मुलाने आधी वडिलांना आइस्क्रीममधून झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर स्क्रूड्रायव्हर खुपसून केली हत्या

By सुमित डोळे | Published: April 17, 2024 07:34 PM2024-04-17T19:34:42+5:302024-04-17T19:35:09+5:30

शेअर मार्केटमध्ये ३५ लाख हरल्याने पाॅलिसीच्या पैशांसाठी हत्या करून रचला दरोड्याचा बनाव

The son first gave his father sleeping pills from ice cream, then killed him with a screwdriver | मुलाने आधी वडिलांना आइस्क्रीममधून झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर स्क्रूड्रायव्हर खुपसून केली हत्या

मुलाने आधी वडिलांना आइस्क्रीममधून झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर स्क्रूड्रायव्हर खुपसून केली हत्या

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठ दिवसांपासून तो वडिलांचा मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्यांना झोपेच्या गोळ्या देत होता. गोळ्यांचा त्यांच्यावर परिणाम झाला नाही. सोमवारी रात्री त्याने पुन्हा आइस्क्रीममधून गोळ्या दिल्या. तरीही मंगळवारी पहाटे वडील निवांत झोपलेले दिसल्यावर मुलाने पोटात स्क्रू ड्रायव्हर खुपसून जन्मदात्या वडिलांची क्रूर हत्या केली. शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये हरून पोर्टफोलिओ घसरल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या मुलाने हे घृणास्पद कृत्य केले. श्रीकृष्ण वामन पाटील (६०, रा. दीपनगर, सातारा) असे मृत वडिलांचे नाव असून मुलगा राेहित (३०) याला पोलिसांनी काही तासांत अटक केली.

सन २०२१ मध्ये महावितरणमधून ऑपरेटर पदावरून निवृत्त झालेले पाटील पत्नी बबिता, मुलगा रोहित, मुलगी गौरीसोबत राहत होते. गौरी बारावीची विद्यार्थिनी असून रोहितने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर त्याने लाँड्री व्यवसाय सुरू करून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केले. कोरोना काळात ट्रेडिंगमध्ये वेग घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढला व टक्केवारीवर इतरांकडून गुंतवणूक सुरू केली. मागील दोन वर्षांत बाजाराच्या चढउतारात रोहित लाखो रुपये गमावून बसला. त्यानंतर जानेवारीपासून रोहितची पत्नी माहेरी राहते. गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावल्याने पाटील यांनी मुलासाठी २ एकर शेती विकून लोकांचे पैसे परत केले. लाँड्री व्यवसायही बंद पडला. वडिलांना जमीन व पेन्शनचे पैसे मिळाल्याने रोहितला पुन्हा गुंतवणुकीची स्वप्ने पडायला लागली. पाटील यांनी त्यास आणखी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचा राग त्याच्या मनात होता. ट्रेडिंग उत्तम सुरू असताना रोहितचा वैयक्तिक पोर्टफोलिओ ३५ लाखांच्या घरात होता. त्या दरम्यान त्याने कुटुंबाची पॉलिसी काढली होती. वडिलांना मारून दरोड्याचा बनाव रचायचा व पॉलिसीचे पैसे घेण्याचा कट रोहितने रचला.

हत्या, आत्महत्येसाठी इंटरनेटवर रिसर्च
- आठ दिवसांपासून रोहितने विविध माध्यमांतून वडिलांना झोपेच्या गोळ्यांची भुकटी खाऊ घातली. मात्र, गोळ्यांचा परिणाम झाला नाही. रोहितने सोमवारी दुपारी घराबाहेर पडून उस्मानपुऱ्यात बियर रिचवली. इंटरनेटवर गळा कसा आवळावा, हत्या कशी करावी, आत्महत्या कशी करावी, हे सर्च केले. त्यानंतर घरी परतला. रात्री वडिलांना आइस्क्रीममधून पुन्हा गोळ्या दिल्या.
- पहाटे पाच वाजता तळमजल्यावर वडील पुन्हा शांत झोपलेले दिसताच रोहितने त्यांचा गळा आवळला. वडिलांनी ताकदीने प्रतिकार करत त्याला लाथ घातली. तेव्हा मात्र रोहितने स्क्रू ड्रायव्हरने पोटाची चाळणी करून पित्याचा जीव घेतला. वर जाऊन आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला; पण तितक्यात गौरीला जाग आली. मग वडिलांना उठवण्यासाठी गौरीने उठून तळमजल्यावर धाव घेतली; पण वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून घाबरून ती घराबाहेर पळाली. हत्येनंतर रोहितने स्वत:ही गळ्याला इजा करून घेऊन लुटारूंनी मारल्याचा बनाव केला. मग गौरीला फोन करून घरी बाेलावले. आई व बहिणीला 'घरी बाबांचे मित्र आले होते, ते वडिलांची हत्या करून पैसे व दागिने घेऊन पसार झाले, त्यात रोहितलाही मारण्याचा प्रयत्न केला’, असे सांगण्यास सांगितले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून रडण्याचे नाटक करत बसला.

श्वान जवळ जाताच बोबडी वळली
दरोड्याचा कॉल येताच साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, अमोल कामठे, नंदकुमार भंडारी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप साेळुंके यांनी धाव घेतली. निरीक्षक गिरी यांना सुरुवातीलाच रोहितवर दाट संशय आला. पोलिस श्वान पोहोचताच मृ़तदेहानंतर थेट ते रोहितजवळ गेल्यानंतर रोहितची बोबडी वळली. संशय स्पष्ट होताच गुन्हे शाखेच्या गुरमे, बोडखे यांनी त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर त्याने हत्येची कबुली दिली.

Web Title: The son first gave his father sleeping pills from ice cream, then killed him with a screwdriver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.