कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान!

By किरण अग्रवाल | Published: March 22, 2018 08:00 AM2018-03-22T08:00:10+5:302018-03-22T08:00:10+5:30

कालौघात होणारे बदल स्वीकारून मनुष्य पुढे जात आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. बदल मनुष्याने स्वीकारले नाहीत तर तो मागे पडेल अथवा व्यवस्था ही संबंधित व्यक्तीलाच बदलून नवे ते स्वीकारेल; हे इथपर्यंत ठीक.

Artificial intelligence challenge! | कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान!

कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान!

Next

कालौघात होणारे बदल स्वीकारून मनुष्य पुढे जात आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. बदल मनुष्याने स्वीकारले नाहीत तर तो मागे पडेल अथवा व्यवस्था ही संबंधित व्यक्तीलाच बदलून नवे ते स्वीकारेल; हे इथपर्यंत ठीक. परंतु या बदलांच्या मालिकेत मानवी बुद्धीला मागे टाकत कृत्रिम बुद्धिमत्तेचे जे विज्ञान पुढे आले आहे, त्याचा मानवीयतेशी मेळ कसा घालायचा आणि अंतिमत: त्यातून निर्माण होणाऱ्या क्षमतांचा मानव कल्याणसाठीच कसा उपयोग घडवून आणायचा हे मोठे आव्हानच आहे.

दिवसेंदिवस माणसाचे परावलंबित्व वाढत असून, ते अनेकांगाने विचारात घेता येणारे आहे. कमाई आणि कर्तृत्व यात भलेही स्वावलंबन दिसून येत असेल; पण काळानुरूप तो ज्या पद्धतीने व प्रमाणात तंत्राच्या आहारी जात आहे, ते पाहता हे असले परावलंबित्व त्याला कुठे नेऊन ठेवणार याबाबत चिंताच वाटावी. साधी गोष्ट घ्या, मोबाइल येण्यापूर्वी फोन होते तेव्हा अनेक नंबर्स सहजपणे लक्षात असत. प्रत्येकवेळी खिशातली डायरी काढून नंबर तपासून घेण्याची गरज भासत नसे. पण आता मोबाइल आल्यापासून जवळच्या आप्तेष्टांचा नंबरही सहसा लक्षात ठेवण्याची गरज कुणाला भासत नाही. नावाची आद्याक्षरे टाकून शोध घेतला की नाव सापडते व संपर्क करता येतो. त्यासाठी नंबर शोधण्याची गरज नसते. हे तसे किरकोळ उदाहरण झाले; परंतु अशा अनेक बाबी सांगता येणार्‍या आहेत ज्यातून मनुष्याचे परावलंबित्व स्पष्ट व्हावे. जमाना तर ‘रोबो’चा आहे. सर्व काही तोच म्हणजे यंत्रमानवच करणार. वाहनचालक नसलेली वाहनेही बाजारात आली आहेत. कुठे जायचे, कसे जायचे ही माहिती फिड केली की आपण केवळ बसून राहायचे! ही सर्व उदाहरणे कृत्रिम बुद्धिमत्तेतून साकारलेल्या क्षमतेची आहेत. त्यातून विकासाला गती मिळत आहे व मानवाचे कल्याणच होत आहे हे खरेही; परंतु ही कृत्रिम बुद्धिमत्ताच येणाºया काळात आव्हानात्मक ठरणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. जगविख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी या विषयाला गांभीर्याने मांडले. म्हणूनच त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना या विषयाकडेही लक्ष वेधले जाणे गरजेचे आहे.

नाशकात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला व मराठी विज्ञान परिषदेच्या विद्यमाने आयोजित ‘स्टीफन हॉकिंग : कृत्रिम बुद्धिमत्ता व मानवी जीवन’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. होमी भाभा संशोधन संस्थेचे तंत्रज्ञ डॉ. आनंद घैसास यांनीही या जटिल विषयाची उकल अतिशय सोप्या पद्धतीने करून देत आगामी काळातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भयावह परिणामांची चिंता उपस्थितांसमोर व्यक्त केली. मनुष्य हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी गेला असून, त्याने स्वत:ला त्यात असे काही गुंतवून घेतले आहे की, त्याची विचारक्षमताच लयास जात आहे ही वास्तविकता आहे. मनुष्याच्या नैसर्गिक बुद्धीचा विकास होताना त्यात व्यक्तिगणिक वेगवेगळ्या मर्यादा येणार्‍या असतात; पण कृत्रिम बुद्धिमत्तेला त्या मर्यादा नाहीत. मनुष्यावर लहानपणापासून होणारे संस्कार व आयुष्यात घडणाºया घटना त्याच्या मनावर कोरल्या जातात. त्या जशा स्मृतीत राहतात तशी ती स्मृती नष्टही होते. मनुष्य विसरतो, कारण त्याला आठवत नाही. परंतु संगणकात एकदा साठविलेली माहिती विस्मृतीत जात नाही आणि एकापेक्षा अधिक व्यक्ती त्या माहितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून भर घालत असतात. यंत्र खराब झाल्याखेरीज त्यात अडचण नसते. यातून कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा नाही, हे लक्षात यावे. दुसरीकडे, मनुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे कारण शोधण्याची क्षमता आहे. पण कल्पनेपलीकडे काही घडून आले किंवा क्षमता संपली की तिथे देव आकारास येतो, हे स्टीफन हॉकिंग यांनी म्हटले होते. आज विज्ञानाच्या आधारे मानसातील बुद्धिमत्तेची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून कृत्रिम बुद्धिमत्ताच दिवसेंदिवस विकसित होणार आहे. त्यातून अनेक प्रमेय सोडवता येणार आहेत. त्याची उपयोगीता मोठीच आहे यातही वाद नाही. प्रश्न आहे तो केवळ यात मानवीयता आणता येईल का, याचा. मानवीय ज्ञानाचा, संवेदनांचा उपजत आविष्कार यंत्रात व कृत्रिम बुद्धिमत्तेत कसा अंतर्भूत करता येईल, हे यासंदर्भात महत्त्वाचे ठरणार आहे. तसे करता न आल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचे भयावह परिणाम समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. स्टीफन यांनी तेच मांडले होते. घैसास यांनीही तोच धागा पुढे नेला. तेव्हा, यावर गांभीर्यपूर्वक मंथन होणे गरजेचेचे आहे.

Web Title: Artificial intelligence challenge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.