अविनाश डोळस : चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 07:12 AM2018-11-12T07:12:48+5:302018-11-12T07:13:23+5:30

मी डोळस सरांचा विद्यार्थी. गेवराईच्या आर. बी. अट्टल महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तो काळ वादळी होता

Avinash Dull: The wealthy of the smart personality | अविनाश डोळस : चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी

अविनाश डोळस : चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी

Next

मी डोळस सरांचा विद्यार्थी. गेवराईच्या आर. बी. अट्टल महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले तो काळ वादळी होता. एकीकडे स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याची धामधूम सुरू होती आणि दुसरीकडे त्याची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नाहीत या दाहक वास्तवाची जाणीव लोकांना होऊ लागलेली होती. अशातच आम्ही आतापर्यंत वाचलेल्या कवितांपेक्षा अंतर्बाह्य वेगळी अशी नामदेव ढसाळ यांची कविता वाचनात येऊ लागली. स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या साधनेच्या विशेषांकात राजा ढालेंचा राष्ट्रध्वजाविषयी स्फोटक विधान असलेला लेख वाचनात आला. या सगळ्यांची संगती लावणं हे पठडीतल्या मराठी प्राध्यापकांच्या कुवतीबाहेरचे काम होते; पण ते समजावून घेण्याची तगमग होती.

एका वर्गात नव्यानेच रुजू झालेले प्राध्यापक मराठी शिकवीत होते. त्यांची बहुतेक मर्ढेकरांची कविता सुरू होती. त्यांनी अगदी अभिनव पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे नवकवितेचे विश्लेषण मांडले. त्यांचा व्यासंग, भाषाशैली, कविता आणि ज्या काळात ती जन्माला आली तिचे आकलन या सर्वच बाबी प्रभावी होत्या. मग भेटी वाढत गेल्या आणि जिव्हाळा निर्माण झाला.

डोळस सर दलित चळवळीमध्ये सक्रिय असल्याचे त्यानंतर कळले. खरे तर ते दलित आहेत हेही नंतरच कळले. त्यांचा पिंड केवळ वाचून थांबण्याचा नव्हता, तर प्रत्यक्ष कृती करण्याचा होता. गेवराईसारख्या सरंजामी वातावरण असलेल्या गावातसुद्धा त्यांनी आपल्या या वृत्तीला मुरड घातली नाही. नव्याने येऊन एखाद्या गावात नवा पायंडा पाडणे हे सोपे काम नसते; परंतु थोड्याच अवधीत तिथे त्यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्याची मोहीम हाती घेतली. ती यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातीलच नव्हे, तर गावातील इतरांशी संपर्क केला आणि ती आयोजित केली.
२८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर म्हणजे फुले स्मृतिदिन ते आंबेडकर स्मृतिदिन अशा निमित्ताने ती आयोजित केली होती. त्यात बाहेरून वक्ते आले आणि ते जे बोलले त्यामुळे खळबळ माजली. संस्थाचालकांनी त्यांना याचा जाब विचारला. सरांना परिणामाची पुरेपूर जाणीव होती. त्याची तमा न बाळगता त्यांनी हे पाऊल उचलले होते. परिणाम जे व्हायचे तेच झाले; परंतु सर निर्विकार होते. नंतर ते मिलिंद कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

या सगळ्या तणावातून जाताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव कधीही दिसून आले नाहीत. त्यांची ही वृत्ती ते अनेक गंभीर संकटांतून जात असतानाही दिसून आली. शिष्यवृत्ती वाढ आंदोलनात त्यांनी ज्या पद्धतीने सर्व पुरोगामी युवक संघटनांना सहभागी करून घेतले होते त्यात त्यांच्या या लोकसंग्रहाच्या पाठीशी त्यांच्या या लोभस व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा वाटा आहे. नामांतराच्या निमित्ताने उसळलेल्या दलितविरोधी हिंसाचारानंतर आपद्ग्रस्त दलित सहायता समिती गठित करण्यातही त्यांच्या या कौशल्याचा फार उपयोग झाला. एकेकाळच्या कडव्या नामांतर विरोधकांशीसुद्धा त्यांचा संवाद कुठलीही कटुता न येता अबाधितपणे सुरू होता. परिणामत: नामविस्ताराची चळवळ शेवटच्या टप्प्यावर असताना अनेक नामांतर विरोधकांचा विरोध केवळ मावळलेलाच नव्हता, तर त्यापैकी अनेकांनी नामांतराला सक्रिय पाठिंबा दिलेला होता. ते आंबेडकरवादाचे केवळ अभ्यासकच नव्हते, तर त्या तत्त्वज्ञानाचा अन्वयार्थ लावण्यात आज ज्यांचा हातखंडा आहे त्या बोटावर मोजता येण्यासारख्या विचारवंतांमध्ये त्यांचे आघाडीचे स्थान होते. त्यांच्या या गुणविशेषाचेच फलित म्हणून त्यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधना समितीचे सचिव म्हणून केलेली होती. अशा चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या सहवासाला आपण आजपासून मुकत आहोत, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.

प्रा. प्रकाश सिरसाट 

(लेखक ज्येष्ठ पुरोगामी कार्यकर्ते आहेत)

Web Title: Avinash Dull: The wealthy of the smart personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.