भिड्यांचा आंबा इंद्रदरबारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:35 AM2018-06-18T01:35:30+5:302018-06-18T01:35:30+5:30

स्वर्गलोकातील कृषिरत्नांनी आणि वैद्यकतज्ज्ञांनी भिड्यांच्या आंब्याचे त्रिलोकातील पेटंटवर दावा केल्याने एक नवा वाद इंद्रदरबाराच्या पटलावर आला होता.

Bhamee mango IndraBarwara ... | भिड्यांचा आंबा इंद्रदरबारात...

भिड्यांचा आंबा इंद्रदरबारात...

Next

- राजा माने
स्वर्गलोकातील कृषिरत्नांनी आणि वैद्यकतज्ज्ञांनी भिड्यांच्या आंब्याचे त्रिलोकातील पेटंटवर दावा केल्याने एक नवा वाद इंद्रदरबाराच्या पटलावर आला होता. भिड्यांच्या आंबे पुराणावर इंद्रलोकचा मराठीभूमीतील स्टार रिपोर्टर यमकेने बातम्यामागील बातम्या शोधून आपला रिपोर्ट महागुरू नारदांना सादर केला होता. राज यांच्या व्यंगचित्रापासून ते थेट भिडेभक्तांच्या पत्रकार परिषदेपर्यंतची खडान्खडा माहिती त्याने देऊनही या नव्या पेटंटवादाने यमके हैराण झाला होता. त्यातून मुक्ती मिळावी म्हणून अखेर त्याने नारदांना फोन केला अन् बोलू लागला...
यमके- चरणस्पर्श करतो गुरुदेव! ‘भिड्यांचा आंबा’ या विषयात आता दम राहिलेला नाही. मग इंद्रदरबारात हा वाद कशासाठी?
नारद - शिष्या, फळांच्या राजाचा विषय इतक्या सहजतेने कसा संपेल? चार हजार वर्षांचा इतिहास असलेला हा लाडका राजा आहे. आमीर खुसरोसारख्या शायरापासून अकबर बादशाहपर्यंत सर्व क्षेत्रातील हा लाडका आंबा आहे. मग त्याचे पेटंटही तेवढेच महत्त्वाचे ना!
यमके - मग, तिथे भिड्यांच्या आंब्याच्या पेटंटचा काय संबंध?
नारद - अरे, स्वर्गलोकातील दिग्गजांनी त्या पेटंटवर दावा केला, एवढ्यावर हा विषय थांबलेला नाही. भू-लोकी नव्या वादांना तोंड फुटल्याचे तुला ठाऊक कसे नाही? अरे, वंध्यत्व निवारण शास्त्रात आयुष्य झिजविणाऱ्या शेकडो डॉक्टरांनी या आंब्याच्या विरोधात आवाज उठविला आहे. केमिस्ट संघटनांनी हा आंबा आता आमच्या दुकानातही ठेवू द्या, अशी मागणी केली आहे. रामदेवबाबाही आता याच आंब्याचा ब्रँड घेऊन त्याचे मार्केटिंग करणार आहेत म्हणे! मोदींच्या भिडेप्रेमाचा आधार घेत ते पेटंट आपल्या आश्रमात नेण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणे!
यमके - तरीही भिड्यांचा आंबा कल्पनेतला आणि स्वप्नातलाच आहे, हे कुणाला कसे समजत नाही?
नारद - भिड्यांना शेतही नाही आणि आंब्याची बागही नाही तरीही त्यांनी सांगितलेल्या आंब्याची कोय उस्मानाबादच्या मोहित्यांच्या शेतातील आहे.
यमके- असेल! त्याला एवढे का महत्त्व देता? आंबे खाऊन मुलं-बाळं झाली असे सांगणारे १८० कुटुंब कुठे आणि कशी आहेत?
नारद- शिष्या, तू फक्त सरळ विचार करतोस. कोय उस्मानाबादची म्हणून भिड्यांच्या आंब्यांच्या पेटंटवर मराठवाड्याचा हक्क असल्याचा दावा केला जातोय. अशोकराव, धनुभाऊ, पंकजाताई, अमितभैय्यापासून ते खैरे-निलंगेकरांपर्यंत ही मागणी रेटण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याची वार्ता आहे.
यमके - मग, आता मला कोणती असाईनमेंट देता?
नारद - स्वत:चे शेत नाही व पर्यायाने आंब्यांची बागही नाही, असे असताना भिड्यांनी आंब्याच्या विषयाला जन्मीच का घातले? या प्रश्नाचे उत्तर शोध.
यमके - मोदी कवचकुंडल आणि भीमा-कोरेगाव विषयांना बगल देण्यासाठी या विषयाचा जन्म झाला असेल गुरुदेव!
नारद - शिवभक्तीवर बेंबीच्या देठापासून बोलणाºयाने विज्ञानाशी बंड करू नये. आपल्या अंधभक्तांना अंधश्रद्धेला मिठ्या मारण्यास भाग पाडू नये हे भिड्यांना कोण सांगणार? हाच संदेश इंद्रदरबारातील पेटंटवादावरही पडदा टाकेल.

Web Title: Bhamee mango IndraBarwara ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.