'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात...

By Meghana.dhoke | Published: November 13, 2023 10:16 AM2023-11-13T10:16:24+5:302023-11-13T14:58:14+5:30

सामना संपल्यावर भारतीय क्रिकेट संघासमोर सध्या एकच महत्त्वाची गोष्ट उरते, ती म्हणजे फिल्डिंग मेडल कोणाला मिळणार? का, कसं घडलं हे?..

After the match of the Indian cricket team, everyone's attention is on who will get the best fielding medal | 'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात...

'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात...

- मेघना ढोके

समाजमाध्यमात गेले काही दिवस एक मिम व्हायरल आहे. अतिशय बोलके आणि नेमके. त्यातला तपशील असा की, सध्या भारतीय क्रिकेट संघ समोरच्या संघाला इतका झटपट मात देतो की सामना संपल्यावर फक्त एकच थ्रिलिंग गोष्ट उरते, फिल्डिंग मेडल कुणाला मिळणार? आजवर कधी ऐकलं होतं भारतीय संघात सामना जिंकल्यावर क्षेत्ररक्षणाचं कौतुक होतं? पदक मिळतं? ते पदक आपल्याला मिळावं म्हणून खेळाडू मैदानावर जीवाचं रान करतात आणि सामना संपल्यावर टोकाच्या उत्सुकतेनं वाट पाहतात की, ‘फिल्डिंग मेडल’ विनर कोण? इतकंच कशाला, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यरसारखे उत्कृष्ट फिल्डरही उत्तम कॅच घेतल्यावर ड्रेसिंग रूमकडे पाहून खुणा करतात की, मेडलचा मी दावेदार आहे! सामन्यानंतर बाकायदा मेडल सेरेमनी होते. पदक प्रदान करण्याचा सोहळा आणि जल्लोष पाहण्यासारखा असतो. बीसीसीसीआयने समाजमाध्यमात ते व्हिडीओ शेअर केल्यावर हजारो लोक जीवाचे डोळे करून तो सोहळा पाहतात! हे सारं काय आहे? मुळात हे सगळं आलं कुठून? कुणी आणलं? क्षेत्ररक्षणाइतकंच आणि त्यापलीकडेही ते का मोलाचं आहे? 

महेंद्रसिंग धोनी कप्तान असताना नेहमी म्हणत असे की, एखादा दिवस असा उजाडतो की, उत्तम बॅटरही लवकर आऊट होतो, उत्तम बॉलरही पिटला जातो. पण, उत्तम फिल्डर प्रत्येक सामन्यात धावा वाचवतो, कॅच घेतो, सामना फिरवू शकतो. मात्र आजवर भारतीय क्रिकेटला (अगदी आयपीएलमध्येही) उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ही आपली ताकद बनवता आलेली नव्हती. व्यक्तीपूजा हा ज्या समाजाचा स्वभाव त्या समाजात क्रिकेटमधली ‘हिरो वरशिपिंग’ अटळ आहेच. भारतीय क्रिकेटमध्ये आजवर स्टार ठरते ते फक्त बॅटर्स. भारतीय क्रिकेटचा सारा इतिहासच महान फलंदाजांच्या कामगिरीने सांगितला जातो. गोलंदाजी ही भारतीय संघाची ताकद कधीच नव्हती, अपवाद या विश्वचषक सामन्यांचा; जिथे भारतीय गोलंदाजीचा ताफा एकाचवेळी घातक ठरलेला आहे आणि त्याचवेळी बदललेल्या फिल्डिंगची गोष्ट. सुसाट रिफ्लेक्शन अतिशय टोकदार आणि सतर्क असलेली फिल्डिंग हे या संघाचं डोळ्यांचं पारण फेडणारं एक खास वैशिष्ट्य आहे. आणि त्यानिमित्तानं चर्चेत आहेत भारतीय संघाचे फिल्डिंग कोच टी दिलीप. ते पदकासाठी कुणाची निवड करतात, ते पदक कसं प्रदान करतात, त्यावेळी भाषण काय करतात या साऱ्याची उत्कंठा इतकी की खेळाडूही आनंदानं जल्लोष करतात. खरंतर फक्त क्रिकेटच नाही, तर भारतीय क्रीडा विश्वातच कुणीही प्रशिक्षक असला तरी आजवर एक प्रश्न थेट किंवा आडून आडून विचारला जातोच? ‘कितना खेला है?’ 

