शेख हसिनांमुळे बांगलादेशात ‘अपोरिबोर्तन’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:54 AM2019-01-03T01:54:27+5:302019-01-03T01:55:06+5:30

बांगलादेशच्या संसदेसाठी ३० डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शेख हसिना यांच्या अवामी लीग आणि तिच्या मित्रपक्षांचा प्रचंड विजय झाला. त्यांना ३०० पैकी २८८ जागा मिळाल्या.

 'Aporiboran' in Bangladesh due to Sheikh Hasina | शेख हसिनांमुळे बांगलादेशात ‘अपोरिबोर्तन’

शेख हसिनांमुळे बांगलादेशात ‘अपोरिबोर्तन’

Next

- अनय जोगळेकर (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)

बांगलादेशच्या संसदेसाठी ३० डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शेख हसिना यांच्या अवामी लीग आणि तिच्या मित्रपक्षांचा प्रचंड विजय झाला. त्यांना ३०० पैकी २८८ जागा मिळाल्या. विरोधी पक्षांना केवळ सात जागा मिळाल्या. २०१४ साली झालेल्या निवडणुकीवर बांगलादेश नॅशनल पार्टीसह प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे शेख हसिना यांचे आव्हान सोपे होते. या खेपेस विरोधी पक्ष मैदानात असून, आवामी लीगच्या १२ जागा वाढल्या आहेत. बांगलादेशच्या संसदेत ३५० जागा असतात. त्यातील ५० महिलांसाठी राखीव असतात आणि विजयी झालेल्या पक्षांनी जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात त्या वाटून घेतल्या जातात. उरलेल्या ३०० जागांसाठी निवडणुका होतात.

२००९ साली सत्तेवर आल्यानंतर शेख हसिनांनी पद्धतशीरपणे विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यास प्रारंभ केला. बांगलादेश निर्मिती युद्धात झालेल्या मानवाधिकार हननाच्या गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानला मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात आल्या. भ्रष्टाचारविरोधी कारवाईचा भाग म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. बीएनपीच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया फेब्रुवारी, २०१८ पासून भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असून, आॅक्टोबरमध्ये झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील अपहाराबद्दल त्यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. राजकीय हिंसाचार आणि विरोधी विचारांचे दमन या गोष्टी वगळता, शेख हसिना यांच्या काळात बांगलादेशला स्थैर्य प्राप्त झाले असून, आर्थिक विकासाचा वेग वाढला आहे. दरडोई उत्पन्नात दीडपट वाढ झाली असून, गरिबी रेषेखालील लोकसंख्येत घट होऊन, ती १९ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर आली आहे. या कालावधीत बांगलादेश जगातील गरीब देशांच्या गटातून विकसनशील देशांच्या गटात पोहोचला असून, मानवी विकासाच्या अनेक निर्देशांकांत तो पाकिस्तान आणि भारतापेक्षा चांगली कामिगरी करत आहे.

आवामी लीगचा विजय ही भारतासाठी चांगली बातमी आहे. आपल्या बेल्ट-रोड प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि विकास प्रकल्पांची स्वप्ने दाखवून चीन एकापाठोपाठ एक भारताच्या शेजारी देशांना गळाला लावत असताना, बांगलादेश आणि भूतान हे दोनच देश खंबीरपणे भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत.
नरेंद्र मोदींच्या बांगलादेश भेटीत झालेल्या करारानुसार भारताला बांगलादेशच्या मोंगला आणि चितगाव बंदरांचा वापर करता येऊ लागल्यामुळे, पूर्वांचलातील राज्यांना देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांशी, तसेच आसियान देशांशी सागरी व्यापार करणे सुलभ झाले आहे.

बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून, खरे तर भारताच्या फाळणीपासून प्रलंबित भू-सीमा करार केल्यामुळे जमिनींची अदलाबदल करून सीमानिश्चिती करण्यात आली. या करारामुळे भारताच्या ताब्यातील सुमारे दहा हजार हेक्टर जमीन बांगलादेशला देण्यात आली, तर बांगलादेशच्या ताब्यातील सुमारे ५०० हेक्टर जमीन भारताला मिळाली. यामुळे सीमा बंदिस्त करता येऊन बेकायदा बांगलादेशी घुसखोरांना आळा घालणे शक्य झाले आहे. दहशतवाद आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादाशी लढण्यात बांगलादेश भारताला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत असून, त्यामुळेच पूर्वांचलात रस्ते, रेल्वे, पूल, वीज असे मोठे प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत. भारत-बांगलादेश संबंधांच्या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिल्यास, शेख हसिनांचा विजय ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.

Web Title:  'Aporiboran' in Bangladesh due to Sheikh Hasina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.