नाताळ

By Admin | Published: December 24, 2016 11:52 PM2016-12-24T23:52:01+5:302016-12-24T23:52:01+5:30

पूर्ण जगभरात नाताळच्या सणाचं कोण अप्रूप. त्यातून युरोप-अमेरिकेत विशेष! अगदी नोव्हेंबर महिन्यापासूनच नाताळच्या सुट्यांची आणि सणाची लगबग सुरू होते.

Christmas | नाताळ

नाताळ

googlenewsNext

- वर्षा हळबे

पूर्ण जगभरात नाताळच्या सणाचं कोण अप्रूप. त्यातून युरोप-अमेरिकेत विशेष! अगदी नोव्हेंबर महिन्यापासूनच नाताळच्या सुट्यांची आणि सणाची लगबग सुरू होते. शहरात आणि छोट्या-छोट्या गावांमध्येदेखील ठिकठिकाणी दिव्यांची रोशणाई केली जाते. रस्त्याकडील झाडांचे बुंधेदेखील दिव्यांच्या माळांनी सजलेले असतात. घराच्या छपरांचे प्रोफाइलसुद्धा दिव्यांनी दीपून उठतात. प्रत्येक घर ख्रिसमसची झाडं, काचेचे बॉल, प्लॅस्टिकचे, बर्फाचे क्रिस्टल्स, एन्जल्स अशा वेगवेगळ्या वस्तूंनी नटलेलं असतं. ख्रिसमसला का लावली जातात झाडं? त्याचा इतिहास सतराव्या शतकातील ‘पेगन’ धर्मातील झाडं पुजायच्या रिवाजात दडलेला आहे. पुढील वर्षी पीक चांगलं यावं म्हणून ही पूजा करत असत. नाताळमध्ये लाल रंग हा आदमच्या लाल सफरचंदाचं आणि येशूच्या लाल रक्ताचं (त्याच्या मनुष्यजातीच्या पापांसाठी दिलेल्या बलिदानाचं) प्रतिनिधित्व करतो. हिरवा रंग हा पुरातन रोमन काळापासून सुगी आणि सुख-समृद्धीचं प्रतिनिधित्व करतो. सोनेरी रंग सगळ्या राजांनी येशूच्या जन्माची बातमी ऐकून त्याच्यासाठी आणलेल्या भेटवस्तूंचं प्रतिनिधित्व करतो. सर्वत्र सुट्या असल्यामुळे लोकं आपल्या नातेवाईक आणि मित्रांच्या घरी मुकाम्मास जातात. मद्य आणि सुग्रास भोजनाची रेलचेल असते. असं मानतात की येशूचा जन्म २४ डिसेंबरच्या मध्यरात्री झाला, त्यामुळे ‘ख्रिसमस ईव्ह’चं पण महत्त्व असतं. त्या रात्री सांताक्लॉज आपल्या हरणांच्या रथातून सर्व लहान मुलांसाठी भेटवस्तू आणतो. अशी आख्यायिका आहे की सांताक्लॉज हा एक पुरातन काळातील युरोपियन संत होता, जो मुलांसाठी भेटवस्तू आणायचा. या दंतकथेचा फायदा घेऊन सगळे पालक आपल्या लहान मुलांना सांगतात की वर्षभर जर नीट वागलं तरच सांताक्लॉज तुमच्यासाठी भेटवस्तू आणेल. घरातील ‘फायर-प्लेस’वर मोठ्ठाली ‘स्टॉकिंग्ज’ (लाल आणि पांढऱ्या रंगांची) लटकवतात आणि मध्यरात्रीनंतर सांताक्लॉज येऊन स्टॉकिंग्जमध्ये भेटवस्तू भरतो. सांताक्लॉजसाठी दूध आणि कुकीजही ठेवण्याची पद्धत आहे. मुलांची वर्तणूक कशी का असेना, पण या आमिषानं तरी तो घरी यावा! २५ तारखेला सकाळी उठल्यावर या साऱ्या भेटवस्तू उघडायचा जबरदस्त कार्यक्र म! २५ तारखेला ख्रिश्चन भाविक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात, ख्रिसमस कॅरोल्स गातात. ‘क्वायर सिंगिंग’ हा या सणाचा अविभाज्य घटक आहे. यात बायका आणि पुरु ष किंवा मुलं-मुली भाग घेतात. येशूची स्तुती करणारी, त्याच्या जन्माची गोष्ट सांगणारी गाणी गातात. