The cases should be filed against them | त्यांच्यावर खटले दाखल व्हावेत

- सुरेश द्वादशीवार
(संपादक, लोकमत, नागपूर)

स्वातंत्र्य लढ्याची स्मरणे पुसून टाकण्याची व त्या लढ्याचे नेतृत्व करणाºयांवर कमालीची ओंगळ व बीभत्स टीका करून त्यांना बदनाम करण्याची एक पगारी मोहीमच सध्या देशात राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी झालेले लोक आताचे मोदी सरकार आणि त्याची पाठराखण करणारा संघ परिवार यांचा उदोउदो करतात आणि त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षांवर व नेत्यांवर अत्यंत असभ्य व नालस्तीखोर आरोप करतात.
महात्मा गांधी व पं. नेहरूंसारखे दिवंगत राष्ट्रपुरुष जसे या चिखलफेकीतून सुटत नाही तसे आताचे राहुल गांधी ते ममता बॅनर्जीपर्यंतचे पुढारीही त्यातून मुक्त राहात नाहीत. सोशल मीडिया नावाची जी प्रभावी प्रचार यंत्रणा सध्या देशात कार्यरत आहे. ती ताब्यात घेऊन व तीत आपले पगारी हस्तक नेमून ही मोहीम राबविण्याचे तंत्र भाजप व संघ परिवारातील लोकांनी कमालीच्या सावधपणे अवलंबिले आहे. ही माणसे कमालीचे खोटेनोटे लिहितात. घटनांचे विकृतीकरण करतात. सत्याचा अपलाप करतात आणि आपल्या ‘जवळ’ असणाºयांच्या मतांवर अतिशय विपरीत बाबी बिंबवितात.
मुंबईत अशा प्रचाराचे भगत बनलेले एक वरिष्ठ पोलीस अधिकारी मला अगदी सहजपणे म्हणाले ‘नेहरू धर्माने हिंदू नव्हते ते मुसलमान होते’ अशा माणसांना मग काय सांगा-शिकवायचे राहते. गांधींजीविषयींचाही असाच ओंगळ आणि किळसवाणा व बीभत्स मजकूर या मीडियावरून पसविरला जातो. ज्यांच्या पावलांपर्यंत आपली डोकीही पोहचत नाही त्या वंदनीय महापुरुषांविषयी एवढे निलाजरे लिखाण करणारी बेशरम पुन: स्वत:ला सभ्य, सुसंस्कृत व बौद्धिकांच्या संस्कारात कायम वाढले असे सांगत असतात. त्यांना साथ देणारी व त्यांच्या शिकवणीचे ओझे मनावर घेतलेली एक परंपराच आपल्यात आहे. आपल्या ‘गुरुजनां’सहित इतर साºयांची मते कमालीची तिरस्कृत व त्याज्य असल्याची भाषा त्यांच्या तोंडात नसते, चर्येवरही नसते. आमचेच तेवढे शुद्ध, सदाचारी, सुसंस्कृत आणि देशभक्त असे मानणारा हा अंधश्रद्धांचा वर्ग इतर साºयांना केवळ तुच्छच नाही तर देशद्रोही ठरवूनच मोकळा होतो. (डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारख्या स्वच्छ व सबळ चारित्र्यवान नेत्यावर ज्याने नुकताच देशद्रोहाचा आरोप केला. तो माणूस सामान्य नव्हता. देशाचा पंतप्रधान होता) वास्तव हे की मीडियावर अशी भाषा लिहिणारी माणसे कमालीची विकृत असतात आणि त्यांची भाषा सभ्य माध्यमांवर उद्धृत करण्याजोगीही नसते. लोकशाहीला टीका मान्य आहे. ती जुन्या व ऐतिहासिक घटनांवर असली तरी मान्य असते. पण जुन्या घटना विकृत करून लोकांसमोर मांडणे व आपल्या विरोधकांच्या वक्तव्यावर ओंगळ टीका करणे ही लोकशाही नव्हे, ती माणुसकीही नव्हे.
