अण्णांचा खुळखुळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:40 AM2018-02-27T00:40:50+5:302018-02-27T00:40:50+5:30

अण्णा हजारे ही रा.स्व. संघाची राळेगणसिद्धीतील एक स्वयंसेवकीय शाखा आहे. संघाच्या अनेक अज्ञात संस्थांसारखीच ती एक आहे.

 Anna's peeve | अण्णांचा खुळखुळा

अण्णांचा खुळखुळा

Next

अण्णा हजारे ही रा.स्व. संघाची राळेगणसिद्धीतील एक स्वयंसेवकीय शाखा आहे. संघाच्या अनेक अज्ञात संस्थांसारखीच ती एक आहे. काही काळापूर्वी महाराष्ट्रात शेतक-यांचे महामोर्चे निघाले तेव्हा सरकारशी बोलून मध्यस्थी करण्याची आपली तयारी अण्णांनी जाहीर केली. ती शेतक-यांनीच नाकारून आमचा तुमच्यावर विश्वास नाही असे त्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले. त्यानंतर काही काळ गप्प राहिलेल्या अण्णांनी आता पुन्हा त्यांचे लोकपाल विधेयकाचे हत्यार परजायला सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. त्याआधी या विधेयकासंबंधीचा एखादा तोडगा काढून मोदींच्या सरकारला एक चांगले प्रशस्तीपत्र मिळवून देणे हा त्यांचा हेतू आहे. अण्णा साधे नाहीत. १५ वर्षांच्या राजकारणातील सहभागाने त्यांना बरेच काही शिकविले आहे. संघ, भाजप व त्याचा परिवार यांना धक्का लागणार नाही आणि त्यांच्या विरोधकांना जमेल तेवढे नामोहरम करता येईल अशी त्यांच्या राजकारणाची वाटचाल आहे. डॉ. मनमोहनसिंगांच्या कारकिर्दीच्या अखेरीस टु-जी सारखे (न झालेले) घोटाळे उघड्यावर आणले गेले तेव्हा अण्णांना देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचा व त्यासाठी जनमत संघटित करून काँग्रेस सरकारचा पराभव करण्याचा उपाय सुचला वा सुचविला गेला. मग ते थेट गांधीजींच्या आविर्भावात दिल्लीत थडकले आणि जंतरमंतर मार्गावर त्यांनी आंदोलन उभारले. सायंकाळचा फेरफटका करायला येणारी अनेक कुटुंबे आणि संघ परिवारातील मोकळे लोक तेथे गर्दी करीत. भाजपला अनुकूल असलेली माध्यमे त्या प्रकाराला राष्ट्रीय आंदोलनाचे स्वरूप देत. त्याचा शेवट तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांच्या पुणेकर सहकाºयांच्या हातून कसा केला याच्या सुरस कथा आता चर्चेत आहेत. प्रत्यक्षात लोकपाल विधेयक आले नाही आणि अण्णाही दिल्लीत थांबले नाहीत. त्यांच्या आंदोलनातली केजरीवालांसारखी माणसे स्वतंत्रपणे भाजपविरुद्ध निवडणुकीच्या तयारीला लागली तेव्हा अण्णांनी त्यांची साथ सोडली व त्यांच्या राजकारणावर टीका करायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी मोदींसोबत असलेल्या किरण बेदी जेव्हा भाजपच्या बाजूने गेल्या तेव्हा अण्णांनी त्यांच्यावर टीका करणे टाळले. वास्तव हे की ही सारी माणसे अण्णांच्या समोर त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळत व त्यांच्या मागे त्यांच्या ‘अडाणी’पणावर टीका करीत. त्या गोतावळ्यात राहिलेल्या व पुढे त्यापासून दूर झालेल्या अनेकांनी याच्या तपशीलवार नोंदी नंतर केल्या आहेत. अण्णांचे भाजपप्रेम प्रथम उघडकीला