गुन्हेगारांनी राज्यातील मुख्याध्यापकांना केलं लक्ष्य; इमेल हॅक, पैसे कमावण्याचा धंदा उघडकीस

By वासुदेव.पागी | Published: February 1, 2024 03:42 PM2024-02-01T15:42:52+5:302024-02-01T15:43:55+5:30

सायबर पोलिसांकडून गुन्हा नोंद

Criminals target principals in state; Email Hack, Open Money Making Business | गुन्हेगारांनी राज्यातील मुख्याध्यापकांना केलं लक्ष्य; इमेल हॅक, पैसे कमावण्याचा धंदा उघडकीस

गुन्हेगारांनी राज्यातील मुख्याध्यापकांना केलं लक्ष्य; इमेल हॅक, पैसे कमावण्याचा धंदा उघडकीस

वासुदेव पागी, पणजीः भोळ्या भाबड्या माणसांना कधी बक्षीसाचे आमिष दाखवून तर कधी केव्हायसीचे कारण सांगून ऑनलाइन गंडा घालणाऱ्या  सायबर गुन्हेगारांनी आता विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना लक्ष्य बनविले आहे. गोव्यातील बऱ्याच मुख्याध्यापकांची इमेल खाती हँक करून त्यांच्या संपर्कातील सर्वांना पैसे मागणारे इमेल पाठविण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणात सायबर पोलिस स्थानकात  गुन्हे नोंद झाले आहेत.

अमुक अमुक शाळकरी मुलगी कर्करोगाने आजारी आहे आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी पैशांची गरज आहे. अमूक अमूक खात्यात पैसे जमा करावेत अशी भावनिक हाक देणारे  इमेल कुणाला आले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणेच भल्याचे  ठरेल. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. चौकशी अंती लक्षात आले की असे इमेल बहुतेक मुख्याध्यापकांचे इमेल हँक करून पाठविण्यात आले आहेत. त्या पैकी ताळगाव येथील सेंट मायकल स्कूलचे मुख्याध्यापक कामील फर्नांडीस आणि कुजिरा येथील डॉ केशव बळीराम हेडगेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर यांनी सायबर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणात पोलीस तपास करीत असून सायबर गुन्हेगार लवकरच पकडले जाण्याचा विश्वास त्यांना आहे. या संदर्भात मुख्याध्यापक विलास सतरकर यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून आपल्या नावाने असे इमेल आल्यास त्यावर दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्याध्यापक हे मोठ्या मानाचे, जबाबदारीने आणि ज्यांच्यावर समाजाचा विश्वास असतो असे पद असल्यामुळे अशाच व्यक्तींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगारांनी केला आहे. लोकांना गंडविण्याची एक पद्धत चालत नाही असे दिसल्यावर पद्धत (मोडस ओपरेन्डी) बदलणेही सायबर गुन्हेगारांची पद्धतच आहे. सध्या मुख्याध्यापकांना लक्ष्य करणे ही नवीन मोडस ओपरेन्डी त्यांनी बनविली आहे.

Web Title: Criminals target principals in state; Email Hack, Open Money Making Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.