म्हणजेच जो माणूस आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलाच नाही तो काय इतरांना ग्यान देणार, त्याचा काय आदर करायचा अशी एक कोती वृत्ती सर्वत्र आहे. म्हणूनच यंदाच्या विश्वचषकातला हा बदल नोंदवून ठेवायला हवा. दिलीप सरांचा आदर करणारे, त्यांना ‘सर’ म्हणणारे संघातले अनेक खेळाडू स्वत: विश्वविक्रमी बहाद्दर आहेत. दिलीप स्वत: फर्स्ट क्लास क्रिकेटही खेळलेले नाहीत. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हा पायंडा पाडला की संघात आदर प्रत्येक माणसाचा आणि त्याच्या योगदानाचा झालाच पाहिजे. त्यातून ही टीम बांधली गेली. दिलीप स्वत: क्रिकेटवेडे होतेच. पण त्यांच्या कुटुंबाचा काही त्यांना म्हणावा तसा पाठिंबा नव्हता, योग्यवेळी संधीही मिळाली नाही. पुरेसं प्रशिक्षणही नाही. मात्र क्रिकेट प्रशिक्षक म्हणून एकेक परीक्षा देत ते पुढे सरकत राहिले. नॅशनल क्रिकेट अकॅडमीत आर. श्रीधर यांचे ते असिस्टंट होते. तिथे त्यांनी तरुण खेळाडूंच्या फिल्डिंगमध्ये उत्तम सुधार घडवून आणला. त्यांच्याचकडे त्या काळात शुभमन गील, तिलक वर्मासारखे खेळाडू तयार झाले. द्रविड यांनी त्यांना इंडिया ए संघासाठीही संधी दिली. पुढे श्रीधर निवृत्त झाल्यावर दिलीप भारतीय संघाचे फिल्डिंग कोच झाले.

आता चित्र पालटलेले दिसते आहे. एका मेडल सेरेमनीत दिलीप म्हणालेही, प्रत्येक खेळाडूची ताकद ही संघाची ताकद असते आणि संघाची ताकद ही प्रत्येक खेळाडूची ताकद ठरते. खरंतर दिलीप हे काही फार मोठे वक्ते नाहीत की, मोटिव्हेशन स्पिकर नाहीत. ते बोलतातही मोजकं. मात्र संघातली एकी आणि फिल्डिंग ही क्रिकेटमधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हे त्यांनी अधोरेखित केले. 
हायर ॲण्ड फायर काळात जिथे केवळ व्यक्तिगत परफॉर्मन्सचे मोजमाप होते, केवळ स्वत: ची कामगिरी आणि त्यापायी मिळणारं महत्त्व यालाच मोल आहे, स्पर्धा इतकी की, सोबत्याला मागे टाकून, शक्य तर त्याला हरवूनच पुढे जायचं अशी बदलती कार्यसंस्कृती सर्वत्र दिसते, तिथं एकमेकांना सोबत करून, दुसऱ्याला यशस्वी करण्यासाठी आपण १०० टक्के योगदान देणं ही वृत्ती रुजवणं आणि तिला बळ देणं हे काम सोपं नाही. मात्र, भारतीय क्रिकेट संघात प्रत्येक सामन्यानंतर जी मेडल सेरेमनी होते ती हेच सांगते की ‘संघ’ म्हणून खेळलात तर जिंकाल, एकेकटे खेळाल तर विजयाचा चेहरा दिसण्याची शक्यता कमी होत जाते.

अवतीभोवती प्रेरणादायी आणि सकारात्मक पोकळ शाब्दिक भाषणबाजीचा ऊत आलेला असताना, न बोलता असा वर्तनबदल आणि परिणाम बदल साधणं सोपं नसतंच. भारतीय क्षेत्ररक्षणाने केलेला हा बदल म्हणून या विश्वचषक सामन्यांमधला मोठा मैलाचा दगड ठरावा. उपांत्य आणि अंतिम सामना अजून लांब असताना त्या बदलाची नोंद घ्यायला हवी. कामगिरी, मेहनत, सराव आणि फोकस या चार गोष्टींसह ‘बॅक टू बेसिक्स’ नावाच्या एका सूत्राने बदललेली ही गोष्ट आहे. या बदलाचा ‘कॅच’ सुटू नये म्हणून यंदाच्या दिवाळीत ही क्रिकेटच्या मैदानावरची वेगळी चर्चा..कोण म्हणतं संघ म्हणून खेळणं सोपं नसतं?

Web Title: After the match of the Indian cricket team, everyone's attention is on who will get the best fielding medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.