मतदाराच्या मानसिकतेविषयी उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:25 PM2019-04-26T13:25:31+5:302019-04-26T13:26:19+5:30

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य मतदारावर वेगवेगळ्या मुद्यांचा भडीमार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. भारताची ऐतिहासिक, भौगोलिक रचना ...

The desire for the voter's mentality | मतदाराच्या मानसिकतेविषयी उत्कंठा

मतदाराच्या मानसिकतेविषयी उत्कंठा

Next

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सामान्य मतदारावर वेगवेगळ्या मुद्यांचा भडीमार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. भारताची ऐतिहासिक, भौगोलिक रचना पाहता वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे प्रश्न, भूमिका घेऊन राजकीय पक्ष प्रचार करताना दिसत आहेत. मतदारांना मनविण्यासाठी सत्ताधारी पक्ष हा स्वत: पाच वर्षे केलेल्या कामगिरीची वैशिष्ट्ये सांगत असतो. पाच वर्षांतील कामगिरीला उजाळा देत असतो. काही त्रूटी, कमतरता असतील, त्याकडे मतदारांनी दुर्लक्ष करावे म्हणून उजळ गोष्टींवर अधिक भर देताना दिसतो. याउलट विरोधी पक्ष हा सरकारच्या त्रुटी, कमतरता, अयशस्वी किंवा अपयश आलेल्या बाबींवर अधिक जोर देत असतो. केवळ त्या आणि त्याच गोष्टी मतदारांपुढे मांडायचा प्रयत्न करीत असतो.
भाजपने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याची स्थिती आठवून पहा. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांच्याविषयी दोन मतप्रवाह होते. गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतरच्या दंगलींची पार्श्वभूमी एकीकडे आणि विकासाचे मॉडेल म्हणून गुजराथ राज्याचे नाव घेतले जाणे हे दुसरीकडे होते. मोदी यांच्यासारखा नेता हा गुजरातसारख्या एका राज्याचा विकास करु शकतो, तर देशाचा विकास करण्यासाठी त्यांच्यासारखे नेतृत्व हवे, असा प्रचार भाजपने खुबीने केला आणि मतदारांना तो भावला. जे राज ठाकरे हे मोदी आणि त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीवर बोट ठेवत आहेत, तेच राज ठाकरे हे गुजरात राज्याचे राजशिष्टाचारासह प्रमुख अतिथी म्हणून तेथे गेले आणि मोदींची तोंडभरुन स्तुती अनेक दिवस करीत राहिले. मोदी यांच्या पायाचे तीर्थ महाराष्टÑातील सत्ताधाऱ्यांनी रोज सकाळी प्यायला हवे, हे त्यांचेच वाक्य आता भाजप ‘लाव रे तो व्हीडिओ’ला प्रत्युत्तर म्हणून मतदारांपुढे आणत आहे. विकासपुरुष म्हणून मोदी यांची प्रतिमानिर्मिती करण्यात आली आणि ती मतदारांना भावली. अण्णा हजारे, आम आदमी पार्टी, केजरीवाल, रामदेवबाबा यांनी त्यावेळी सुरु केलेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चरमसीमेवर पोहोचले होते. पाकिस्तानशी संबंध ताणलेले होते. अशावेळी मोदी हेच सर्व प्रश्नांना उत्तर आहे, हे भासविण्यात, ठसविण्यात भाजप यशस्वी झाला आणि मतदार राजी झाला.
आता विरोधी पक्षदेखील भाजपच्या रणनीतीचा अवलंब करीत पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष कृती यातील फरक ठळकपणे मतदारांपुढे मांडत आहे. प्रत्येक मतदाराच्या खात्यात १५ लाख रुपये, काळा पैसा बाहेर आणणे, पाकिस्तानला जशास तसे उत्तर, दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी ही प्रमुख आश्वासने भाजपने पाच वर्षांपूर्वी दिली होती. आता याच मुद्यांवर विरोधी पक्षांनी भाजपला घेरले आहे. काँग्रेसने तर ७२ हजार रुपयांची गरीब लोकांसाठीची न्याय योजना आणून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने गरिबांची जनधन खाती उघडली, त्यात आम्ही ही रक्कम टाकू, असे आता काँग्रेस सांगत आहे. काळा पैसा तर आला नाही, परंतु नोटबंदीने उद्योग-व्यापाराला फटका बसल्याचा आणि नोटा बदलण्यासाठी रांगा लावणाºया सुमारे २०० लोकांचा मृत्यू झाला आहे, हेदेखील विरोधक प्रकर्षाने मांडत आहेत. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी ४० जवानांची हत्या केली, पण आम्ही एअर स्ट्राईक केल्याचे भाजप म्हणत आहे. २५० दहशतवादी ठार केल्याचा दावा केला जात आहे, या दाव्यावर विरोधी पक्ष शंका घेत आहे. आमचा एक सैनिक मारला तर आम्ही त्यांचे दहा मारु हा दावा भाजप करीत होता, पण पुलवामानंतर असे कुठे घडले, असा सवाल विरोधक विचारत आहेत. दोन कोटी लोकांना दरवर्षी नोकरी हे आश्वासन तर हवेत विरले. नोटबंदी, जीएसटी, रेरा या लागोपाठ घेतलेल्या आर्थिक निर्णयामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. भाजपचे आश्वासन हवेत विरले, हे विरोधक आक्रमकपणे मांडत आहे.
पाच वर्षांपूर्वी भाजपच्या विकासाच्या स्वप्नाला भुललेला मतदार आता देशातील वास्तवाविषयी भाजप आणि विरोधी पक्ष यांनी केलेल्या दाव्यामुळे पुरता गोंधळला आहे. त्यामुळे नेमके कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे हे त्याने त्याच्यापुरते ठरविले आहे. चार टप्प्यात झालेले कमी मतदान हे मतदाराच्या गोंधळलेल्या मानसिकतेचा तर परिणाम नाही ना? ज्यांनी केले त्यांनी कुणाला केले हे कोडे अखेर २३ मे रोजी उलगडणार आहे.

Web Title: The desire for the voter's mentality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.