सांग, तू नाही तर कोण? द्रविड ध्रुव, सरफराज, गिल, यशस्वी, दीप यांना विचारत होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:30 AM2024-02-28T08:30:38+5:302024-02-28T08:34:57+5:30

भारताचे अनेक अनुभवी खेळाडू या मालिकेदरम्यान जायबंदी झाले, काहींनी रजा घेतली. मालिका सुरू होतानाच दुखापतींनी भारतीय संघाला छळले.

Editorial: Tell me, if not you, who? Dravid was asking Dhruv, Sarfraz, Gill, Yashasvi, Deep... | सांग, तू नाही तर कोण? द्रविड ध्रुव, सरफराज, गिल, यशस्वी, दीप यांना विचारत होता...

सांग, तू नाही तर कोण? द्रविड ध्रुव, सरफराज, गिल, यशस्वी, दीप यांना विचारत होता...

सध्याचा काळच असा आहे की, केव्हा काय व्हायरल होईल याला काही धरबंद  नाही. काल जे शिखरावर होतं, ते आज विस्मृतीतही गेलेलं असतं. मात्र, काही गोष्टी अपवाद असतात आणि काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरतात. इंग्लंड संघावरच्या मालिका विजयानं भारतीय क्रिकेटनंही पुन्हा तेच सिद्ध केलं की, या बोलघेवड्या काळातही केवळ गुणवत्ता, मेहनत, सातत्य आणि ध्यास, याच गोष्टी ‘विजयी’ होण्यासाठी पुरेशा ठरतात! भारतीय फलंदाज शुभमन गिलनं चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान  प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं एक वाक्य पोस्ट केलं होतं, त्यात तरुण खेळाडूंना उद्देशून द्रविड म्हणतात, ‘इफ नॉट यू, देन हू? इफ नॉट नाऊ, देन व्हेन?’ तरुण खेळाडूंना हा थेट सवाल होता  ‘आज नाही तर कधी आणि तू नाही, तर कोण?’ भारताचे अनेक अनुभवी खेळाडू या मालिकेदरम्यान जायबंदी झाले, काहींनी रजा घेतली. विराट कोहलीची अनुपस्थिती छळणार अशी चिन्हं होतीच. पुजारा-रहाणे या मातब्बरांना बाहेर बसवून निवड समितीने नव्या खेळाडूंवर भिस्त ठेवली. मालिका सुरू होतानाच दुखापतींनी भारतीय संघाला छळले.

कर्णधार रोहित शर्मासमोर नव्या अननुभवी खेळाडूंना सोबत घेऊन चालण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. याच क्रिकेट मालिकेत पदार्पण करणारे ध्रृव जुरेल, सरफराज खान, आकाश दीप हे एकीकडे, तर दुसरीकडे यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादवसारखे कसोटीत दावेदारी सांगणारेही तसे नवखेच. त्यात समोर उभा ठाकलेला इंग्लंडचा बेझबॉल चक्रव्यूह. बेझबॉलच्या रणनीतीवर कसोटी सामने जिंकतच इंग्लंड संघ भारतात आला होता. अशा परिस्थितीत युवा भारतीय संघाला प्रशिक्षक द्रविड विचारत होते, तू नाही तर कोण? तरुण भारतीय खेळाडूंसमोर स्वत:ला सिध्द करण्याचं आव्हान होतं. एकतर कसोटीत संधी मिळणं मुश्कील आणि मिळूनही स्वत:ला सिध्द करता आलं नाही तर पुन्हा ते कवाड कधी उघडेल याची काही खात्री नाही. या देशात अनेक गुणवान खेळाडू क्रिकेटसाठी जीव ओततात. एरवी बिहारमधल्या सासाराम  गावच्या एका क्रिकेटवेड्या तरुणानं द्रविड यांच्या हस्ते भारतीय  ‘टेस्ट कॅप’ स्वीकारली असती का? - हे होत असताना त्याच्या दोन लहान बहिणी आणि आई डोळ्यात पाणी आणून मैदानात उभ्या असतात. कारगील युद्धात लढलेल्या सैनिकाचा त्याच काळात जन्मलेला मुलगा ध्रुव मॅचविनर ठरतो तो केवळ क्रिकेटध्यासापायी. तीच गोष्ट दुनियेच्या लेखी संपलेल्या सरफराज खानची. तो कधीच भारतीय संघात पोहोचणार नाही असं वाटत असताना त्याला संधी मिळाली आणि त्यानं आपलं नाणं वाजवून दाखवलं. तसंही नव्या काळात अशा वेदनांच्या कथा यशोगाथा म्हणून सर्रास विकल्या जातात. पण या नव्या युवा खेळाडूंना स्वत:च्या संघर्षाचं भांडवल करण्याची गरज नाही, त्यांनी स्वत:ची खरी ओळख आपल्या कामगिरीने मैदानावर सिध्द केली. आपल्या कष्टांना गोंजारत न बसता त्यांनी अत्त्युत्तमाचा ध्यास घेतला. त्यांचं यश हे आज  आपल्या स्वप्नांसाठी रक्ताचं पाणी करायला निघालेल्या खेड्यापाड्यातल्या तरुण भारताचं यश आहे. त्या यशाचं काही श्रेय बीसीसीआयलाही द्यायला हवं.

दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातल्या शहरांपर्यंत क्रिकेटसुविधा पाेहचवण्याचे गेल्या अनेक वर्षांचे प्रयत्न आता फळास येत आहेत. क्रिकेट झिरपलं त्यावेगानं जर या सुविधाही पोहोचल्या तर अनेक तरुणांसाठी संधीची कवाडं उघडतील.  म्हणूनच बीसीसीआयने बड्या खेळाडूंवर देशांतर्गत स्पर्धा खेळण्यासाठी वाढवलेला दबाव उचित ठरतो. जे खेळाडू रणजी ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेट खेळायला तयार नाहीत, केवळ आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच खेळणार म्हणतात त्यांच्यावर कारवाईची चर्चा सुरूच झाली आहे. सुनील गावसकरही उघड सांगतात की ज्या खेळानं तुम्हाला नाव प्रसिध्दी पैसा दिला त्याची परतफेड म्हणून तरी बड्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवं. क्रिकेटपेक्षा मोठं कुणीच नाही हे सूत्रच देशात अधिकाधिक उत्तम क्रिकेट खेळाडू घडवत आहे. गेल्या ३० वर्षांत क्रिकेटमध्ये झालेला हा बदल आपल्या डोळ्यासमोर आहे.

एकेकाळी मुंबईकर मराठी मध्यमवर्गीय प्राध्यापकाचा मुलगा भारतीय क्रिकेटच्या गळ्यातला ताईत झाला, तेव्हा क्रिकेट बड्या शहरांपुरतं मर्यादित होतं. आता तीन दशकानंतर बिहारमधल्या सासारामजवळच्या लहानशा गावातल्या सरकारी शाळेतल्या शिक्षकाचा मुलगा भारतीय कसोटीत शानदार पदार्पण करत संघाच्या विजयात योगदान देतो ही गोष्ट बदलत्या क्रिकेटचीच नव्हे, ती बदलत्या समाजाचीही गोष्ट आहे. तिचे नायक  विचारणारच स्वत:ला, की आज नाही तर कधी? मी नाही तर कोण?

Web Title: Editorial: Tell me, if not you, who? Dravid was asking Dhruv, Sarfraz, Gill, Yashasvi, Deep...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.