बोगस बियाण्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:23 AM2018-04-09T01:23:36+5:302018-04-09T01:23:36+5:30

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे.

Eclipse of bogass seeds | बोगस बियाण्यांचे ग्रहण

बोगस बियाण्यांचे ग्रहण

Next

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे. तरीदेखील शेती कसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने, शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने शेतात राबतो. कमी खर्चात भरपूर उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान, बियाण्यांच्या शोधात असतो. दुसरीकडे त्याच्या गरजेत स्वत:चा फायदा शोधणारे टपलेलेच असतात. त्याचाच प्रत्यय मागील काही वर्षांपासून येत आहे. भरघोस उत्पादनाची प्रलोभने देऊन, कापूस व सोयाबीनची बोगस, अप्रमाणित बियाणे विदर्भातील शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. विदर्भ ही अप्रमाणित बोगस बियाणे व निविष्ठा विक्रीची मोठी बाजारपेठच झाली आहे. यावर्षी तर खरीप हंगाम सुरू होण्याआधीच, ‘एचटी’ तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बोगस बीटी कापसाचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर हे बियाणे पकडण्यात आले. खरीप हंगामास अद्याप दीड ते दोन महिने अवकाश आहे. बाजारपेठेत १५ मेनंतरच अल्प प्रमाणात बियाण्यांची मागणी सुरू होते. गत पाच-सहा वर्षांपासून पेरणीसाठी पूरक पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बियाणे खरेदी करीतच नाही. यावर्षी मात्र शेतकºयांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे आमिष दाखवून बोगस बियाणे त्यांच्या माथी मारले जात आहे. तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बीटी बियाणे अस्तित्वातच नाही; पण मागील पाच वर्षांपासून या बीटीची विक्री सुरू आहे. बीटी कापसासोबतच सोयाबीनच्याही बोगस व अप्रमाणित बियाण्याची दरवर्षी विक्री करण्यात येत आहे. गतवर्षी पश्चिम विदर्भात अप्रमाणित खते, कीटकनाशकांचे साठे सापडले. अकोल्यात तब्बल २६ लाख रुपये किमतीच्या अप्रमाणित कीटकनाशकांची जप्ती करण्यात आली. अकोट, मूर्तिजापूर येथेही बोगस बियाणे, खतांचे साठे आढळून आले. कृषी विभागातर्फे दरवर्षी भरारी पथके नियुक्त केली जातात. विभागीय पथकाचे त्यावर नियंत्रण असते; पण त्या यंत्रणेला हुलकावणी देऊन, बोगस कृषी निविष्ठा पोहोचतातच कशा, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. बोगस कृषी निविष्ठांची विक्री करणाºयांवर कधीच ठोस कारवाई होत नाही. अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना करताना आधीच गलितगात्र झालेला गरीब बिचारा शेतकरी अशा ठगांमुळे आणखीच गाळात जातो. शेतकरीवर्गास ‘अच्छे दिन’ केव्हा दिसतील कोण जाणे; पण किमान त्यांच्या पाठीमागचे बोगस बियाण्यांचे ग्रहण तरी सुटायला हवे!

Web Title: Eclipse of bogass seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.