आपण सारे भोजनभाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:02 AM2018-05-08T00:02:30+5:302018-05-08T00:02:30+5:30

माझ्या राशीला मिष्टान्नयोग आहे, हे मागच्या रविवार पुरवणीतील भविष्य वाचल्यापासून गेला आठवडाभर मला काय खाऊ आणि काय नको असं झालं आहे. वर्तमानपत्रात राशी भविष्य लिहिणारे खरोखरच मनकवडे असले पाहिजेत. आपल्या मनातील नेमकी गोष्ट त्यांना आपोआप कळते!

Editorial Artical | आपण सारे भोजनभाऊ!

आपण सारे भोजनभाऊ!

Next

- नंदकिशोर पाटील
माझ्या राशीला मिष्टान्नयोग आहे, हे मागच्या रविवार पुरवणीतील भविष्य वाचल्यापासून गेला आठवडाभर मला काय खाऊ आणि काय नको असं झालं आहे. वर्तमानपत्रात राशी भविष्य लिहिणारे खरोखरच मनकवडे असले पाहिजेत. आपल्या मनातील नेमकी गोष्ट त्यांना आपोआप कळते! कधीमधी मुखभंग होतो म्हणा. पण ते भविष्य आपल्यासाठी नव्हते, अशी समजूत करून त्याकडे दुर्लक्ष करायचे अन् न चुकता दुसऱ्या दिवशीच्या पेपरातील राशी भविष्यावर चोरटी नजर मारून घ्यायची! आपण कितीही विवेकवादी वगैरे असलो तरी राशी भविष्याच्या कॉलमवर आपली नजर न चुकता पडते म्हणजे पडतेच...आता एका राशीचे अनेकजण असतात. त्यामुळे सगळेच भविष्य तंतोतंत तुम्हाला लागू होईल असे नाही. विशेषत: ‘आज धनलाभ होईल, कुणीतरी तुमच्या प्रेमात पडेल, वरिष्ठांची मर्जी राहील, वेतनवाढ मिळेल, पत्नीकडून गोड बातमी मिळेल’ या सारख्या भविष्यवार्ता तर तद्दन अफवा असतात हे मी आजवरच्या अनुभवावरून छातीठोकपणे सांगू शकतो. पण ‘निष्कारण पैसे खर्च होतील, घरात आदळआपट होईल, वरिष्ठांची बोलणी खावी लागतील, अनाहूत पाहुणे येतील’, यासारखे भविष्य मात्र तंतोतंत खरे ठरते! त्यामुळं किमान सावधगिरी म्हणून तरी ते वाचलं पाहिजे. पण अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा या अशा राशीभविष्यावर खूप डोळा होता. लोकांची मानसिक फसवणूक करणारा हा कॉलम एकतर बंद करा, अथवा ‘हे सगळं खोटं आहे!’ अशी तळटीप टाका असा त्यांचा संपादकांकडे आग्रह असायचा. पण अशी तळटीप राशीभविष्याखाली टाकली तर बातम्या आणि लेखांच्या खालीही ती टाका, असा आग्रह वाचक धरतील!! हा संपादकांचा बिनतोड युक्तिवाद ऐकल्यानंतर डॉक्टरांनी तो आग्रह सोडला म्हणतात...
असो, तर मुद्दा होता मिष्टान्नयोग! गेले आठ दिवस मी सोसायटीतील, आॅफिसातील प्रत्येकाकडे अगदी आशाळभूत नजरेने पाहतो आहे. पण मिष्टान्न सोडा साधा चहा देखील कुणी विचारलेला नाही. माझा हा मिष्टान्नशोध सुरू असतानाच माझ्या वाचनात आले की, एका राजकीय पक्षाने ‘समरसता भोज’ आयोजित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. माझ्या तोंडाला अक्षरश: पाणी सुटले. मी तडक जाऊन त्या पक्षाचे कार्यालय गाठले. तिथे गेल्यानंतर मला सांगण्यात आले की, तुम्ही आमच्या खासदारांना अथवा एखाद्या मंत्र्यांना भेटा. भित्यापाठी ब्रह्मराक्षस तसे भुक्यापाठी परब्रह्म...म्हणून चिकाटी न सोडता मी प्रथम एका खासदारांना गाठले. ‘तुमच्या समरसता भोजमध्ये मला भोजन हवंय’ असं सांगितल्यानंतर त्यांनी माझ्यापुढे अटींचा एक कागद सरकवला.‘समरसता भोजसाठी चांदीचे ताट, बसायला पाट, बिसलेरी पाणी आणि हॉटेलचे टिफीन आणावे लागेल!’ यादी वाचून मी तिथून सटकलो. मग मंत्री महोदयांकडे गेलो. तर त्यांनी पहिला प्रश्न केला, ‘तुम्ही दलित आहात?’ मी म्हणालो, ‘जातीनं नाही. पण पेशाने दीन आहे!’ बहुदा माझ्या उत्तराचा त्यांना अर्थबोध झाला नसावा म्हणून त्यांनी अगदी आस्थेवाईकपणे विचारलं, ‘मग तुम्हाला गटई कामगारांच्या योजनेचा लाभ हवाय का?’ (पत्रकार अन् गटई कामगार? व्वा!!) मंत्र्यांच्या उत्तराने माझी भूक पळाली!

Web Title: Editorial Artical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.