अडवाणींची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:45 AM2019-04-08T06:45:37+5:302019-04-08T06:45:57+5:30

प्रथम संघ, मग जनसंघ आणि अखेर भारतीय जनता पक्ष या साऱ्यांसाठी आयुष्य वेचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांची मोदी व शहा यांनी जी बेमुर्वतखोर उपेक्षा केली ती अडवाणींच्या संयमी मौनाएवढीच मोदी व शहा यांच्या उद्दाम प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे.

Advani's tragedy | अडवाणींची शोकांतिका

अडवाणींची शोकांतिका

Next

सारे आयुष्य पक्ष उभारत राहिलेल्या, त्याला विजयापर्यंत पोहोचविलेल्या अडवाणी या ज्येष्ठ व आदरणीय नेत्याविषयी मोदींनी जे उद्दामपण केले आणि त्यांना ज्या तºहेने वाळीत टाकले तो प्रकार केवळ संघ परिवारातीलच नव्हे तर बाहेरच्या लोकांनाही दु:खी करून गेला.


प्रथम संघ, मग जनसंघ आणि अखेर भारतीय जनता पक्ष या साऱ्यांसाठी आयुष्य वेचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांची मोदी व शहा यांनी जी बेमुर्वतखोर उपेक्षा केली ती अडवाणींच्या संयमी मौनाएवढीच मोदी व शहा यांच्या उद्दाम प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे. अडवाणींचा जन्म सिंधमधला. तो प्रदेश पाकिस्तानात जाण्याआधीच तेथे त्यांनी संघाचे काम सुरू केले. पुढे भारतात आल्यापासून त्यांनी वाजपेयींच्या जोडीने प्रथम जनसंघ व नंतर भाजप वाढविण्यासाठी अविश्रांत परिश्रम केले. १९९० च्या दशकात रथयात्रा काढून त्यांनी भाजपच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला व तो करतानाच स्वत:चे नाव मागे घेऊन पंतप्रधानपदाची माळ वाजपेयींच्या गळ्यात पडेल अशी व्यवस्था केली. पक्षात वाजपेयी आणि अडवाणी यांचा शब्द अखेरचा होता. २००४ मधील पक्षाच्या पराभवानंतरही ते पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते राहिले.

मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये मुस्लीमविरोधी हत्याकांड झाले तेव्हा त्यांना काढून टाकण्याचा आग्रह वाजपेयींनी धरला तेव्हा अडवाणींनीच त्यांना वाचविले. मात्र पक्षाने अडवाणींच्या या सेवेची बूज राखली नाही. त्यांना २०१९ च्या निवडणुकीत तिकीट दिले नाही. मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांच्यासह पक्षातील सतरा ज्येष्ठ नेत्यांना त्याने तिकिटावाचून घरी बसविले. अडवाणींचे मोठेपण असे की त्यांनी आपली उपेक्षा मुकाट्याने सहन केली. पक्षाविषयी व नेतृत्वाविषयी नाराजीच बोलून दाखवितानाही पक्षाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली. आपला पक्ष आणि त्याच्या विचारांवर त्यांची किती निष्ठा होती ते यावरून दिसते. गेल्या पाच वर्षांत अडवाणी राजकीय व शासकीय कार्यक्रमांत फक्त उपस्थित होते. तेही मोदींसमोर हात जोडतानाच देशाला अनेकदा दिसले. सारे आयुष्य पक्ष उभारत राहिलेल्या, त्याला विजयापर्यंत पोहोचविलेल्या आणि देशाचे उपपंतप्रधानपद अनुभवलेल्या या ज्येष्ठ व आदरणीय नेत्याविषयी मोदींनी जे उद्दामपण केले आणि त्यांना ज्या तºहेने वाळीत टाकले तो प्रकार केवळ संघ परिवारातीलच नव्हे तर बाहेरच्या लोकांनाही दु:खी करून गेला. ‘तुम्हाला तिकीट देणार नाही’ हे त्यांना अखेरपर्यंत न सांगता तसेच ताटकळत ठेवण्याचा हा प्रकार त्यांनी अडवाणींएवढाच जोशी व महाजनांबाबतही केला. ज्या पक्षात स्मृती इराणीचे तिकीट प्रथम पक्के केले जाते, त्या पक्षात अडवाणींना अखेरपर्यंत ताटकळत ठेवले जाते हा प्रकार पक्षाच्या बदललेल्या संस्कृतीवर व त्याच्या बिघडलेल्या वृत्तीवरही प्रकाश टाकणारा आहे. वयाची नव्वदी उलटलेल्या नेत्याला साधा निरोप नाही, त्याचा सन्मान केल्याचे कुठे चित्र नाही आणि आपली नाराजी एकट्याने गिळत राहण्याखेरीज त्यांच्या वाट्याला काही येणार नाही अशी अवस्था करणारा पक्ष व त्याचे नेतृत्व कृतघ्नच म्हटले पाहिजे.

लोकसभेतील पक्षाची सदस्यसंख्या दोनवरून वाढवून नेत बहुमतापर्यंत नेणाऱ्या नेत्याच्या वाट्याला असे एकाकीपण येणे हीच एक गंभीर शोकांतिका आहे. तक्रार करण्याचे वय नाही, आक्रोश करण्याची क्षमता नाही आणि अन्यायाचा प्रतिकार करायचा तरी तो पुन्हा आपणच हाती धरून वाढविलेल्या लोकांचा. ही स्थिती मुकाट्याने सारे प्रहार सहन करण्याची व आतल्या आत जळत राहण्याची आहे. पक्ष व देश यांची एवढी सेवा करणाºया नेत्याच्या वाट्याला असा शेवट येणे ही आपल्या राजकारणात शिरलेल्या क्रूर व निर्ढावलेल्या वृत्तीवर प्रकाश टाकणारी बाब आहे. पूर्वीच्या नेत्यांचा संयमी मोठेपणा, त्यांच्या वागणुकीतले सुसंस्कृतपण आणि उपेक्षा सहन करण्याची व तरीही शांत राहण्याची त्यांची प्रौढ प्रवृत्ती या साऱ्यांवर प्रकाशझोत टाकणारी ही बाब आहे. अडवाणी हा आता एका मोठ्या राष्ट्रीय शोकांतिकेचा विषय व्हावा, एखाद्या प्रतिभावंताने त्यांच्या उदयावर, उभारीवर आणि आताच्या शोकांत अवस्थेवर काव्य लिहावे. अशी माणसे कोणत्याही विचाराची असली तरी ती विस्मरणात जाऊ नयेत. कृतज्ञ राष्ट्राने त्यांचे नेहमी स्मरण करावे हीच आपल्या परंपरेची व राष्ट्रीयतेची खरी शिकवण आहे.

Web Title: Advani's tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.