रस्ते बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरा; जिल्हा प्रशासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 04:31 PM2018-11-30T16:31:31+5:302018-11-30T18:08:25+5:30

दुष्काळाच्या झळा : स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंत्राटदारांना काम देतानाच एसटीपीचे पाणी रस्ते बांधकामासाठी वापरण्याबाबत अट टाकून करार करावा, असेही प्रशासनाचे आदेश आहेत. 

Use water that is processed from sewage disposal; Order to the local government institutions of the district administration | रस्ते बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरा; जिल्हा प्रशासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश 

रस्ते बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरा; जिल्हा प्रशासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आदेश स्थानिक स्वराज्य संस्था कंत्राटदारांना करणार सूचना

औरंगाबाद : शहर व परिसरातील रस्ते बांधकामांच्या कामांसाठी महापालिकेच्या कांचनवाडी येथील एसटीपीचे (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) पाणी वापरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती पाहता प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पिण्यासाठी प्राधान्याने वापरण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंत्राटदारांना काम देतानाच एसटीपीचे पाणी रस्ते बांधकामासाठी वापरण्याबाबत अट टाकून करार करावा, असेही प्रशासनाचे आदेश आहेत. 

शहरातील सांडपाण्यावर कांचनवाडी एसटीपी केंद्रात प्रक्रिया केली जाते. एसटीपीतून प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम, उद्यानांसाठी वापरण्यायोग्य आहे. जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू होईल, एनएच-२११ अंतर्गत औरंगाबाद ते धुळे महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे. समृद्धी महामार्गाचे व एनएच २११ चे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी मनपाशी करार करून एसटीपीचेच पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सोलापूर-धुळे महामागार्साठीही एसटीपीचे पाणी वापरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

समृद्धी महामागार्चे काम तीन वर्षे चालेल. पुढील ७ वर्षे महामार्ग देखभाल व दुरुस्तीचे काम आणि वृक्षारोपण व संवर्धन कंत्राटदार करणार आहे. समृद्धी महामागार्साठी रोज १० एमएलडी पाणी लागणे अपेक्षित आहे. मनपातर्फे कमी दराने ते पाणी उपलब्ध होणे शक्य आहे. टँकरचा खर्च जास्त असल्याने समृद्धी महामार्ग कंत्राटदार एसटीपीवरून पाईपलाईन टाकून पाणी नेण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी एसटीपीतील पाणी वापरण्याबाबत बांधकाम व्यावसायिक संघटनांशी जिल्हा प्रशासनाची चर्चा सुरू आहे. 

१०९ कोटींचा एसटीपी 
भूमिगत गटार योजनेतून १०९ कोटींच्या खर्चातून कांचनवाडी येथे एसटीपी बांधण्यात आला आहे. तेथे १६१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असून, सध्या ६० एमएलडी पाणी तेथे मिळते. ते पाणी मनपादेखील त्यांच्या कामांसाठी वापरते की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे. तेथे पाणी उपलब्ध असल्याचे पालिकेने आजवर जाहीरदेखील केलेले ऐकिवात नाही. एसटीपीतील पाणी सध्या नाल्यात सोडून देण्यात येत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिमेंट काँक्रीट रस्ते, वृक्षारोपण व संवर्धन, गृहनिर्माण सोसायटी व अपार्टमेंटच्या बांधकामांसाठी एसटीपीतील पाणी वापरले जाण्याच्या दिशेने प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे.

Web Title: Use water that is processed from sewage disposal; Order to the local government institutions of the district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.