गरिबांची मुले शिक्षण मंत्र्याच्या तावडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:31 PM2019-01-15T23:31:54+5:302019-01-15T23:40:52+5:30

शिक्षण ही एक शक्ती आहे. मानव हा इतर सजीवापेक्षा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण ठरला तो त्याच्या ज्ञान साधनेमुळेच! शिक्षण समाज बदलविण्याचे प्रभावी साधन आहे. बदलत्या समाजाबरोबर मानवी इतिहासात शिक्षणाचा मूळ झरा अधिक व्यापक बनला. त्याने अनेक देशात नवजीवनाची उभारणी केली. रूढी, परंपरा, दैववाद, गरिबी यामध्ये खचून गेलेल्या कष्टकरी जनतेला स्वत्वाची जाणीव करून दिली. समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनातील कोंडी फोडल्याशिवाय खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकणार नाही, या जाणिवा निर्माण झाल्या.

The children of the poor are in the cluches of the Education Minister | गरिबांची मुले शिक्षण मंत्र्याच्या तावडीत

गरिबांची मुले शिक्षण मंत्र्याच्या तावडीत

googlenewsNext
ठळक मुद्देदेशातील गरिबी नैसर्गिक नसून मानव निर्मितशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून विरोध करण्याची गरज

शिक्षण ही एक शक्ती आहे. मानव हा इतर सजीवापेक्षा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण ठरला तो त्याच्या ज्ञान साधनेमुळेच! शिक्षण समाज बदलविण्याचे प्रभावी साधन आहे. बदलत्या समाजाबरोबर मानवी इतिहासात शिक्षणाचा मूळ झरा अधिक व्यापक बनला. त्याने अनेक देशात नवजीवनाची उभारणी केली. रूढी, परंपरा, दैववाद, गरिबी यामध्ये खचून गेलेल्या कष्टकरी जनतेला स्वत्वाची जाणीव करून दिली. समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनातील कोंडी फोडल्याशिवाय खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकणार नाही, या जाणिवा निर्माण झाल्या.
प्राचीन शिक्षण पद्धती : प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती ‘गुरुकुल’ स्वरूपाची होती. गुरुजींच्या आश्रमात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असत. आयुष्याचा १२ वर्षांचा कालखंड गुरूच्या आश्रमात शिक्षणासाठी घालवावा लागत असे. अर्थात अशा शिक्षणाचे माध्यम संस्कृत भाषा असे. प्राचीन स्थिती परंपरांचा खोटा अभिमान बाळगणाऱ्यांना ‘गुरुकुल’ची मने मोहित करणारी स्वप्ने पडत असली तरी ते शिक्षण आजच्याप्रमाणे सर्वांसाठी खुले नव्हते. राजे-रजवाडे व सम्राटांची मुलेच आपल्या आयुष्याचा काही काळ या शिक्षणासाठी देऊ शकत होते. हे शिक्षण घेण्यासाठी चांगल्या आर्थिक स्थितीची जशी गरज होती, तशीच चांगल्या कुळात जन्म घेण्याचीही गरज होती. अर्थात या दोन्ही गोष्टी जनसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. आपल्या प्राचीन परंपरांच्या बऱ्याच कालखंडाने शिक्षणाचे जसे दरवाजे बंद केले होते, तसेच स्त्रियांनाही ही संधी नाकारली होती.
सर्वांना शिक्षण : १८४८ मध्ये सर्वांना शिक्षणाचा आग्रह व प्रामुख्याने मागास, महिलांना शिक्षण या संकल्पनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय पुढाकाराने वंचितांसाठी शिक्षणाची दारे उघडी झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील कलम ४६ प्रमाणे मोफत व सक्तीच्या शिक्षणाची संकल्पना उदयास आणली.
गरिबी, शिक्षण व क्षमता : गरिबीला ‘शाप’ म्हटले तर तो शाप एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस दिलेला असा खचितच नाही. कारण हजारो वर्षाच्या वर्ण व्यवस्थेने जातीच्या उतरंडीत वरच्या स्तरातील समूहाने खालच्या स्तरातील समूहाला शिक्षण, साधन, संपत्तीपासून दूर ठेवण्याचे अक्षम्य पाप केलेले आहे. याच व्यवस्थेने निर्माण केलेला, टिकविलेला व वाढविलेला असा हा ‘शाप’ आहे. किंबहुना गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून पुढील पिढीला बहुधा गरिबीचा वारसा प्राप्त होतो, असे आपल्याला म्हणता येईल.
याच व्यवस्थेने निर्माण केलेला, टिकविलेला व वाढविलेला असा हा ‘शाप’ आहे. किंबहुना गरीब कुटुंबात जन्म झाला म्हणून पुढील पिढीला बहुधा गरिबीचा वारसा प्राप्त होतो, असे आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे या देशातील गरिबी ही नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे. त्यामुळे साहजिकच गरिबी निर्मूलनाची जबाबदारी माणसाला व या शासन व्यवस्थेला कदापिही टाळता येणार नाही.
गरिबीतील दुख:, व्यथा, वेदना, कुपोषण, विशिष्ट असे घरचे व परिसरातील वातावरण, तसेच शाळेत अशा मुलांकडे पाहण्याची दृष्टी व त्यातून मिळणारे दुय्यमतेचे दुर्भाग्य या साऱ्यांचा या मुलांच्या मेंदूवर लहान वयातच विपरीत परिणाम होऊन मुलांच्या शिकण्याच्या क्षमताच अडचणीत येतात. अशा प्रकारच्या अनिष्ट परिणामामुळे मुलांची शाळांमधील कामगिरी व इतर सबळ आर्थिक परिस्थितीतील मुलांच्या तुलनेत २० टक्क्यापर्यंत कमी असू शकते. सदैव जातीय, धर्मीय, वंशीय ताणांचे प्रभाव वातावरणात असतातच. अनेकदा बोचक खोचक अभिप्रायही मुलांना सोसावे लागतात. नेहमीच मिळणारा ‘कमीपणा’ मानसिक खच्चीकरण करीत असतो. गरिबीत जन्मलेल्या व वाढलेल्या मुलांच्या बाबतीत शिक्षणास उपयुक्त असे वातावरण नसल्यामुळे अशी मुले व अन्य मुलांच्या विकासात फारच अंतर दिसते. गरीब मुलांच्या जीवनात सततच्या व्यथा व ताणतणाव यामुळे कोवळ्या वयात त्यांच्या मेंदूवर अनिष्ट परिणाम होत असतात.
अशावेळी अमरावती येथे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रशांत राठोड या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल तर तू शिकू नकोस, नोकरी कर’ असे सुनावले आहे. हजारो वर्षांपासून गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या या व्यवस्थेने पुन्हा अशा प्रकारचे शिक्षणमंत्र्याद्वारे बोलणे म्हणजे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण करण्याची मानसिकता व्यक्त करणे होय. त्यांनी दाखवून दिले की ते एका विशिष्ट व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत व तीच व्यवस्था गरीब व मागासांवर लादू इच्छित असल्याचे त्यांच्या मनातले ओठावर येत आहे. एकंदरीत राज्यातील गरिबांची मुले पूर्णत: शिक्षण मंत्र्याच्या तावडीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. तेव्हा या मानसिकतेला पूर्ण ताकदीने सर्व स्तरातून विरोध करण्याची गरज आहे.
दिनानाथ वाघमारे
संघर्ष वाहिणी, भटक्या विमुक्तांचा लढा लढणारे कार्यकर्ते

 

Web Title: The children of the poor are in the cluches of the Education Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.