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं जसं वेगळं महत्त्व असतं, तसंच नाताळचे बारा दिवस असतात; २५ डिसेंबर ते ५ जानेवारी या काळात मनवले जाणारे. या बारा दिवसांवर एक सुप्रसिद्ध गाणंदेखील आहे, ज्यात प्रत्येक दिवशी तिचा प्रियकर तिला कुठली भेटवस्तू पाठवतो याचं वर्णन आहे. पण या बारा दिवसांना भेट-वस्तूंव्यतिरिक्तही महत्त्व आहे. पहिला दिवस येशूचा जन्म साजरा करतो. येशूला ख्रिश्चन धर्मात ‘सेवियर’ मानलं आहे; सर्व पापांचा विनाशक. दुसरा २६ डिसेंबरचा दिवस संत स्टीफनचा दिवस असतो. संत स्टीफननं ख्रिश्चन धर्मासाठी आपले प्राण दिले. या दिवसाला ‘बॉक्सिंग डे’ही मानतात. पुरातन काळात वेन्सेलास नावाचा राजा होता. तो सर्व गोरगरिबांना या दिवशी भेटवस्तू आणि जेवण द्यायचा. आधुनिक काळात सगळ्या चर्चेसमध्ये या दिवशी गरिबांसाठी दानपेट्या ठेवलेल्या असतात, म्हणून ‘बॉक्सिंग डे’. तिसरा दिवस संत जॉन द अपोस्टलच्या नावाने साजरा होतो. संत जॉन येशूचा विद्यार्थी आणि खास दोस्त होता. संत जॉन हा चौथा ‘गोस्पेल’ मानला जातो. येशूचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. ‘द लास्ट सपर’च्या वेळेस तो येशूच्या शेजारी बसलेला आढळतो आणि येशू ‘क्र ॉस’वर चढल्यावरदेखील तो येशूच्या आईला, मदर मेरीला सांभाळायला, तिथेच खाली, मदर मेरीच्या शेजारी उभा असतो. चौथा दिवस ‘द फीस्ट आॅफ द होली इनोसेन्स’ म्हणून साजरा होतो. त्या दिवशी सगळ्या त्या बाळांना गौरविलं जातं; ज्यांना हेरोड नावाच्या क्रूर राजानं मारलं. हेरोडला जेव्हा कळलं की येशूचा जन्म झाला आहे आणि अशी आकाशवाणी झालेली असते की हा येशू हेरोडचा नाश करेल, तेव्हा राज्यातील सर्व नर संततीचा हेरोड नाश करत सुटला! पाचवा दिवस संत थॉमस बेकेटच्या नावानं साजरा होतो. संत बेकेट बाराव्या शतकात आर्च बिशप आॅफ कांटेरबेरी होता. राजाची चर्चवर सत्ता असू नये या भूमिकेमुळे २९ डिसेंबर ११७० रोजी त्याचा खून करण्यात आला. सहावा दिवस संत एग्वीन आॅफ वूस्टेरच्या नावानं साजरा केला जातो. संत एग्वीन इंग्लंडच्या श्रीमंतांपैकी एक होता. ६९२ सालापासून ते ७११पर्यंत तो वूस्टेरचा बिशप होता. सातवा दिवस म्हणजे नववर्षाची पूर्व संध्याकाळ ३१ डिसेंबर. हा दिवस पोप सिल्वेस्तेर द फर्स्टच्या नावाने साजरा होतो. हा चौथ्या शतकातील एक पोप होता. या दिवशी खूप खेळ खेळले जातात. इतिहासात प्रामुख्यानं धनुर्विद्येवर भर दिला जाई, कारण युद्धासाठी या कौशल्याची खूपच गरज होती. आठवा दिवस मदर मेरीच्या नावानं साजरा होतो. अशी दंतकथा आहे की, देवाने गेब्रियल नावाच्या देवदूताला गेलीलीमध्ये असलेल्या नाझरेथ या गावात राहणाऱ्या मेरीकडे निरोप घेऊन पाठवलं. गेब्रियलनं मेरीला सांगितलं की, देवाची तिच्यावर कृपा झाली आहे आणि ती जरी कुमारी असली तरी तिला एक पुत्र होईल; जो जगाचा उद्धार करेल. नववा दिवस संत बासिल द ग्रेट आणि संत ग्रेगोरी नजिएनिएन यांच्या नावानं साजरा होतो. हे दोघेही चौथ्या शतकातील अधिकारी होते. दहावा दिवस ‘फीस्ट आॅफ द होली नेम आॅफ जिझस’ म्हणून साजरा होतो. या दिवशी अधिकृतपणे येशूचं नामकरण करण्यात आलं. अकरावा दिवस संत एलिझाबेथ एन सेटोनच्या नावानं साजरा होतो. ही अमेरिकेतील अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील पहिली संत होती. बारावा, म्हणजे नाताळचा शेवटचा दिवस संत जॉन न्यूमनच्या नावानं साजरा होतो; जो अमेरिकेतील पहिला बिशप होता. नाताळ हा ख्रिश्चन लोकांचा सर्वांत महत्त्वाचा उत्सव. जगभरात याची महती आहे.

(लेखिका गेली अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास आहेत.) 

Web Title: Christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.