चाप बसवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:52 PM2017-12-20T23:52:25+5:302017-12-21T00:04:13+5:30

काही इस्पितळांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून यावर चाप बसविण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्याचा विचार शासन करीत असून हे पाऊल स्वागतार्ह आहे.

 Arc bus | चाप बसवाच

चाप बसवाच

Next

काही इस्पितळांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून यावर चाप बसविण्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्याचा विचार शासन करीत असून हे पाऊल स्वागतार्ह आहे. तसे बघता हा कायदा यापूर्वीच लागू व्हायला हवा होता. परंतु उशिरा का होईना शासनाला ही बुद्धी सुचली ते फार चांगले झाले. अर्थात हा कायदा लागू करणे तेवढ सोपे नाही, कारण इंडियन मेडिकल असोसिएशन आणि खासगी डॉक्टरांचा त्याला तीव्र विरोध आहे. नागपुरात सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. सभागृहात हा मुद्दा चर्चेला आला होता. अनेक स्वयंसेवी संस्था रक्त विकत असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले तेव्हा अशा संस्थांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले. अलीकडच्या काळात आरोग्यसेवेचे फार मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण झाले असून काही इस्पितळे व्यवसायाच्या नावावर रुग्णांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत असल्याच्याही तक्रारी प्राप्त होत आहेत. शासनाच्या विविध आरोग्य योजनांनाही भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. गेल्या पंधरवड्यातच नागपुरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे एक प्रकरण उघडकीस आले होते. गरीब रुग्णांकरिता शासनातर्फे जीवनदायी आरोग्य योजना राबविली जाते. याअंतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी सुपरस्पेशालिटीमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये पळविण्याचा गोरखधंदा सुरू आहे. रुग्णांना योजनेच्या यादीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले जाते. योजनेचा पैसा घेतला जातो शिवाय वेगवेगळ्या कारणावरुन रुग्णांची १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत फसवणूक केली जाते, अशी तक्रार आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्येही अशीच परिस्थिती आहे. गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात आधुनिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत म्हणून धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी २० टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही तेथे गरिबांना उपचार नाकारण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. मुळात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात पूर्वीसारखी विश्वासार्हता आता राहिली नाही. डॉक्टरांच्या नावाने लोक घाबरून जातात. खरे तर रुग्णालये ही माणसांना जगण्याचे बळ देणारी असली पाहिजेत. परंतु व्यावसायीकरणाच्या या युगात रुग्णालयांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांवर चाप बसविण्यासोबतच डॉक्टर-रुग्ण संबंध कसे सुधारतील याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title:  Arc bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर