सराफाच्या हत्येचा, लुटीचा ३६ तासांत उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:55 AM2021-08-24T08:55:19+5:302021-08-24T08:55:56+5:30

२० पोलीस अधिकारी, ७० अंमलदारांचे प्रयत्न; ५०० हून जास्त सीसीटीव्ही तपासले

police arrest criminal of murder and robbery of the jeweler in 36 hours | सराफाच्या हत्येचा, लुटीचा ३६ तासांत उलगडा

सराफाच्या हत्येचा, लुटीचा ३६ तासांत उलगडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : साक्षी ज्वेलर्स मालकाची शनिवारी दिवसाढवळ्या हत्या व लूट केल्याप्रकरणी २० अधिकारी, ७० पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी ३६ तासांमध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी नालासोपारा ते चर्चगेट रेल्वे स्थानकांवरील ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले. आरोपींनी ही हत्या लुटीसाठी केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. 
एसटी डेपो रोडवरील किशोर जैन (४८) यांची शनिवारी सकाळी दोन आरोपींनी दुकानात घुसून हत्या केली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा मास्टरमाइंड जॉन्सन बाप्टिस्ट (४२) आणि अफजल खान (३३) या दोघांना नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमधून अटक केली आहे. दोन्ही आरोपी इलेक्ट्रिशियन असून जॉन्सन याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. सराफ दुकानात एकटा असल्याचे जॉन्सनने बघितल्यावर चोरीचा प्लॅन आखला होता. एकावेळी प्रयत्न केला, पण त्या दिवशी दुकानात गर्दी होती. शनिवारी कोणी नसताना चोरी करण्यासाठी दोघांनी प्रवेश केला. हत्या झाल्यानंतर दोघेही आरोपी नालासोपारा रेल्वे स्थानकांकडे चालत गेले. नंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वेगवेगळ्या डब्यात बसून मुंबई सेंट्रलला उतरले व नंतर परत ट्रेनने नालासोपारा येथील घरी आले. सोमवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडले आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन ते सव्वा दोन किलो चांदी पकडल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे पैसे नसल्याच्या कारणावरून आरोपी जॉन्सन मागील एक ते दीड महिन्यापासून या साक्षी ज्वेलर्स दुकानाची रेकी करत होता. दुकान मालकाने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुकान उघडून पूजा केल्यावर दोन्ही आरोपींनी दुकानात घुसून हत्या केली आहे. १६ पथकांनी अतिजलद तपास करून दोन्ही आरोपींना प्रगतीनगरमधून सोमवारी दुपारी अटक केली. 
- डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे विभाग, पोलीस आयुक्तालय

Web Title: police arrest criminal of murder and robbery of the jeweler in 36 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.