औरंगाबाद जिल्ह्यात १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 07:50 PM2019-05-29T19:50:26+5:302019-05-29T19:51:58+5:30

...तरीही अनेक गावे तहानलेली 

Water supply through 1,131 tankers in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यात १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

औरंगाबाद जिल्ह्यात १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील विहिरी आटल्या३७ पॉइंटवर भरले जातात टँकर 

औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ७४९ गावे आणि २७० वाड्यांना १,१३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी अनेक दुर्गम भागातील तहानलेल्या वाड्या- वस्त्यांपर्यंत टँकर पोहोचलेलेच नाहीत. दरम्यान, पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, अनेक विहिरी आटत चालल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ‘एमआयडीसीं’चे जलशुद्धीकरण केंद्र, काही ठिकाणी धरणातून पाणी घेतले जात आहे.

जिल्ह्यात यंदा पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. माणसांबरोबर जनावरांनाही पाणी देण्याचे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यात असलेले अनेक जलस्रोत आटत चालले आहेत. अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध करण्यासाठी सरकारी यंत्रणा हतबल झाली आहे. त्यामुळे सध्या तरी ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच टँकरची मदार आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजगेट जलशुद्धीकरण केंद्रात टँकर भरण्यासाठी एक पॉइंट होता. यंदा तेथे जास्तीचे तीन पॉइंट वाढविण्यात आले आहेत. सध्या तेथील ४ पॉइंटवरून टँकर भरले जातात. ‘बीकेटी’ जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी २ पॉइंटवर टँकर भरले जात आहेत. साजापूर जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी अगोदर २ पॉइंटवरून टँकर भरले जात होते. याठिकाणी आणखी १ पॉइंट वाढविण्यात आला आहे.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी २ पॉइंट होते, तेथे जास्तीचे आणखी ४ पॉइंट वाढविण्यात आले आहेत. ‘डीएमआयसी’च्या खोडेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या ४ पॉइंटवर टँकर भरले जात आहेत.मुदलवाडी जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी टँकर भरण्यासाठी २ पॉइंट होते, तेथे आणखी एक पॉइंट वाढविण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यातील केळगाव धरणात नव्याने ४ पॉइंट तयार करण्यात आले  आहेत. जांभई धरणातील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नव्याने ३ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. अंभई जलशुद्धीकरण केंद्रात १ पॉइंट तयार करण्यात आला आहे. 

वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नाशिक जिल्ह्यातील गळमोडी धरणातून टँकर भरले जातात. तेथे ४ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी नव्याने २ पॉइंट तयार करण्यात आले आहेत. याशिवाय सांजूळ धरणात एक पॉइंट तयार करण्यात आला आहे. अशा एकूण ३७ पॉइंटवरून टँकर भरून पाणीपुरवठा केला जात आहे. 

तालुकानिहाय तहानलेल्या गावांची स्थिती
तालुका    गावे    वाड्या    टँकर
औरंगाबाद     १३७    ४४    १९५
फुलंब्री    ६८    ०४    ११४
पैठण    ९६    ३१    १३१
गंगापूर    १४१    ४१    १७९
वैजापूर    १२५    १७    १८५
खुलताबाद    ३१    १५    ४६
सिल्लोड    ९४    ९०    १८७
कन्नड    ५१    २९    ८४    
सोयगाव    ०६    ००    १०
एकूण    ७४९    २७०    ११३१
 

Web Title: Water supply through 1,131 tankers in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.