जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:29 AM2018-04-16T00:29:59+5:302018-04-16T00:29:59+5:30

जगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव.

 Creatures | जीव

जीव

Next

- किशोर पाठक

जगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव. मग कुठे जुळवायचा हा हिशेब! सख्खा नवरा वा बायको एकमेकांना विचारत नाहीत; आणि नात्यात न बांधलेली व्यक्ती आपल्यावर जीव टाकते हे कोणतं गणित? थोडक्यात नातं रक्तात नसतं, जीव जडवण्यावर असतं. आपण प्रत्येकाच्या कुठल्या गोष्टीवर प्रेम करतो, जीव लावतो. कुणाचा गळा, कुणाचा शस्त्रक्रिया करणारा हात, कुणाचा पळणारा पाय, कुणाचा कुंचला, कुणाच्या हातातील कला, कुणाचा शब्द... आपण म्हणतो ना तो माणूस नाही मला आवडत. पण त्याचं गाणं, कविता, अभिनय, दिग्दर्शन एकाच मुशीतून बाहेर पडलेल्या ६४ कला या सर्वांवर जीव लावता लावता आपला जीव कधी संपतो ते कळत नाही. हा जीव जडण्याचा प्रकार असतो. बघा जीव, जीवन आणि जीव लावणे एकाच शब्दाचे विराट दर्शन. आपण आपला केवढा जीव म्हणतो या एकाच जिवाने जीव लावायचा जिवात जीव असेपर्यंत जीवनात जगायचं, जीवन घडवायचं, जीव नकोसा वा हवासा होईपर्यंत व्यक्तीवर जीव लावायचा आणि शेवटी जिवाला जीव देऊन जीवन संपवायचं. हीच जीवनाची इतिकर्तव्यता. आयुष्याची चाळीस पन्नास वर्षे एकत्र जगून माणसं एकमेकांना कळत नाहीत. म्हातारपणी कळतं की हा माणूस फक्त कामाकरिता, पैशांकरिता वासनेकरिता आपला होता. अशा साठीच्या स्त्री-पुरुषांना सहवासाची निरर्थकता जाणवते तेव्हा उतारवयात एकटेपण अनुभवतांना तो वा ती आठवते. खूप छान वाटतं आठवणींनी वा वाईटही वाटतं. ही व्यक्ती आपल्याजवळ आली होती पण आपला ताठरपणा, संकोच, स्वाभिमान, स्वार्थ, सामाजिक रुढींचं जाळं या सगळ्यांनी हा वा ही लांब गेले. मग पश्चाताप त्यातूनही जळणारा जीव, कोपणारा जीव, दु:ख करणारा जीव, काठोकाठ नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न, विफलता. म्हणून आजच आपला जीव हवेत सोडा. जिवात जीव असेपर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मरताना हे राहून गेलं. ही भावना नको. हवं ते आणि हवं तेच, तसं जगा! गेलेला क्षण पुन्हा येत नाही.

Web Title:  Creatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.