धुळ्यातील बाजरी संशोधन केंद्राने केले तीन वाण विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 09:54 AM2018-01-16T09:54:31+5:302018-01-16T09:55:09+5:30

डॉ. एच.टी.पाटील यांनी विकसित केलेल्या ‘धनशक्ती, महाशक्ती व आदिशक्ती’ वाणात लोह व जस्ताचे प्रमाण जास्त

Research development by Bharatiya Rice Research Center in Dhule | धुळ्यातील बाजरी संशोधन केंद्राने केले तीन वाण विकसित

धुळ्यातील बाजरी संशोधन केंद्राने केले तीन वाण विकसित

googlenewsNext

अतुल जोशी /धुळे : आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद (इक्रिसॅट) व कृषी महाविद्यालय धुळे येथील बाजरी संशोधन योजना यांनी संयुक्तपणे ‘धनशक्ती, महाशक्ती’ तर बाजरी संशोधन योजनेने ‘आदिशक्ती’ हे बाजरीचे वाण विकसित केले आहे. या बाजरीच्या वाणात लोह आणि जस्ताचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे आदिवासी भागातील कुपोषण थांबविण्याकरिता उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती बाजरी संशोधन योजनेतील रोप पैदास शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. तथा संशोधक डॉ. एच.टी. पाटील यांनी दिली.

मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या जीवनसत्वासोबतच खनिज पदार्थांचीही आवश्यकता असते. खनिज पदार्थांमध्ये लोह व जस्ताचे प्रमाण हे सुध्दा महत्त्वाचे आहेत. भारतात ८० टक्के गर्भवती स्त्रिया, ५२ टक्के इतर स्त्रिया व ७४ टक्के ६ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये लोहाची तर ५२ टक्के लहान मुलांमध्ये जस्ताची कमतरता आढळून आलेली आहे.

बाजरी हे आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. बाजरीत लोह व जस्त अधिक प्रमाणात असते. हाच उद्देश लक्षात घेऊन, आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद (इक्रिसॅट) व महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, धुळे येथील बाजरी संशोधन योजना यांनी संयुक्त विद्यमाने ‘धनशक्ती आणि महाशक्ती’ हे दोन तर बाजरी संशोधन योजना धुळे यांनी ‘आदिशक्ती’ हे वाण स्वतंत्ररित्या विकसित केलेले आहे. धनशक्ती हे वाण २०१२ मध्ये महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात खरीप लागवडीकरिता प्रसारित करण्यात आले. हे वाण आयसीटीपी-८२०३ मधून उच्च लोहयुक्त अधिक उत्पादन देणा-या झाडांपासून विकसित करण्यात आले. यात ८१ पीपीएम लोह व ४२ पीपीएम जस्ताचे प्रमाण आहे. याचे एका हेक्टरात जवळपास २० ते २२ क्विंटल उत्पन्न येते. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील १ लाख हेक्टर क्षेत्रावर या वाणाची पेरणी करण्यात येते. अवघ्या ७४ ते ७८ दिवसात या वाणाचे पीक तयार होत असते.
त्याचप्रमाणे ‘महाशक्ती’ हे वाण २०१७ मध्ये महाराष्ट्रात  प्रसारित करण्यात आले. हेदेखील लोहयुक्त संकरित वाण आहे. त्याची उत्पादनक्षमता हेक्टरी २८ ते ३० क्विंटल आहे. यातही लोहाचे प्रमाण ८७ पीपीएम व जस्ताचे प्रमाण ४१ पीपीएम आहे.

राज्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, कमीत कमी पावसात व हलक्या जमिनीवर जास्त उत्पादन देणारे वाण विकसित करण्याच्या दृष्टीने बाजरी संशोधन योजनेने ‘आदिशक्ती’ हे संकरित वाण विकसित केले आहे. याची उत्पादन क्षमता हेक्टरी ३२ ते ३४ क्विंटल असल्याचे सांगण्यात आले. विकसित करण्यात आलेले तीनही वाण हे ‘गोसावी’ रोगास प्रतिबंध करीत असतात.
या संशोधनासाठी डॉ. विकास पवार, प्रा. रवींद्र गवळी, प्रेमसिंग गिरासे, चतूर ठाकरे, जितेंद्र सूर्यवंशी, रवींद्र सूर्यवंशी, शंकर मराठे यांचे सहकार्य लाभले आहे.


कुपोषण थांबविण्यास मदत
बाजरीत लोह व जस्ताचे प्रमाण जास्त असते. जे मानवाच्या शारीरिक वाढीसाठी उपयुक्त आहे. अन्नातूनच लोह मिळाल्यास गोळ्यांची आवश्यकता राहणार नाही. बाजरीत लोह जास्त असल्याने, रक्तातील हिमोग्लोबीन वाढविण्यास मदत होते. तसेच हे धान्य आदिवासी तसेच गरीब लोकांचे प्रमुख अन्नधान्य असल्याने, आदिवासी भागातील कुपोषण थांबविण्याकरिता व गर्भवती महिलांकरिता अतिशय उपयुक्त असे धान्य ठरू शकते.

संशोधन केंद्राचा सन्मान
४धुळे येथील कृषी महाविद्यालयातील बाजरी संशोधन योजनेला त्यांच्या उत्कृष्ट संशोधनाबद्दल ‘आउट स्टॅँडिंग पार्टनरशिप अवॉर्ड आशिया’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हैद्राबाद येथे ११ डिसेंबर २०१७ रोजी हा कार्यक्रम झाला.


गेल्या २ वर्षांपासून ‘आदिशक्ती’ या वाणाने कमी पर्जन्य असलेल्या भागातही चांगले उत्पादन दिले. त्यामुळे ते शेतकºयांच्या पसंतीस उतरले आहे. ‘धनशक्ती’ हे वाण कुषोषणमुक्त करण्यासाठी किंवा रक्तक्षय कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याची लागवड जवळपास १ लाख हेक्टरवर होत आहे. - डॉ.एच.टी. पाटील, बाजरी पैदासकार,बाजरी संशोधन योजना, कृषी महाविद्यालय,धुळे.

 

Web Title: Research development by Bharatiya Rice Research Center in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती