विकासामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:07 AM2019-02-04T06:07:57+5:302019-02-04T06:08:28+5:30

ग्रीनलँड, अंटार्क्टिका, अलास्काच्या बर्फाचे आवरण गेल्या दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत तीन ते पाचपट जास्त वेगाने वितळत आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचत आहे.

With the development, the elimination of life on earth will continue | विकासामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू

विकासामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू

googlenewsNext

- अ‍ॅड. गिरीश राऊत
(पर्यावरणतज्ज्ञ)

ग्रीनलँड, अंटार्क्टिका, अलास्काच्या बर्फाचे आवरण गेल्या दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत तीन ते पाचपट जास्त वेगाने वितळत आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचत आहे. प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी जीव हजारो, लाखोंच्या संख्येत नष्ट होत आहेत. तेथे कोळसा खाणींचा निषेध म्हणून मुलांनी शाळेत जाणे बंद केले. बेल्जियममध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवून निदर्शने सुरू केली. ‘निदर्शने करू नका, शाळेत जा,’ असा सल्ला देणाऱ्यांना, ‘मानवजातीचा अंत होत असताना शाळेत जाण्यात काही अर्थ नाही’, असे ते विद्यार्थी बजावत आहेत. न्यूझीलंड देशाने नवे तेल व वायूंचा शोध आणि उत्खनन बंद करण्याचा व बारा वर्षांत तेल वापर थांबवण्याचा निर्णय घेतला. स्वीडनच्या मुलीने तापमानवाढ रोखणारी कृती व्हावी म्हणून संसदेसमोर धरणे धरले आहे.

औद्योगिकीकरणामुळे झालेल्या कार्बन उत्सर्जनाने सूर्याची उष्णता शोषली जाऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान, यंत्र येण्याच्या काळाच्या तुलनेत सुमारे १.५ अंश या धोक्याच्या पातळीवर गेले आहे. त्यामुळे महासागराचे पाणी व ध्रुव प्रदेशातील बर्फाची हजारो कोटी टन अधिकची वाफ दरवर्षी वातावरणात जात आहे. त्या वाफेचे पुन्हा पाणी वा बर्फ होऊन ती अवकाळी, अतिवृष्टी व हिमवृष्टीच्या रूपात कोसळत आहे. आपल्या देशात मध्य प्रदेश, विदर्भ व मराठवाड्यात दवाऐवजी बर्फवृष्टी होत आहे. पिके गेली आहेत. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया मंगळवेढ्यात पीक आले नाही.

हे संकट ओळखून, नाणार रिफायनरी, जैतापूर अणुऊर्जा व आता आंबोळगडसारख्या घातक प्रकल्पांना रास्त विरोध होत आहे. परंतु, हा विरोध करणारे देशाची प्रगती रोखतात, असा प्रचार होतो. भौतिक विकासाचे समर्थन करणाºयांनी लक्षात घ्यावे की, या विकासामुळेच मानवजात व जीवसृष्टीचे पृथ्वीवरून उच्चाटन सुरू झाले आहे. मानवजात व जीवसृष्टी वाचवण्यापेक्षा दुसरे महत्त्वाचे काही असू शकत नाही. पॅरिस कराराने नमूद केलेली दोन अंशांची तापमानवाढ फक्त येत्या पाच वर्षांतच होईल.

येत्या दशकाच्या शेवटी म्हणजे फक्त बारा वर्षांत देशांच्या सीमा व राजकीय-आर्थिक विभागणी निरर्थक ठरणार आहे. कुठलीही सत्ता आणि बहुराष्ट्रीय कंपन्याही येऊ घातलेली ही भयानक परिस्थिती हाताळू शकणार नाही. जगभरात घटते अन्नउत्पादन व भूजल, नैसर्गिक स्वरूपात दिसणाºया परंतु मानवनिर्मित असणाºया वाढत्या दुर्घटना यामुळे करोडोंची स्थलांतरे व त्यातून याचे हिंसक घटनांमध्ये रूपांतर होईल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील अनर्थ कमी करायचा असेल तर प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून सर्व जनतेने, विशेषत: विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. लालसा, सुखी जीवनाची पृथ्वीच्या विरोधात जाणारी चुकीची कल्पना, तंत्रज्ञान व ते वापरणारी अर्थव्यवस्था यास कारण आहे.

विदर्भ मराठवाड्याला तसेच किनारपट्ट्यांवरील जनतेला आपण येत्या दशकात उष्णता व बुडीत स्थिती यामुळे निर्वासित होणार याची माहिती नाही. उलट दोन्हीकडे हे संकट वाढवणारे औद्योगिक प्रकल्प नापिकीवर रोजगार देणारा उपाय म्हणून आणले जात आहेत. या परिस्थितीत मानवजातीची शेवटची पिढी ठरू शकणाºया उमलत्या पिढीची प्रतिनिधी स्वीडनची १५ वर्षे वयाची विद्यार्थिनी ग्रेटा थनबर्ग हिने स्वीडनच्या संसदेसमोर धरणे धरले आहे. युनोच्या सभेत केलेल्या भाषणात मानवजात वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याबद्दल तिने जगभरातील सरकारांना दोष दिला.

आपल्या देशात तर कमालीची चिंताजनक स्थिती आहे. मानवजातीचा अंत घडवणारे निर्णय रोज घेतले जात आहेत व असे निर्णय घेणाºयांना जनता विकासपुरुष म्हणून डोक्यावर घेत आहे. तुम्ही पुरोगामी, प्रतिगामी, डावे, उजवे, मध्यममार्गी कुणीही असा, तुमची घडण प्रचलित शिक्षणातून होते. ते औद्योगिकीकरणासाठी आणले आहे. तुमच्या नकळत तुम्ही त्यासाठी घडवले जाता. मग तुम्ही तुमची घडण करणाºया पृथ्वीच्या व निसर्गाच्या विरोधात जाऊन तिला उद्ध्वस्त करणाºया स्वयंचलित यंत्राची, विजेची, सिमेंट इ.ची बाजू केव्हा घेता हे तुम्हालाच कळत नाही. याला तुम्ही आधुनिकता म्हणू लागता.

आर्थिक राजकीय दृष्टिकोन ही चूक आहे. तो पृथ्वी व जीवनकेंद्री असायला हवा. तरच सत्याचे आकलन होईल. औद्योगिकीकरण व शहरीकरण विसर्जित करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू व्हायला पाहिजे.
आपणाला पृथ्वी जगवते, अस्तित्व देते, औद्योगिकीकरण व अर्थव्यवस्था नाही. प्रचलित विकास पृथ्वीची जीवनाची क्षमता रोज नष्ट करत आहे. भौतिक प्रगती व विकास या भ्रामक कल्पना आहेत. विकासाचे समर्थन हा मानवद्रोह व सृष्टीद्रोह आहे.

Web Title: With the development, the elimination of life on earth will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.