औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:36 AM2018-07-01T00:36:53+5:302018-07-01T00:37:32+5:30

तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यानुसार आज शनिवारी ३० जून हा टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा अखेरचा दिवस होता.

Tanker closure in Aurangabad district today | औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून टँकर बंद

औरंगाबाद जिल्ह्यात आजपासून टँकर बंद

googlenewsNext
ठळक मुद्देमुदतवाढीची अपेक्षा : जिल्ह्यातील पाचशे गावांच्या घशाला कोरड

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यानुसार आज शनिवारी ३० जून हा टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा अखेरचा दिवस होता. यासंदर्भात तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना तशा पूर्वसूचनाही दिलेल्या आहेत. अजूनही जिल्ह्यातील जवळपास ५०० गावे तहानलेलीच आहेत. या गावांना उद्या १ जुलैपासून टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मुदतवाढ द्यावी, असा ठरावही जि. प. स्थायी समितीने घेतला आहे. असे असले तरी यासंदर्भात भक्कम पाठपुरावा झाल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणा हलणार नाही, हे मात्र नक्की.
जिल्ह्यात यंदा अनेक तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीही ओलांडली नाही. काही तालुक्यात तर ५० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे २९ जूनपर्यंत जिल्ह्यातील ४७८ गावे आणि ४१ वाड्यांना ५९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. जिल्हा परिषदेने एप्रिल महिन्यात तीन महिन्यांचा टंचाई आराखडा सादर केला होता. टंचाई आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली आहे. त्यामुळे उद्या रविवारी १ जुलैपासून जिल्ह्यात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होईल की नाही, याबाबत जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागही अनभिज्ञ आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. ज्या तालुक्यांमध्ये बºयापैकी पाऊस झाला तेथे भूजल पातळी वाढली असून, विहिरी, विंधन विहिरींना पाणी आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवघे ४५ टँकर्स बंद करण्यात आले आहेत. यामध्ये वैजापूर तालुक्यातील एकही टँकर बंद झालेला नाही. बंद झालेल्या टँकरपैकी औरंगाबाद तालुक्यातील ४ टँकर्स, गंगापूर तालुक्यातील १ टँकर, खुलताबाद तालुक्यातील ३ टँकर, पैठण तालुक्यातील १० टँकर्स, फुलंब्री तालुक्यातील ९ टँकर्स, सिल्लोड तालुक्यातील १७ टँकर्स, सोयगाव तालुक्यातील १ टँकर, असे एकूण ४५ टँकर्सचा समावेश आहे. कालपर्यंत वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यांमध्ये सर्वाधिक गावे तहानलेलीच आहेत.
आजपर्यंत औरंगाबाद तालुक्यातील ८१ गावे व २६ वस्त्यांसाठी १०५ टँकर्स, गंगापूर तालुक्यातील १०३ गावांसाठी ११८, कन्नड तालुक्यातील ३६ गावे आणि २ वस्त्यांसाठी ३८, खुलताबाद तालुक्यातील ३१ गावे आणि ५ वस्त्यांसाठी ३१, पैठण तालुक्यातील ४० गावांसाठी ४६, फुलंब्री तालुक्यातील ५७ गावांसाठी ८१, सिल्लोड तालुक्यात ५६ गावे व ६ वस्त्यांसाठी ८९, सोयगाव तालुक्यातील २ गावांसाठी ३, वैजापूर तालुक्यातील ७२ गावे आणि २ वस्त्यांसाठी ८६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

Web Title: Tanker closure in Aurangabad district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.