साक्रीसाठी सोडले मालनगाव धरणाचे आरक्षित पाणी !

By admin | Published: March 18, 2017 12:15 AM2017-03-18T00:15:35+5:302017-03-18T00:15:35+5:30

संतप्त प्रतिक्रिया : नदीकाठावरील शेतकºयांसह पाणी योजनांचे वीज कनेक्शन तोडले

Malanganga dam water reserved for Sakri! | साक्रीसाठी सोडले मालनगाव धरणाचे आरक्षित पाणी !

साक्रीसाठी सोडले मालनगाव धरणाचे आरक्षित पाणी !

Next


दहीवेल : साक्री शहरासाठी मालनगाव धरणाचे आरक्षित पिण्याचे पाणी पाटबंधारे विभागाने १२ रोजी कान नदीतून सोडले. पाणी साक्रीला पोहचावे म्हणून नदीकाठावरील खरडबारी, मालनगाव, बोडकीखडी, सातारपाडा, दहीवेल, भोनगाव, बोदगाव, किरवाडे, घोडदे, सुरपान अशा दहा गावांतील नदीकाठावरील शेतकºयांच्या शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. उर्वरित  छडवेल प., आष्टाणे, कावठे येथील नदीकाठावरील वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे. दरम्यान, सातारपाडा येथील नदीकाठावरील नळ पाणीपुरवठा योजनेचेही वीज कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
वीज कनेक्शन अचानक तोडण्यात आल्यामुळे शेतकºयांच्या रब्बी हंगामातील गहू, कांदे, भाजीपाल्याचे एका पाण्यामुळे उत्पन्नात घट होऊन आर्थिक नुकसान होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून पाटबंधारे विभाग, विद्युत वितरण कंपनीच्या या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आरक्षित पाणी जिल्हाधिकाºयांच्या लेखी आदेशाशिवाय सोडता येत नाही. मात्र, सदर आरक्षित पाणी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाने सोडण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी स्थानिक शेतकरी, परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन समन्वयातून आरक्षित पाण्याचे नियोजन करून सोडावे, अशी मागणी होत आहे. अजून पंधरा दिवसानंतर पाणी सोडले असते तर रब्बी पिकांचे नुकसान झाले नसते, अशी प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केली.
मालनगाव धरणाचे पाणी खरीप व रब्बी पिकांना दिले जाते. या धरणाच्या पाण्यावर मालनगाव, खरडबारी, बर्डीपाडा, बोडकीखडी, दहीवेल, भोनगाव, कालदर, किरवाडे, घोडदे, सुरपान, छडवेल, आष्टाणे, कावठे आदी गावांतील शेतकºयांची शेती अवलंबून आहे. पंधरा दिवस ही कारवाई थांबवली असती अथवा शेतकºयांना पूर्वसूचना दिली असती तर शेतकºयांना रब्बी पिकाचा पाणी भरणा करता आला असता, शेतकºयांनी पर्यायी व्यवस्था केली असती. मात्र, पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकºयांना भेटत नाहीत, व्यवस्थित माहिती देत नाही. उलट वीज कनेक्शन जोडले, पाणी चोरले तर खबरदार, शेतकºयावर गुन्हे दाखल करू, असा दम पाटबंधारे विभाग शेतकºयांना देत  आहे.
आरक्षित पाणी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाशिवाय सोडले जात नाही.  तसेच तालुकास्तरीय प्रशासनाकडून अहवाल मागवून सर्व कायदेशीर अहवाल देऊन पूर्तता होऊन आरक्षित पाण्याची रक्कम संबंधितांकडून वसूल करून मगच पाणी सोडले जाते. तथापि, मिळालेल्या माहितीनुसार, पाटबंधारे विभागानेच हे पाणी सोडले. वास्तविक स्थानिक गावातील शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून समन्वयाच्या भूमिकेतून आरक्षित पाणी सोडले पाहिजे, स्थानिक गावांचे पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडू नये, स्थानिक लोकांवर अन्याय होऊ नये, म्हणून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी काळजी घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मालनगाव, बोडकीखडी, दहीवेल येथील शेतकºयांच्या रब्बीतील गव्हाचे पाण्याच्या एका आवर्तनाअभावी नुकसान होणार आहे. पाटबंधारे विभागाकडे शेतकरी एक आवर्तनाची पाणीपट्टी भरण्याला तयार आहेत; परंतु पाटबंधारे विभागाच्या दहीवेलच्या स्थानिक कर्मचाºयांनी नकार दिला आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी गांभीर्याने याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

खरे-खोटे कुणाचे?
कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, आरक्षित पाण्याची ५० टक्के रक्कम भरून घेण्यात आली. परंतु कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले की, आरक्षित पाण्याचे पैसे अद्याप भरलेले नाहीत. यामुळे खरे-खोटे कुणाचे? असा सवाल उपस्थित होत आहे. 
सातारपाडा गावाचा नळ पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. सातारपाडा गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशा सूचना केल्याचे आमदार डी.एस. अहिरे यांनी मुंबई येथून दूरध्वनीवर सांगितले.
दहीवेल येथील कान नदीकाठावरील फडबागायत क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. कान नदीवरील बंधाºयाचे पाणी बंद केल्याने फडबागायतचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. एका आवर्तनाअभावी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.


साक्री शहरासाठी जिल्हाधिकाºयांनी पाणी आरक्षित केले आहे. ५० टक्के रक्कम भरूनच त्यांच्या मागणीनुसार, मालनगाव धरणाचे पाणी साक्री शहराला सोडले आहे. तथापि, नदीकाठच्या गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडायला नको, सातारपाडा आदी गावाचे तात्पुरते कनेक्शन तोडले असल्यास संबंधितांकडून माहिती घेऊन पाणी सोडले असता नळ पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडू नये, अशा सूचना देतो.
- के.टी. सूर्यवंशी,
कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

Web Title: Malanganga dam water reserved for Sakri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.