धुळ्यात ट्रकमधील पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:07 IST2018-06-18T12:07:07+5:302018-06-18T12:07:07+5:30
सुरत बायपास : शहर पोलिसात नोंद

धुळ्यात ट्रकमधील पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कपड्यांचे पार्सल घेऊन सुरत येथून निघालेला ट्रक जळगाव येथे जात असताना धुळ्यानजिक सुरत बायपास रोडवर ट्रकची ताडपत्री फाडून चोरट्याने १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी रविवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला़
सबगव्हाण ता़ पारोळा येथे राहणारा राहुल दिनकर गोपाळ (२३) या ट्रकचालकाने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ एमएच १८ एए ८९३७ क्रमांकाचा ट्रक सुरत येथून ९४ कपड्यांचे पार्सल घेऊन निघाला़ धुळ्यानजिक सुरत बायपास रोडवरील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वळणावर शनिवारी पहाटे २ ते अडीच वाजेच्या दरम्यान चोरट्याने ताडपत्री फाडून १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे कपड्यांचे ७ पार्सल चोरुन नेले़ ट्रकचालकाच्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़