अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीचा राजीनामा - अनिल गोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:22 PM2023-08-09T16:22:27+5:302023-08-09T16:24:12+5:30

"राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर आपण काम करत होतो. संघटना वाढीसाठी खूप प्रयत्न केले."

NCP resigns due to internal factionalism - Anil Gote | अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीचा राजीनामा - अनिल गोटे

अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीचा राजीनामा - अनिल गोटे

googlenewsNext

राजेंद्र शर्मा

धुळे : सामान्यांचे प्रश्न सुटतील या आशेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण प्रवेश केला. पण, सामान्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी अंतर्गत गटबाजीच जास्त दिसून आली. त्यामुळे सामान्यांची कामे हाेत नव्हती. परिणामी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे. अशी माहिती माजी आमदार तथा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, लोकसंग्राम पक्ष आपला कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोटे यांनी सांगितले की, भाजपमधील गटबाजीला कंटाळून आपण मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा व पक्षाचा राजीनामा देऊन आपण बाहेर पडलो होतो. सामान्यांचे प्रश्न सोडविले जातील, या आशेने आपण शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारून आपण कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीला चांगले दिवस यावेत, यासाठी शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिवार बैठका घेतल्या. जिथे कार्यकारिणी नव्हती ती तयार केली. पण, कालांतराने सामान्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी अंतर्गत गटबाजी दिसून आली. तक्रारी वाढत गेल्याने माझा भ्रमनिरास झाला. कालांतराने राष्ट्रवादीला माझी गरज नसल्याचे जाणवले. त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचे ठरविले आणि तातडीने अंमलबजावणी केली. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपुर्द केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

"राष्ट्रवादी सोडला, शरद पवार नाही"

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर आपण काम करत होतो. संघटना वाढीसाठी खूप प्रयत्न केले. आता आपण पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. पण शरद पवार आणि त्यांचे विचार आजही कायम आहेत. शरद पवार यांची साथ सोडलेली नाही. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यापुढे लोकसंग्रामच

राष्ट्रवादी सोडल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू असतानाच आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. आता यापुढे केवळ लोकसंग्राम पक्ष कायम राहणार आहे. त्या माध्यमातून आपण आपले विकासाचे, सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: NCP resigns due to internal factionalism - Anil Gote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.