या वर्षी शरद पवार तुतारी फुंकत आहेत, ही घटना लक्षणीय अशीच. शरद पवारांचा राजकीय प्रवास एकरेषीय नाही. ते फार लवकर मुख्यमंत्री झाले खरे, मात्र दिल्लीला आव्हान देण्याच्या त्यांच्या सततच्या पवित्र्यामुळे ते अनेकदा सत्तेपासून दूर फेकले गेले. आधी इंदिरा गांधींना त्यांनी आव्हान दिले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी विक्रमी जागा जिंकत पंतप्रधान झाले. राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते पुन्हा मुख्यमंत्रीही झाले. नंतर सोनिया गांधींना थेट आव्हान दिल्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आणि पक्षातूनही बाहेर पडावे लागले. 

स्वतःचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला तो १९९९मध्ये, जन्मल्यापासून सत्तेचा चमचा तोंडात असण्याची सवय असल्याने २०१४ मध्ये पवारांच्या पक्षाला धक्का बसला, एकेक 'सरदार' त्यांना सोडून गेले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर या 'आउटगोइंग ने कळस गाठला. मात्र, इडीला आव्हान देत शरद पवार उभे राहिले. त्यानंतर ते पावसात असे भिजले की त्यांच्या राजकीय आयुष्यातील अनेक डागही त्यामुळे धुऊन निघाले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होणे हा पुलोदपेक्षाही अतिशय वेगळा प्रयोग होता. दिल्लीला पुन्हा आव्हान देत पवारांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि ते पुन्हा एकदा पाडले गेले! त्यानंतर जसे सगळे शिलेदार त्यांना सोडून गेले, तसेच पुन्हा घडले, आणि, आहे त्यांना सोबत घेऊन पवार आता पुन्हा उभे राहिले आहेत. 'हे बळ येते कुठून?', असे विचारल्यावर पवार म्हणाले होते, "साहित्य, संगीत, कला आणि खेळ या माझ्या आंतरिक प्रेरणा आहेत !" हे त्यांचे वेगळेपण खरे, पण आज त्यांच्या हातात वय नाही. शिवाय, विरोधकांकडे सत्ता, यंत्रणा, मनुष्यबळही आहे.

 पवारांसोबत सहानुभूती असेलही, तिचे रूपांतर मतांमध्ये करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पवारांचे राजकारण नेहमीच अनपेक्षित असते म्हणूनही असेल कदाचित, पण सुरुवातीला शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या संघर्षाकडेही अनेकजण संशयाने पाहत होते. मात्र, आता हे प्रकरण पुढच्या टप्यावर गेले आहे. अजित पवारांची प्रतिमा धडाकेबाज राजकारण्याची आहे. त्यांच्याकडे नेते आहेत. सत्ता आहे. शरद पवारांकडे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच सहानुभूती आहे. शिवाय, आमदार कुठे गेले, ते समजते. मतदार मात्र आमदारांसोबत जातातच, असे नाही. या मतदारांवर शरद पवारांची भिस्त आहे. शरद पवारांची 'सेकंड इनिंग' कशी असेल, हे यथावकाश समजेलही, पण 'मी अजून जहाज सोडलेले नाही', असे सांगत पवारांनी या वयात तुतारी मात्र फुंकली आहे!

Web Title: Editorial: The ncp party is gone, the determination remains!! Sharad Pawar made the main characters to blow the trumpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.