डेटिंगच्या नादात वयस्काने गमावले सव्वादोन लाख; पवईतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 03:10 AM2019-06-01T03:10:17+5:302019-06-01T03:10:29+5:30

तक्रारदार एका नामांकित कंपनीत नोकरीला आहेत. ते साकिविहार रोड परिसरात एकटेच राहतात. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले.

Late Savannahan; Powai type | डेटिंगच्या नादात वयस्काने गमावले सव्वादोन लाख; पवईतील प्रकार

डेटिंगच्या नादात वयस्काने गमावले सव्वादोन लाख; पवईतील प्रकार

Next

मुंबई : कौटुंबिक जीवन विस्कळीत झाल्याने, वयाच्या ५४ व्या वर्षी डेटिंगसाठी पवईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इंटरनेटवरून तरुणीचा शोध सुरू केला. तिच्या भेटीसाठी सव्वादोन लाख मोजले, तरीही भेट झाली नाही. अखेर यात फसवणूक झाल्याने ती तरुणी कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार एका नामांकित कंपनीत नोकरीला आहेत. ते साकिविहार रोड परिसरात एकटेच राहतात. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. मात्र दुसरीसोबतही न पटल्याने ते प्रकरणदेखील न्यायालयात प्रलंबित आहे. कौटुंबिक जीवन विस्कळीत झाल्याने, कुणासोबत तरी डेटिंगसाठी जावे म्हणून त्यांनी ८ एप्रिल रोजी इंटरनेटवरून डेटिंग करणाºया वेबसाइटवरून तरुणीचा शोध सुरू केला.

एका वेबसाइटवरून ९ तारखेला जेनी नावाच्या तरुणीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या अपेक्षेनुसार, तीन ते चार महिलांचे फोटो पाठविले. त्यापैकी एका महिलेची निवड करताच, स्पीड डेटिंग कार्ड काढण्यासाठी ८३० रुपयांची नोंदणी करण्यास सांगितले. नोंदणी करताच, संबंधित तरुणीसोबत बोलण्यासाठी १८,७०० रुपये भरण्यास सांगितले. ते पैसे भरल्यानंतर, देबजानी चक्रवर्ती नावाच्या महिलेचा त्यांना मोबाइल क्रमांक देण्यात आला. दोघांचा फोनवरून संवाद सुरू केला.

त्यांनी भेटीसाठी आग्रह धरताच, देबजानी हिने एकांतासाठी ५० हजार रुपये खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी ते पैसेदेखील जमा केले. दुसऱ्या दिवशी भेट ठरली असताना, तिने सिक्युरीटी डिपॉझिट म्हणून आणखीन ६४ हजार रुपये भरण्यास सांगितले. पुढे अशीच वेगवेगळी कारणे देत, एकूण २ लाख ३१ हजार रुपये त्यांच्याकडून उकळले. मात्र तरुणीची भेट झाली नाही. त्यांनी पैसे परत करण्यास सांगताच तरुणीने बंगळुरूमधील व्यवस्थापकांशी बोलण्याचा सल्ला दिला. तेथे आणखी पैशांची मागणी केली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. पवई पोलिसांनी बुधवारी अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मोबाइल क्रमांक आणि लोकेशनवरून ते तपास करीत आहेत.

Web Title: Late Savannahan; Powai type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.