दादासाहेबांचे ‘बेवॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:01 AM2018-08-29T07:01:34+5:302018-08-29T07:02:22+5:30

Dada Saheb's 'Bevoch' | दादासाहेबांचे ‘बेवॉच’

दादासाहेबांचे ‘बेवॉच’

Next

(मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा कशी द्यायची असते यासाठी इंग्रजी मालिका ‘बेवॉच’ बघत जा असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला आणि तो ऐकून दादासाहेबांना स्वत:च सुरक्षारक्षक झाल्याचे भास होऊ लागले. त्यातच दादासाहेबांना गाढ झोपेत स्वप्न पडले...)
- उठा १० वाजलेत. आॅफिसला जायचे नाही का? सकाळपासून टीव्हीत तोंड खुपसून बसलात... ‘सौ’ने दादासाहेबांना फटकारले.
तसे दादासाहेब टीव्हीवरील नजर न हटवता म्हणाले, आमच्या साहेबांनीच सांगितलाय टीव्ही पहायला.
- अहो, पण आॅफिसला जायचं नाही का? आणि साहेब का टीव्ही बघायला सांगतील? त्यांची काय मुलाखत येणार आहे की काय टीव्ही वर...?
- मुलाखत नाही गं. मी आता पालिकेच्या सागरी सुरक्षा विभागात लागलोय. आपले अनेक तरुण किनाºयावर फिरायला जातात, सेल्फी काढतात. त्यांच्या जीवाला धोका होतो म्हणून त्यांना कसे सुरक्षित बाहेर काढावे, त्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी ‘बेवॉच’ मालिका बघूनच कामावर या असा सल्ला दिलाय साहेबांनी, म्हणून आज दिवसभर या मालिकेचे सगळे भाग बघणार.
- तरीच मी म्हणाले की एवढं मिटक्या मारत टीव्ही का बघताय? बिकीनी घातलेल्या पोरी पहाताय तुम्ही... कसली बोडक्याची सुरक्षा करणार गं बाई...
- अगं ते नाही बघत मी... कसे सुमद्रात जीव धोक्यात घालून ते वाचवतात ते पाहतो.
- त्यांच्या तब्येती बघा आणि तुमची पोटं बघा... तुम्ही ढेरी कधी सांभाळावी, पळावं कधी? पोहता येतं का हल्ली तुम्हाला?
- तू ना कायम नकारघंटाच वाजवत जा आमच्यापुढं, उत्साहानं काही बोलशील तर पैसे नाही लागणार तुला...?
- पण का हो, तुमच्या आॅफिसात असले कपडे घालू देतील का तुम्हाला? शिवाय ‘बेवॉच’मध्ये जसे किनाºयावर टॉवर्स आहेत तसे आहेत का तुमच्या किनाºयावर? सगळीकडे त्या भैयेलोकांनी भेळ, पाणीपुरीचे ठेले टाकलेत. त्याचं काय?
- अगं ते चौपाटीवर आहे. तेथे येणाºयांना खाण्याची सोय नको का करायला?
- करा ना, पण जे समुद्रात जातात त्यांना वाचवण्यासाठी काय आहे तुमच्या चौपाटीवर...? तशा लाल रंगाच्या बिकीनी घातलेल्या, फाडफाड इंग्रजी बोलणाºया पोरी घेतल्या तर किनाºयावर खोटं खोटं अडकल्याची नाटकं करणाºयांची रांग लागेल... मग बसा निस्तारत...
- तू पण ना, अगं कोणत्याही आदेशाचा मागचा पुढचा संदर्भ समजून घेत जा. ‘बेवॉच’ बघा असं सांगितलं याचा अर्थ त्या पध्दतीनं काम करायचं असा होतो गं बाई...
- तुम्हीच बसा अर्थ लावत, आता चुपचाप आॅफिसात जा. मला सासू सुनाच्या सिरीयल बघायच्या आहेत.
तेवढ्यात दादासाहेबांच्या मित्राचा फोन येतो, कुठं आहेत साहेब असं तो विचारतो. त्यावर ‘सौ’ म्हणतात, ‘बेवॉच’मध्ये गेलेत...
- फोनवरूनच मित्र विचारतो, सकाळी सकाळीच... पण ‘बेवॉच’ बार तर संध्याकाळी सुरू होतो ना वहिनीसाहेब...
- अच्छा तुम्ही रोज रात्री काम आहे म्हणून त्या बारमध्ये बसता तर असं सौ इकडून म्हणाल्या पण तोपर्यंत फोन कट झाला.
- अतुल कुलकर्णी

Web Title: Dada Saheb's 'Bevoch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.