video : पाणी पेटले; शेतकऱ्यांनी हल्लाबोल करत अधिकाऱ्याला कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:53 PM2019-05-17T12:53:58+5:302019-05-17T14:53:12+5:30

 गोदावरी महामंडळ कार्यालयात हक्काच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

Water up; The farmers attacked the officer and attacked the officer | video : पाणी पेटले; शेतकऱ्यांनी हल्लाबोल करत अधिकाऱ्याला कोंडले

video : पाणी पेटले; शेतकऱ्यांनी हल्लाबोल करत अधिकाऱ्याला कोंडले

googlenewsNext
ठळक मुद्देधरणातून पाणी द्या, या मागणीसाठी चार दिवसांपासून आंदोलन

औरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणी आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात सोडण्यात यावे, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयावर चाल केली. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कार्यालयात सुमारे पाच तास ठिय्या दिला. कार्यकारी संचालक अ. प्रा. कोहिरकर यांनाही शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवले.

धरणातून पाणी द्या, या मागणीसाठी चार दिवसांपासून संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पैठण येथे जायकवाडी पाटबंधारे विभागात आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेले जवळपास ६० आंदोलक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर सायंकाळी ५ वाजता दाखल झाले. लोखंडी दरवाजा ढकलून पोलिसांना धक्का देऊन थेट कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश केला. ‘पाणी द्या, पाणी द्या, हक्काचे पाणी द्या’, ‘पाणी आमच्या हक्काचे’ असे म्हणत घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर इमारतीचा मुख्य दरवाजा आतून लावून घेऊन सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. 

सायंकाळचे ६ वाजून गेले होते. तेव्हा पोलिसांच्या आवाहनानंतर आंदोलकांनी मुख्य दरवाजा उघडला व कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वाट मोकळी केली; पण त्याच वेळी आंदोलकांनी कोहिरकर यांच्या दालनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. सुरुवातीला पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र आंदोलककर्त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. रात्री ११ वाजेपर्यंत कोहिरकर त्यांच्या दालनात बसून होते. जोपर्यंत पाणी सोडण्याची तारीख निश्चित केली जात नाही, याचे हमीपत्र देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार, अशी घोषणा सूर्यवंशी यांनी केली.

रात्री ११ वाजेच्या सुमारास ‘लोकमत’ प्रतिनिधीने जयाजी सूर्यवंशी आणि कोहिरकर यांच्याशी संपर्क केला. सूर्यवंशी यांनी आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. तर कोहिरकर म्हणाले की, मी अद्याप कार्यालयातच बसून आहे. ११ वाजेच्या सुमारासही पोलिसांनी आंदोलन मागे घेण्यासंदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्ते पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्यावर ठाम राहिले. 

या आंदोलनात प्रदीप नरके, शरद गुंते, नंदू गोरडे, दा.स. पवार, रावण टेकाळे, गजानन वाकडे, नानाभाऊ वाघमोडे, भाऊसाहेब नरके, सुनील कुलकर्णी, पवन औटे, कचरू गोरडे महाराज, द्रोणाचार्य नरके यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

पाण्याचा विषय सुटेपर्यंत आंदोलन 
जायकवाडी धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी १३ मेपासून जायकवाडी परिसरात आंदोलन सुरू आहे. १५ रोजी आम्ही गोदावरी पाटबंधारे विभागाच्या उत्तर विभागीय कार्यालयात आंदोलन सुरू केले, पण गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोणीच आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आम्ही सायंकाळी ५ वाजता मुख्य कार्यालयात येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. पाण्याचा विषय जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. 
- जयाजी सूर्यवंशी, नेते, अन्नदाता शेतकरी संघटना

अहवाल पाठविला, शासनस्तरावर निर्णय अपेक्षित
जायकवाडी धरणातील पाणी सध्या मृतसाठ्यात आहे.हवामान विभागानुसार येत्या हंगामात उशिरा पावसाळ्याला सुरुवात होईल, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी होत आहे, तसेच परभणी, बीड जिल्ह्यांतूनही केली जात आहे. अशा परिस्थितीत पाणी सोडल्यास काय होईल, याचा सर्व बाजंूनी अभ्यास करून एक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. शासनस्तरावर निर्णय अपेक्षित आहे. 
- अ. प्रा. कोहिरकर, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे  विकास महामंडळ 

Web Title: Water up; The farmers attacked the officer and attacked the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.