स्वप्न... फेरीवालामुक्त परिसराचे, महापालिकेने पुढाकार घेण्याची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 05:12 AM2017-10-22T05:12:09+5:302017-10-22T05:12:17+5:30

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पुलावर चेंगराचेंगरी होऊन झालेले २७ जणांचे मृत्यू, मनसेने फेरीवाल्यांवर सुरू केलेले हल्ले आणि महापालिकेने दिलेली मुदत या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Dream ... The hawk-free area, the need for municipal leadership to take the initiative | स्वप्न... फेरीवालामुक्त परिसराचे, महापालिकेने पुढाकार घेण्याची नितांत गरज

स्वप्न... फेरीवालामुक्त परिसराचे, महापालिकेने पुढाकार घेण्याची नितांत गरज

Next

-अक्षय चोरगे
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पुलावर चेंगराचेंगरी होऊन झालेले २७ जणांचे मृत्यू, मनसेने फेरीवाल्यांवर सुरू केलेले हल्ले आणि महापालिकेने दिलेली मुदत या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यानिमित्ताने या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंवर टाकलेला प्रकाश.
मुंबईसारख्या शहरातील लोकांचा जवळपास ९ ते १० तास वेळ हा कार्यालयात अथवा कामाच्या ठिकाणी जातो. दोन तासांपेक्षा जास्त वेळ प्रवासात जातो. कार्यालय अथवा घरी जाण्याच्या मार्गावरच फेरीवाले असतील, तर त्यांना भाजी अथवा गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. त्यामुळे त्यांना मार्गावरच फेरीवाले हवे असतात, परंतु फेरीवाल्यांमुळे त्रास होऊ नये, एवढीच त्यांची अपेक्षा असते.
रेल्वे स्थानक, फूटओव्हर ब्रीज, स्कायवॉक, बस स्टॉप, टॅक्सी स्टँड या परिसरात जर फेरीवाले असतील, तर नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे या परिसरात फेरीवाले नसावेत, परंतु स्थानकापासून काही अंतरावर बाजारपेठा, लहान-मोठ्या मंडया असाव्यात, ज्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा तर वाचेलच, परंतु फेरीवाल्यांमुळे कोणतीही अडचण होणार नाही. नगर नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञांनीदेखील यास दुजोरा दिला असून, या कामी महापालिकेनेच पुढाकार घ्यावा, असेही मत त्यांनी मांडले आहे.
शहर नियोजन तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांच्या म्हणण्यानुसार, पालिका आणि राज्य शासनाने फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत दोन-तीन धोरणे तयार केली, परंतु त्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्याने, फेरीवाले वाढत गेले आणि शहरभर फोफावत गेले. गेल्या कित्येक वर्षांमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला आहे. त्यामुळे धोरण तयार केले, तरी त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मुंबईत ७० लाखांपेक्षा जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर अगोदरच गर्दी आहे. त्यात अधिक भर फेरीवाल्यांचा आणि फेरीवाल्यांकडून साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे बाजारपेठा, मंडया या रेल्वे स्थानकापासून दूर असाव्यात. रेल्वे स्थानकांचा वापर फक्त प्रवासी आणि चाकरमान्यांकडून झाला, जर रेल्वे स्थानकांवरील कोंडी काही प्रमाणात कमी होईल. शहरात बेकारी आहे, तोपर्यंत फेरीवाले तयार होतच राहणार. शहरातील बेकारी कमी करण्यात प्रशासनला यश आले, तर फेरीवाले कमी होतील. रेल्वे स्थानके, रस्ते आणि पदपथांवरील फेरीवाल्यांमुळे नागरीकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे पादचारी व फेरीवाल्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचे राजकीय भांडवल होऊ नये. मुळात काही धोरणांचाही विचार केला पाहिजे. कमर्शियल सेक्टर आणि इमारतींना मुंबई बेटात स्थान देऊ नये आणि सर्व कमर्शियल सेक्टर उपनगरांमध्ये हलवावे, अथवा नवे कमर्शियल सेक्टर उपनगरांमध्ये, वांद्रे-कुर्ला संकुलात उभारावे, असे धोरण तयार करण्यात आले, परंतु त्याच वेळेला मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी शासनाकडून कमर्शियल सेक्टरसाठी देण्यात आल्या. दक्षिण मुंबईतील व्यवसाय, धंदे, कमर्शियल सेक्टर नव्या मुंबईत हलवावे, अथवा नवे कमर्शियल सेक्टर तयार करावे, असे धोरण तयार करण्यात आले, परंतु त्याच वेळेला दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटसारख्या भागात समुद्रात भरणी टाकून जमीन तयार करून, त्या जमिनी कमर्शियल सेक्टरसाठी देण्यात आल्या. त्यामुळे प्रशासनाच्या अशा परस्परविरोधी धोरणांमुळे फेरीवाले, गर्दी आणि कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
शहर नियोजन तज्ज्ञ रमेश प्रभू यांच्या मते फेरीवाल्यांना बाजारपेठा उपलब्ध करून द्यायला हव्यात. रेल्वे स्थानके, रस्ते आणि पदपथांवर फेरीवाल्यांना बसू देऊ नये. अनधिकृत फेरीवाल्यांना त्वरित हटवावे. जर रस्ता अथवा रेल्वे स्थानकावर एखादा फेरीवाला ठाण मांडूण बसला, तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. जर त्याच्यावर कारवाई झाली नाही, तर तेथे फेरीवाल्यांची संख्या वाढते. शहरात बाजारांची संख्या वाढवावी. पादचाºयांसाठी रस्ते, पदपथ आणि प्रवाशांसाठी रेल्वे स्थानके मोकळी असावीत. रेल्वे स्थानकांवर फेरीवाल्यांमुळेच गर्दी होते. यावर सारासार उपाय करण्याची गरज आहे. नगर नियोजन तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांच्या म्हणण्यानुसार, फेरीवाले नगराचा अविभाज्य घटक असल्यामुळे त्यास नगर नियोजनात स्थान द्यायला हवे. अनेक पश्चिमात्य देशांतील मोठ्या शहरांमध्ये नगर विकास करताना, फेरीवाल्यांना शहर नियोजनात स्थान देण्यात आले होते. रेल्वे स्थानकांसारख्या परिसरात फेरीवाल्यांनाअधिकृत जागा देता येऊ शकते, परंतु तसे करत असताना, त्यामुळे गर्दीची मोठी समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. फेरीवाल्यांची संख्या मर्यादित राहावी. कोंडी होते, अशा ठिकाणी फेरीवाले नसावेत. मेट्रो आणि रेल्वे स्थानकांची रचना करताना फेरीवाल्यांना त्यामध्ये सामावून घ्यायला हवे आणि महापालिका किंवा संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मुंबई शहरात ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली. त्यासाठी झालेला भरमसाट खर्च वसूल करण्यासाठी त्यांनी रेल्वे भारतीय नागरिकांसाठी खुली केली, परंतु रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर होत नव्हता. रेल्वेचा वापर जास्त व्हावा, या उद्देशाने ब्रिटिशांनी प्रमुख रेल्वे स्थानकांच्या जवळ मंडया आणि बाजारपेठा उभारल्या. क्राफर्ड मार्केट, महात्मा फुले मंडई ही त्यापैकी उदाहरणे आहेत, परंतु या बाजारांमुळे त्या काळात मुंबईची लोकसंख्या कमी असल्याने, रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी अथवा कोंडीची परिस्थिती उद्भवत नव्हती. ब्रिटिश देश सोडून गेल्यानंतरही आपण ब्रिटिशांच्या पावलावर पाऊल ठेवत, रेल्वे स्थानक परिसरात मंडई आणि बाजारपेठा तयार करत राहिलो.

