बार्शीचा ‘म्होरक्या’ देशपातळीवर

By राजा माने | Published: May 9, 2018 12:14 AM2018-05-09T00:14:04+5:302018-05-09T00:36:17+5:30

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा कवी, लेखक, चित्रकार, दिग्दर्शक आणि अभिनेता अमर भारत देवकर याच्या ‘म्होरक्या’ या चित्रपटास ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपटा’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्वत: घडत असताना अनेक शिष्य घडविणे हा अमरचा पिंड...

 Barshi's 'captain' at the country level | बार्शीचा ‘म्होरक्या’ देशपातळीवर

बार्शीचा ‘म्होरक्या’ देशपातळीवर

Next

ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण जीव ओतून कामाला लागला की, तो कुठल्याही क्षेत्रात असो, इतिहासच घडवितो! हा अनुभव तुम्हा-आम्हाला नवा राहिलेला नाही. सोलापूर जिल्हा तर याबाबतीत खूपच भाग्यवान. चित्रपट क्षेत्रासारख्या यशाच्या बाबतीत अस्थिर आणि अनाकलनीय असलेल्या क्षेत्रात शशिकला, जब्बार पटेल, सरला येवलेकर, फय्याज, अतुल कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गजांपासून ते मागील वर्षी इतिहास घडविणाऱ्या नागराज मंजुळेपर्यंतची अनेक नावे या जिल्ह्याच्या सिनेक्षेत्र नामावलीत कोरली गेलेली आहेत. त्याच नामावलीला समृद्ध करण्याचे काम याच जिल्ह्यातील भगवंत नगरीबरोबरच ‘सांस्कृतिक नगरी’ म्हणून ओळख असलेल्या बार्शी तालुक्यातील अमर भारत देवकर या तरुणाने केले आहे.
हाडाचा कलावंत जेवढा हळवा असतो तेवढाच जिद्दीदेखील असतो. अमर हा त्याच पठडीतला कलावंत. याच पठडीत राहून चित्रपट क्षेत्रातील अस्थैर्याचा बाऊ न करता त्याने मात्र त्या पठडीला नवा आयाम दिला. यशस्वी व्हायचे तर जिद्दी व हळव्या मनाला त्या क्षेत्रातील बारकाव्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास असायलाच हवा, हे त्याने जाणले. त्याच कारणाने त्याने पुणे विद्यापीठातून चित्रपट निर्मितीची पदवी (एमएससी) घेतली. वडील शिक्षक तर आई घरसंसारात गुंतलेली. ग्रामीण भागातील प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाच्या वाट्याला येणारी ही पार्श्वभूमी. वडील भारत हेदेखील कलावंतच! त्यामुळे कलेचे बाळकडू त्याला कुटुंबातच लाभले. बार्शीच्या छ. शिवाजी प्रशालेत शालेय शिक्षण तर श्री शिवाजी महाविद्यालयात बी. ए. व बी.एड.चे शिक्षण त्याने घेतले. लहानपणापासून कलाक्षेत्रच आपले जीवन मानण्याचा संस्कार त्याच्या मनावर झाल्याने कलेच्या अनेक प्रांतांत त्याची धडपड सदैव सुरू झाली. त्याच कारणाने कवी मनाचा अमर आज कवी, लेखक, चित्रकार आणि शिल्पकार म्हणूनही नावारूपास आला. आज त्याच्या सिनेक्षेत्रातील दखल घेताना त्याने आजवर ८८ लघुपटांत बजावलेल्या भूमिकेची आवर्जून आठवण होते. त्याने नाट्य आणि सिनेनिर्मितीसाठी घेतलेल्या अनेक प्रशिक्षण शिबिरांनी त्याचे कलामूल्य सदैव उंचावत नेले. त्याच बलशाली सामर्थ्यावर लेखक, दिग्दर्शक, सहनिर्माता आणि अभिनेता म्हणून त्याने जन्मी घातलेल्या ‘म्होरक्या’ या चित्रपटास सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून राष्टÑीय पुरस्कार मिळाला. याच चित्रपटाचा बालनायक रमण देवकर व यशराज कºहाडे यांनाही राष्टÑीय पुरस्कार मिळाले. राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी अमर आणि त्याच्या टीमची दखल घेतली आणि ५५ व्या मराठी चित्रपट महोत्सवात अमर व ‘म्होरक्या’च्या टीमसह निर्माते कल्याण पडाल, युवराज सरवदे यांचाही पुरस्कार देऊन गौरव केला.
अमर देशभरातील अनेक विद्यापीठांत चित्रपट निर्मितीसंदर्भात व्याख्याने देण्यास हजेरी लावतो. त्याहून महत्त्वाचे त्याने बार्शी तालुक्यातील २० विद्यार्थी या क्षेत्रासाठी घडविले. ते आज नाट्य, सिनेक्षेत्रात पूर्णवेळ काम करीत आहेत. अनेक राष्टÑीय युवा महोत्सव गाजविणाºया अमर देवकर याने लिहिलेल्या ‘आयडेंटिटी’ या लघुपटाला देखील अनेक पुरस्कार मिळाले होते. समाजाची भावना आणि जीवनशैलीची नाडी पकडणाºया विषयांवर स्वत: लेखन करून कलाकृती घडविणे हा अमरचा पिंड आहे. स्वत: घडत असताना आपल्यासोबत अनेक शिष्य घडविणारा बार्शीचा अमर आज राष्टÑीय पातळीवर पोहोचला आहे.
- राजा माने

Web Title:  Barshi's 'captain' at the country level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.