सावंगी बायपासलगतच्या शेतात विवाहितेचा जाळून खून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:28 PM2019-05-24T23:28:19+5:302019-05-24T23:29:01+5:30

सावंगी बायपास रस्त्यालगतच्या पिसादेवी शिवारातील शेतात विवाहितेचा जाळून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महिलेच्या घरात सुसाईड नोट सापडल्याने हा खून की आत्महत्या, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

Savagi Baitatalagat field married burnt to death? | सावंगी बायपासलगतच्या शेतात विवाहितेचा जाळून खून?

सावंगी बायपासलगतच्या शेतात विवाहितेचा जाळून खून?

googlenewsNext
ठळक मुद्देचिकलठाणा ठाण्यात गुन्हा : सावंगी बायपास रस्त्याजवळील पिसादेवी शिवारात शुक्रवारी आढळला मृतदेह


औरंगाबाद : सावंगी बायपास रस्त्यालगतच्या पिसादेवी शिवारातील शेतात विवाहितेचा जाळून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महिलेच्या घरात सुसाईड नोट सापडल्याने हा खून की आत्महत्या, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी संशयावरून महिलेच्या पतीला ताब्यात घेतले.
सोनाली सदाशिव शिंदे (३०, रा. जाधववाडी, नवा मोंढा), असे मृत महिलेचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, सावंगी बायपास रस्त्यापासून सुमारे शंभर-दीडशे मीटर अंतरावरील शशिकला सखाराम चव्हाण यांच्या शेतात एका अनोळखी महिलेचा चेहरा जाळलेल्या अवस्थेतील मृतदेह २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आढळला. ही माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल मेहुल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे ३० वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयातील शवागारात दाखल केला. शिवाय मृताची ओळख पटविण्यासारखी कोणतीही वस्तू घटनास्थळी नव्हती. चिकलठाणा पोलिसांनी या घटनेची माहिती शहर आणि ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाण्यांना कळविली आणि तपास सुरू केला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक तरुण हर्सूल पोलीस ठाण्यात आला आणि त्याची बहीण सोनाली शिंदे ही घरातून निघून गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तक्रारदार तरुणाला घाटी रुग्णालयात नेऊन मृतदेह दाखविला असता त्याने हा मृतदेह त्याची बहीण सोनालीचा असल्याचे ओळखले आणि रडण्यास सुरुवात केली.

सोनालीला होता पतीकडून त्रास
सोनाली शिंदे या विवाहितेचे सासर सिल्लोड तालुक्यातील गव्हाली, तर माहेर जाधववाडी आहे. आई-वडिलांच्या घरापासून जवळच सोनाली ही पती सदाशिव आणि चार वर्षांच्या मुलासह राहत होती. तिचा पती शेंद्रा एमआयडीसीमधील एका कॅन्टीनमध्ये कामाला आहे. लग्न झाल्यापासून तो सोनालीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असे. गुरुवारी रात्री सोनाली आणि सदाशिव शिंदे हे जेवण करून झोपले. आज सकाळी सोनालीचा भाऊ तिच्या घरी गेला तेव्हा पती-पत्नी घरी नव्हते. यामुळे तिच्या भावाने पोलिसांत धाव घेतली.


पतीच्या जबाबात विसंगती
सोनालीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी संशयावरून तिचा पती सदाशिवला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. सदाशिव हा शेंद्रा एमआयडीसीतील एका कारखान्याच्या खानावळीत स्वयंपाकी आहे. पहाटे ५ वाजता तो घरातून कामावर गेला तेव्हा सोनाली घरात झोपलेली होती, असे त्याने पोलिसांना सांगितले, तर सोनालीच्या भावाच्या म्हणण्यानुसार सकाळी सोनाली आणि सदाशिव घरात नव्हते.

घरात चिठ्ठी सापडल्याने वाढला संभ्रम
शवविच्छेदन अहवालामध्ये सोनालीचा मृत्यू जळाल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी घाटीतील डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. घटनास्थळी सोनालीच्या दोन्ही पायात चपला होत्या. यावरून सोनालीला बेशुद्ध केल्यानंतर तिचा जाळून खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय असल्याचे स.पो.नि. सत्यजित ताईतवाले म्हणाले. शिवाय सोनालीच्या घरात पोलिसांना मृत्यूपूर्व लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्या आहेत. चारित्र्याच्या संशयावरून पती सतत त्रास देतो, तसेच शरीरसंबंधासाठी मारहाण करतो, असे त्यामध्ये नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिठ्ठ्यांमुळे पोलिसांचा संभ्रम वाढला आहे.

Web Title: Savagi Baitatalagat field married burnt to death?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.