भाजपाचे एक सचिव व सध्याच्या जम्मू आणि काश्मीर सरकारचे सल्लागार राम माधव यांनी असे ओंगळ लिखाण करणा-या २००० लोकांची एक फौजच तयार केली आहे. ती संगणकाची जाणकार आहे आणि त्यांचे गुरू त्यांना जे लोकांपर्यंत पोहचविण्यास सांगतात ते निष्ठेने पोहोचविणारी आहे. आरंभी या फौजेचे मुख्यालय बेेंगळुरु हे होते. आता ते दिल्लीत कार्यरत आहे आणि त्यांच्या शाखा देशभरातील सर्व मोठ्या शहरात पोहचल्या आहेत. दिल्लीतील विरोधी नेत्यांपासून गल्लीतील विरोधकांपर्यंत सापडेल त्याला बदनाम करणारी ही फौज पगारी व संघनिष्ठ आहे. या फौजेत साकार झालेल्या व पुढे लिखाणातून बाहेर पडलेल्या अनुभवी लेखक-लेखिकांनी त्यांचे खरे व विद्रूप स्वरूप पुस्तक रूपाने देशाला सांगितलेही आहे.
संघ परिवारात त्यांच्या पुस्तकांना व लिखाणाला उत्तर देणे जमले नाही. त्याकडे दुर्लक्ष करणेच त्यास आजवर उपयुक्त वाटले आहे. या लेखकांनी या संगणकधारी फौजेचे व तिच्या गुरूंचे वर्णन करताना, त्यांचे खरे लक्ष देशाचे नेतृत्व करणारी व त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेली नेते मंडळी व जनता हे आहे. मुळात लोक वा जनता यांच्याविषयी कमालीची तुच्छतेची भावना बाळगणारी ही सभ्य व सुसंस्कृत माणसे आहेत.
गांधी, नेहरू, मौलाना किंवा तेवढ्या उंचीच्या माणसांची बदनामी करून त्यांना लोकांच्या मनातून उतरवून ठेवण्यासहित त्या मनात आपली दैवते बसविता येणार नाहीत हे त्यांचे दुखणे आहे. मग अशा थोरनेत्यांचे कोणतेही टीकाकार अगदी पाकिस्तानवादी असले तर ते त्यांना चालणारे आहेत. या मंडळीची खरी अडचण त्यांनी स्वातंत्र्य लढ्यापासून राखलेले सोवळे अंतर ही आहे. ही माणसे त्या लढ्यात नव्हती. ती लोकलढ्यात नव्हती आणि समस्त क्रांतिकारकांसोबतही नव्हती. तो वारसा आपल्या मागे नसल्याची खंत मात्र त्यांच्यात आहे. ती खंत निखालस तो लढा कसा अपयशी होता आणि त्यांचे लोकनेते हेच कसे चुकीच्या मार्गाने जाणारे होते, हे सांगायला ही माणसे मग पुढे येतात. त्यांच्या मागे स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहिलेला संघ असतो, त्यातही राम माधवांसारखी प्रचारी माणसे असतात. सरकार असते आणि सरकारचा पैसा व रसद पोहचविणारे उद्योगपतीही असतात. गेल्या काही वर्षात काँग्रेससोबत असलेली अनेक बडी पत्रकार माणसे भाजपात जाऊन मंत्री बनली आहेत. या माणसांना अलिकडे देशभक्तीची शिंगेही फुटली आहेत. ही माणसेही मग स्वातंत्र्यलढ्यास व त्याच्या सच्च्या नेत्यांना नावे ठेवण्यात आपली विद्वत्ता खर्ची घालताना दिसू लागली आहेत. वास्तव हे की अशा माणसांना राजकीय गुन्हेगार ठरवून त्यांच्याविरुद्ध कायदेशिर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे.
ही माणसे देशातील महापुरुषांना बदनाम करीत नाहीत. ती देशालाही बदनाम करून त्याचे नाव धुळीला मिळवित असतात. हे मीडियावरील हस्तक (ट्रोल) शोधून काढणे अवघड नाही. पण दाभोलकर, पानसरे किंवा कलबुर्गींचे खुनी जसे सापडणार नाहीत अशी व्यवस्था केली जाते तसे या प्रचारी हस्तकांनाही मोकळे ठेवण्याची शक्कल सरकारला जमत असते. मग गौरी लंकेशचे खुनी सापडत नाहीत आणि गांधी, नेहरूंवर चिखलफेक करणारेही पोलिसांच्या नियंत्रणात येत नाही.


Web Title:  The cases should be filed against them
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.