बिनभरवशाच्या म्हशीला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:58 PM2018-06-18T23:58:30+5:302018-06-18T23:58:30+5:30

देशात सध्या गार्इंचा कैवार घेणारं सरकार असल्यामुळं बिचाऱ्या म्हशींना विरोधकांसारखी वागणूक मिळत आहे.

 Bin dependency buffalo ... | बिनभरवशाच्या म्हशीला...

बिनभरवशाच्या म्हशीला...

googlenewsNext

- नंदकिशोर पाटील
देशात सध्या गार्इंचा कैवार घेणारं सरकार असल्यामुळं बिचाऱ्या म्हशींना विरोधकांसारखी वागणूक मिळत आहे. गोहत्याबंदी, गोवंशहत्याबंदी, गोमांसबंदी यासारखे कायदे आणून सरकारनं गोवंशाचं रक्षण करण्याला प्राधान्य दिल्यानं म्हशींची अवस्था ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी झाली आहे. वस्तुत: म्हैस ही अस्सल देशी पशु असून गाय ही आर्यांच्या टोळ्यांसोबत आलेली परकीय पैदास आहे, या ऐतिहासिक सत्याकडे राष्टÑवादी म्हणविणाºया सरकारने एकतर दुर्लक्ष केले असावे. अथवा, पुराणात म्हशींचा कुठेच उल्लेख आढळून येत नसल्यामुळे म्हशींना ते देशी मानायला तयार नसावेत. शिवाय, गार्इंच्या पोटी तब्बल तेहतीस कोटी देवाचं वास्तव्यं असल्यामुळं तशीही ती प्रात:स्मरणीय आहेच की! म्हशीचं काय? पुराणात फक्त रेड्याचा उल्लेख. तोही चक्क यमाचं वाहन म्हणून!! सरकार कोणत्याही विचारसरणीचं असलं तरी यमाशी पंगा थोडंच घेणार? त्यापेक्षा नंदी बरा. पाऊस पाडतो अन् औतही हाकतो. गोवंश कुळातील नंदी सरकारला जवळचा वाटण्यामागं आणखी एक सबळ कारण असण्याची शक्यता आहे. ती अशी की, समजा गुबुगुबु वाजवून त्याला विचारलं ‘अच्छे दिन येणार का?’ तर त्यावर तो लगेच मान हलवेल! रेड्याच्या बाबतीत ही खात्री देता येत नाही. मग अशा बिनभरवशाच्या टोणग्याला कोण कशाला जवळ करेल? पण आपलं सरकारही मोठं गमतीचं आहे. गोरगरीब जनतेसाठी रेशन दुकानावर गहू देण्याऐवजी आता मका देण्यात येत आहे. मका हे तर पशुंचं खाद्य. ते माणसांना खायला देण्यामागे सरकारचा नेमका काय हेतू आहे, हे समजायला मार्ग नाही. पगडी आणि पागोट्याच्या खेळात रमलेल्या जाणता राजाचंही याकडं अजून लक्ष गेलेलं नाही. पण सतत डोळ्यांत तेल घालून सरकारवर जागता पाहारा ठेवणाºया जागरुक शिवसैनिकांच्या नजरेतून ही बाब सुटलेली नाही. परवा त्यांनी कोल्हापुरात भला मोठा मोर्चा काढला. मोर्चेकºयांमध्ये एक म्हैसही होती. कासरा लावून तिला जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले होते. काही उत्साही शिवसैनिकांनी तिला आतमध्ये घुसविण्याचा प्रयत्न केला. पण मुळातच या सरकारबद्दल राग असलेली ती म्हैस सरकारी कार्यालयाच्या आवारात क्षणभरही थांबायला तयार नव्हती. त्यामुळं ‘जनावरांचा चारा खाऊ घालणाºया सरकारचा धिक्कार असो’ अशी घोषणा होताच ती उधळली आणि कासºयाला न जुमानता सैरावैरा धावत सुटली. ‘अगं अगं म्हशी...’ म्हणत काही शिवसैनिक तिच्या मागे धावले, पण ती कुणाचंही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तितक्यात कुणीतरी तिला कोंडा खाऊ घातला अन् त्यानंतर कुठं ती शांत झाली म्हणतात! भरवशाच्या म्हशीनं असा ऐनवेळी दगाफटका केल्याने शिवसैनिकांचा पुरता हिरमोड झाला. शिवाय, दुसºया दिवशीच्या वर्तमानपत्रात (‘सामना’ सोडून!) ‘म्हशीनं शिवसेनेचं आंदोलन उधळलं ’ अशा बातम्या आल्याने सेनेची फटफजिती झाली ती वेगळीच. पण मुळात प्रश्न असा की, शिवसैनिकांनी या आंदोलनासाठी गाईऐवजी म्हशीचीच का निवड केली? त्यांना ही राय दिली कुणी? नाहीतरी शिवसेना म्हणजे ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ असा सध्या भाजपाचा समज झालेला आहेच. तो दूर करण्यासाठी तर म्हशीची निवड केली नसेल ना? खरं-खोटं त्यांना अन् म्हशीला माहीत!!

Web Title:  Bin dependency buffalo ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय