सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाईचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:44 AM2019-02-04T00:44:07+5:302019-02-04T00:44:52+5:30

५० रुपये ड्रम पाणी : २१९ टँकर सुरु; अजिंठ्यात २५ दिवसांपासून निर्जळी

 Water scarcity woes in Silod taluka | सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाईचा कहर

सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाईचा कहर

googlenewsNext

श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यात भर हिवाळ्यातच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून तब्बल ५८ गावांत १२९ टँकर सुरु आहेत. अजिंठागावात तर २५ दिवसांपासून निर्जळी आहे. गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. सर्वच बोअर, विहिरी आटल्या असून पैसे मोजूनही पाणी मिळत नाही. टँकरवाल्यांची खुशामत केल्यास मोठ्या मुश्किलीने ५० रुपये ड्रमने पाणी मिळत आहे. यामुळे अजिंठ्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे.
तालुक्यातील केळगाव मध्यम प्रकल्प वगळता सर्वच मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. तालुक्यात एकूण १३१ गावे आहेत. यापैकी तब्बल ५८ गावे टँकरवर अवलंबून आहेत. १२९ पैकी ७० टक्के टँकर कन्नड तालुक्यातील नेवपूर मध्यम प्रकल्पातून भरून आणले जात आहेत. त्यामुळे कन्नड तालुक्याने सिल्लोड तालुक्याला संजीवनी दिल्याचे चित्र आहे.
अजिंठागावात २५ दिवसांपासून निर्जळी असल्याने गावकरी हताश झाले आहेत. अजिंठा -अंधारी मध्यम प्रकल्प कोरडा आहे. या प्रकल्पातून अजिंठा, शिवना, मादनी, आमसरी, नाटवी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. पण प्रकल्पात पाणीच नसल्याने नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. नळाला तब्बल २५ दिवसांपासून पाणी नाही.
अजिंठा पंचक्रोशीतून मिळेल त्या विहिरीवरुन टँकरचालक पाणी भरून आणत आहेत. यामुळे पाण्याला सोन्याचा भाव आला आहे. ५ हजार लिटरचे टँकर तब्बल १२०० ते १५०० रूपयांना मिळत आहे. एक ड्रम पाणी ५० रुपयात मिळत आहे. तेही मागणी केल्यावर दोन दिवसानंतर पाणी मिळते.
३२ वर्षात प्रथमच आटले प्रकल्प
अजिंठा -अंधारी मध्यम प्रकल्प १९८६ मध्ये झाला. त्यानंतर तो कधीच आटला नव्हता. २०१७ मध्ये त्यात १७ टक्के पाणी आले होते. २०१८ मध्ये त्यात काहीच पाणी आले नाही. या प्रकल्पातून शेतीसाठी गेल्या २ वर्षात पाणी उपसा झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ३२ वर्षात हा प्रकल्प प्रथमच आटला आहे.
अजिंठ्याला १० टँकर मंजूर
अजिंठा गावाची लोकसंख्या २५ हजार आहे. यामुळे प्रशासनाने ३० हजार लीटर क्षमतेचे तब्बल १० टँकर व शिवन्यासाठी ८ टँकर मंजूर केले. पण केळगाव प्रकल्पात पाणी भरण्यासाठी केवळ एकच मोटर असल्याने जास्त टँकर भरत नाही. यासाठी नवीन पाईपलाईन टाकून जादा क्षमतेची मोटार बसविण्याच्या हालचाली ग्रामपंचायत व पंचायत समितीने सुरु केल्या आहेत. मात्र या प्रक्रियेला किमान सोमवार उजाडेल, तोपर्यंत अजिंठा व शिवना गावांची तहान भागणे शक्य दिसत नाही. प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर कामे करुन नागरिकांची तहान भागवावी, अशी मागणी होत आहे.
अजिंठा ग्रामपंचायतीचे सर्व प्रयत्न फोल
अजिंठा येथील सरपंच दुर्गाबाई पवार, उपसरपंच शेख लुकमान, ग्रा.पं. सदस्य राजेश ठाकरे, समी चाऊस व सदस्यांनी प्रकल्पात चर मारून, गावात ठिकठिकाणी बोअर घेऊन बारव, विहिरींची साफसफाई करुन पाणीप्रश्न गावात मिटविण्याचा प्रयत्न केला, पण पाणी न लागल्याने प्रश्न सुटला नाही.
कोट... दोन दिवसात मिळेल नळाला पाणी
अजिंठा गावात प्रशासनाने ७ टँकरने पाणी पाठविले आहे. पण २ दिवसात केवळ ३ लाख ७० हजार लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. टाकी ६.५० लाख लीटरची आहे. पूर्ण भरल्याशिवाय प्रेशर मिळणार नाही. आणखी ३ लाख लीटर पाणी जमा झाल्यावर प्रेशरने गावात नळाला पाणी सोडण्यात येईल. दररोज १० टँकरच्या दोन खेपा पाणी मिळाल्यास १० ते १५ दिवसांआड सर्व नागरिकांना अर्धा तास नळाला पाणी मिळेल. टँकरचे पहिले पाणी सुटायला दोन दिवस व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हायला किमान १० ते १२ दिवस वाट बघावी लागणार आहे, अशी माहिती सरपंच दुर्गाबाई पवार, उपसरपंच शेख लुकमान, सदस्य राजेश ठाकरे, समी चाऊस यांनी दिली.

Web Title:  Water scarcity woes in Silod taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.