...त्यावेळी सहन केले आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 02:26 PM2018-12-22T14:26:50+5:302018-12-22T14:28:24+5:30

नजीरबंदी : आता भाजप देत असलेला फटका बसतोय मात्र तो कुठे बसला आणि कसा बसला हे शिवसेनेला कळेनासे झाले आहे.

... at that time they unopposed now experiencing the buckies by pressing mouth | ...त्यावेळी सहन केले आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार

...त्यावेळी सहन केले आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार

googlenewsNext

- नजीर शेख 

रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन कुणी करायचे; म्हणजे कुणाच्या हस्ते करायचे यावरुन औरंगाबाद महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये वाद नेहमीप्रमाणे रंगलाय. एकमेकांवर मात करण्यासाठी काही खेळ्यांही खेळल्या जात आहेत. कोण अधिक कुटील डाव खेळतो, याची दोघांमध्ये स्पर्धा लागली आहे. मुंबईमध्ये सागरी महामार्गाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेने भाजपला डावलले तर मेट्रो ५ च्या कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपचे शिवसेनेशिवाय कार्यक्रम उरकून घेतला. मुंबई- कल्याणमधील वादाचे परिणाम औरंगाबादेतही दिसून येत आहेत.

औरंगाबादमध्ये १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन शिवसेनेचे धाकलेसाहेब आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. तर भाजपला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घ्यायचा आहे. मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एकत्र आले तर साहजिक आहे की आदित्य यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच नारळ फोडावा लागेल आणि श्रेय भाजपकडे जाईल, अशी खेळी आहे. शिवसेनेलाही मुख्यमंत्र्यांनी येणे आवडणारे नाही, मात्र रस्त्यांच्या कामाला सरकारने जरी पैसे दिले असले तरी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी  रुपये दिले असे ठासून सांगत आहेत. पैसे सरकारचे म्हणजे जनतेचेच आहेत याचा श्रेय घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या मंडळींना विसर पडलाय. 

पकड ढिली होतेय...
अनेक वर्षापासून शिवसेनेची महापालिकेवर पकड आहे. मात्र मागील पाच वर्षांत ही पकड भाजपमुळे ढिली झाली आहे. ही पकड आणखी सैल होऊन महापालिका हातातून निसटून जाते की काय, अशी भीती शिवसेनेतील ‘सबसे बडे बाबा’सह इतर कार्यकर्त्यांना पडली आहे. ही पकड ढिली करण्यासाठी त्याचा दोर कापण्याचे काम महापालिका आयुक्त करीत असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत. महापालिकेत महापौर शिवसेनेचा असताना आणि महापौर व त्यांच्या पक्षाने आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे तसेच सिटी बस आणि इतर काही प्रकल्पांचे उद्घाटन करायचे ठरविले असताना त्यात खोडा घातला जात असल्याची शिवसेनेची भावना बनली आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि नगरविकास मंत्रीपद भाजपकडे असल्याने शिवसेनाही हतबल होऊन बसली आहे. त्यामुळे एक पाऊल माघार घेत शिवसेनेने  आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २३ डिसेंबर रोजी केवळ सिटी बस आणि एसटीपी प्लांटचे उद्घाटन करण्याचे जाहीर केले मात्र महापालिका आयुक्तांनी या उद्घाटन कार्यक्रमाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सत्ता असूनही शिवसेना हतबल झाली आहे. त्यामुळे आता जरी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिटी बस आणि एसटीपी प्लांटचे उद्घाटन झाले तरी जानेवारी महिन्यात शंभर कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा भाजपचा मानस आहे. भाजपची ही खेळी यशस्वी झाली आहे. बरे हा वाद चालू असताना विरोधी पक्ष बघ्याच्या भूमिकेत आहे. उद्घाटने कुणाच्याही हस्ते करा, विकासकामे लवकर सुरु करा, अशी मागणी त्यांच्याकडून होताना दिसत नाही. दोन्ही पक्षांतील सुंदोपसुंदी पाहून आपले चांगले मनोरंजन होत आहे, असा समज विरोधी पक्षाने करुन घेतलेला दिसत आहे. 

श्रेयवादाची लढाई 
महापालिकेत हा वाद चालू असतानाच सिडकोची घरे ‘लीज होल्ड’मधून ‘फ्री होल्ड’ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. याचे श्रेयही भाजपने आपल्याकडे घेतले. राज्य सरकारमध्येही विचारले जात नाही आणि महापालिकेच्या सत्तेतही काही चालू दिले जात नाही, याची सल शिवसेनेला आहे. काही वर्षांपूर्वी औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेच्या मागे भाजप गपगुमाने जात आहे, असे मानले जायचे. शिवसेनेच्या काही ‘दादा’ मंडळींनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची थोबाडे फोडली आहेत. थोबाड फुटले तरी तोंड उघडण्याचे धाडस त्यावेळी झाले नाही. मात्र परिस्थिती बदलली आणि भाजपकडून बदला घेण्याचे काम सुरु झाले. आता शिवसेनेला रोज तोंब दाबून बुक्क्यांचा मार देण्याचे काम चालू आहे. शिवसेनेने मारहाण केल्याच्यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्याच्या हातातोंडाला इजा झाली, डोके फुटले, रक्तही बाहेर आले. औषधोपचाराने कार्यकर्ते बरे झाले. आता भाजप देत असलेला फटका बसतोय मात्र तो कुठे बसला आणि कसा बसला हे शिवसेनेला कळेनासे झाले आहे. मलम लावायचे तरी कुठे? नुसते विव्हळण्याचे आवाज ऐकू येत आहेत. 

Web Title: ... at that time they unopposed now experiencing the buckies by pressing mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.