मुंबईतील गिरण्या बंद पडणे हेदेखील फेरीवाल्यांची संख्या वाढण्यामागील कारण आहे. गिरण्या बंद पडल्यानंतर, त्यामध्ये गिरणी कामगारांच्या नोकºया गेल्या. त्यामुळे पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी गिरणी कामगार अथवा त्यांच्या मुलांनी रेल्वे स्थानक अथवा गर्दीच्या ठिकाणी छोटी-छोटी दुकाने मांडली. भाजी, खाद्यपदार्थ विकून ते लोक उपजीविका करू लागले.

फेरीवाल्यांमुळे लोकांचा पैशांसोबत वेळही वाचतो. ग्राहकांना फेरीवाले आणि फेरीवाल्यांना ग्राहक हवे असतात, परंतु फेरीवाल्यांना योग्य जागा न दिल्याने, ते गर्दीच्या ठिकाणी ठाण मांडून बसतात. त्यामुळे गर्दीत अधिक भर पडते. खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करू न शकणाºया लोकांना आणि पादचाºयांना फेरीवाले हवे असतात.
न्यूयॉर्क, रॉटरडॅम, अ‍ॅम्सटरडॅम, पॅरीस आणि बर्लिन ही नगर नियोजनात फेरीवाल्यांना सामावून घेणाºया प्रमुख शहरांची उदाहरणे आहेत. या शहरांमध्ये रेल्वे स्थानक अथवा जेथे गर्दीचे योग्य नियोजन होईल, अशा अरुंद रस्त्यांवर फेरीवाल्यांना जागा देण्यात आली आहे. फेरीवाले समस्या बनू नयेत, यासाठी फेरीवाल्यांची संख्या निश्चित केलेली आहे. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. रेल्वे स्थानके अथवा मेट्रो स्थानकांमध्ये फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र गाळे देण्यात आले आहेत.

फेरीवाले ग्राहकांना हवे असतात, परंतु मोठ्या दुकानदारांना फेरीवाले नको असतात. मोठमोठ्या दुकानांपेक्षा लोक फेरीवाल्यांकडून साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे मोठ्या दुकानदारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. म्हणून मोठे दुकानदार हे फेरीवाल्यांना विरोध करतात. बहुतेक वेळा फेरीवाले हटविण्यासाठी दुकानदार पालिकेचे दार ठोठावतात.

Web Title: Dream ... The hawk-free area, the need for municipal leadership to take the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.