आले ते मुंडे यांच्याविरुद्ध त्यांनी केलेल्या ‘बरखा’ प्रकरणातील उठावात. बरेच दिवस ते आंदोलन चालले व पुढे मुंडे आणि अण्णा यांच्यात ‘समझोता’ही झाला. नंतरचा घोटाळा सिंचन विभागाचा. त्याचाही गाजावाजा मोठा झाला. पुढे त्यात अडकलेल्या मंत्र्यांनी अण्णांची प्रत्यक्ष ‘भेट’ घेतली व सारे मिटले. पुढे ते मंत्री राज्याचे अर्थमंत्रीच बनले. हे समझोते कसे झाले आणि त्यात काय होते याची चर्चा त्या गदारोळात सामील झालेल्या माध्यमांनीही कधी केली नाही. एकेकाळी काँग्रेसवर संकट आले की विनोबा त्या पक्षाची काळजी घेत व त्यातून मार्ग काढत आणि सत्तेतली माणसे मग त्यांच्या मनमानीसाठी मोकळीही होत. अण्णा विनोबांएवढे मोठे नाहीत आणि त्यांची दृष्टीही विनोबांएवढी मोठी नाही. आताचा लोकक्षोभ भाजप सरकारविरुद्धचा आहे. नोटाबंदी, काळ्या पैशांचे खोटे आश्वासन, बेरोजगारीत वाढ, महागाईचा उच्चांक यासोबतच वाढीला लागलेली धार्मिक तेढ या गोष्टी भाजपविरुद्ध जाणाºया आहेत. राष्ट्रीय उत्पन्नातील घट, अल्पसंख्यकांतील धास्ती व दलितांचा संताप याही गोष्टी वाढल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र प्रथम मराठा महामोर्चांनी व पुढे दलितांच्या उठावांनी गाजविला. ओबीसींचे वर्गही सरकारविरुद्ध उभे राहिले. या साºयातील सरकारची अगतिकता व दुबळेपण महाराष्ट्राने अनुभवले. आश्वासने देता येत नाहीत आणि दिली तर ती पाळता येत नाहीत अशा शृंगापत्तीत सरकार सापडले. या स्थितीत २०१९ च्या निवडणुकांना देश सामोरा जाईल तेव्हा त्याची जमेल तेवढी दिशाभूल करायला एखादा खुळखुळा त्याच्यासमोर हलविणे गरजेचे आहे. अण्णांजवळ तो खुळखुळा लोकपाल विधेयकाच्या रूपाने शिल्लक आहे. त्याचमुळे आपण लोकपालाची मागणी करण्यासाठी आता दिल्लीकडे कूच करीत आहोत अशी गर्जना त्यांनी केली आहे. ती होताच मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील सात मंत्र्यांनी राळेगणसिद्धी गाठली व त्यांच्याशी ‘चर्चा’ केली. तीत काय निष्पन्न झाले हे अण्णा सांगत नाहीत आणि सरकारही ते सांगायला धजावत नाही. त्यातून टू-जी घोटाळा झालाच नव्हता असे न्यायालयाने जाहीर केल्याने अण्णांची बोलतीच बंद झाली. मात्र ते हिकमती गृहस्थ आहे. त्यांनी वाट पाहून पुन्हा दिल्ली गाठण्याचे ठरविले आहे. तेथे पुन्हा एकवार लोकपालाचा खुळखुळा वाजवून ते लोक जमा करतील, माध्यमांची त्यांना साथ मिळेल आणि मोदी त्यांच्या पाठीशी राहतील. ते विधेयक येईल वा येणारही नाही. तशीही त्याची वाट कुणी पाहणार नाही. राजकारणाला गदारोळच पुरेसा असतो. निवडणुकीच्या तोंडावर सत्तेची बाजू घेऊन गांधीसारखा वाटणारा एक अण्णा दिल्लीत आंदोलन करतो ही करमणूक पुरेशी असते. त्यातून अण्णा संघापासून दूर असल्याचा लोकातील ‘विश्वास’ कायम राहतो आणि सत्तेच्या राजकारणाला हवे असलेले सारेच त्यातून साध्यही होते.
-सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)

Web Title:  Anna's peeve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.