विद्यापीठाच्या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम अखेर पाडणार

By योगेश पायघन | Published: December 8, 2022 04:45 PM2022-12-08T16:45:57+5:302022-12-08T16:47:30+5:30

विद्यापीठ गेटचे इंडिया गेटच्या धर्तीवर संवर्धन, नामविस्तार दिनापर्यंत सुशोभिकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न

The construction of the new 'in-out' gate of the Dr.BAMU will finally be demolished | विद्यापीठाच्या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम अखेर पाडणार

विद्यापीठाच्या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम अखेर पाडणार

googlenewsNext

औरंगाबाद - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणासोबत नवे प्रवेशद्वार उभारण्यात येत होते. मात्र, त्याला होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम काढून घेण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी विद्यापीठ प्रशासन पत्रव्यवहार करून वास्तुविशारदासोबत चर्चेअंती यासंबंधीचा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक संदर्भ आहेत. तसेच या प्रवेशद्वाराशी आंबेडकरी जनतेच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. या प्रवेशद्वाराचे संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम विद्यापीठाने हाती घेतले. गेटच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. सुरक्षा भिंती, बाजूच्या दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, सुरक्षा गेट आणि सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ नामविस्तार दिनापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दिल्ली येथील इंडिया गेटच्या धर्तीवर विद्यापीठातील या गेटचे सुशोभिकरणाच्या या प्रकल्पासाठी सुमारे २ कोटींचा खर्च केला जात आहे.

सुशोभिकरणासोबत प्रवेशद्वाराच्या मधून ऐवजी आता दोन्ही बाजूने ये-जा करावी लागणार आहे. त्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. विद्यापीठात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन-आउट गेटची उभारणी सुरू आहे. त्या गेटच्या दोन्ही बाजून पाण्याचे कारंजे प्रस्तावित आहे. इन आऊट गेटच्या ३ टाॅवरची उभारणी पूर्ण होत आलेली असतांना हे प्रतिगेट होत असल्याचे म्हणत आंबेडकरी संघटनांकडून त्याला विरोध दर्शविला गेला. तर काही संघटनांनी समर्थनही केले. मात्र, गेल्या आठवड्यापासून विरोध वाढल्याने अखेर या गेटचे बांधकाम थांबवण्यात आले आहे.

गेटचे बांधकाम काढून घेऊ 
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे पावित्र्य जपण्यासाठी व संवर्धासोबत सुशोभिकरणासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यातील इन-आऊट गेटला विरोध होत आहे. सुरूवातीला एका गटाने समर्थन केले आता पुन्हा विरोध वाढल्याने काम थांबवले आहे. बांधकाम विभागाला पत्र देवू. तसेच वास्तुविशारदासोबत चर्चा करून गेटचे बांधकाम काढून घेवू.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Web Title: The construction of the new 'in-out' gate of the Dr.BAMU will finally be demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.