आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 06:44 PM2018-07-23T18:44:17+5:302018-07-23T18:44:44+5:30

आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजापुरातील तुळजाभवानी मातेला श्री विठ्ठलाचे रुप देण्यात आले होते़ या विशेष रुपात देवीची पूजा मांडण्यात आली.

Tulajabhavani mother of goddess transforms into Vithhal on occasion of Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप

आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप

googlenewsNext

तुळजापूर (उस्मानाबाद): आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजापुरातील तुळजाभवानी मातेला श्री विठ्ठलाचे रुप देण्यात आले होते़ या विशेष रुपात देवीची पूजा मांडण्यात आली. तुळजाभवानी देवीचे हे नयनमनोहर सावळे रुप डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची सोमवारी मंदिरात अलोट गर्दी झाली़

आज पहाटे देवीची चरणतीर्थ पूजा संपन्न झाली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी पूजेचा घाट झाल्यानंतर देवीच्या अभिषेक पूजा पार पडल्या. अभिषेक पूजेनंतर देवीची धुपारती करण्यात आली व अंगारा काढण्यात आला. या विधीनंतर आषाढी एकादशीची पर्वणी साधत तुळजाभवानीची श्री विठ्ठलाच्या रुपात विशेष पूजा मांडण्यात आली. भोपे पुजारी अतुल मलबा, सार्थक मलबा, प्रकाश मलबा यांनी ही विशेष पूजा मांडली. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, रुपेश कदम, दिलीप पाटील यांची उपस्थिती होती.

या विशेष पूजेत देवीच्या भाळावर चंदनाचा मळवट भरून त्यावर विठ्ठलाचा वैष्णव गंध रेखण्यात आला होता. मस्तकावर विठ्ठलाप्रमाणे सुवर्ण मुकुट घालण्यात आला होता. नाकात रत्नजडित नथ नेसवून प्राचिन पारंपारिक दागदागिन्यांनी देवीला मढवण्यात आले होते. तसेच एकादशीनिमित्त तुळशीच्या पानांचा व मंजुळाचा हार घातला होता. सोनेरी रंगाचा जरीकाठाचा शालू देवीला नेसविण्यात आला़ चुनीदार शालू नेसवून देवीला श्री विठ्ठलाच्या रुपात दर्शवण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या रुपातील देवीचे अलौकिक रुप खुलून दिसत होते. आषाढी एकादशीनिमित्त मांडलेल्या नयनमनोहर विशेष पूजेचे हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणारे भाविक आवर्जून देवी दर्शनासाठी थांबतात़ त्यामुळे मागील दोन दिवसांपासून शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

Web Title: Tulajabhavani mother of goddess transforms into Vithhal on occasion of Ashadhi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.